इकडे आड तिकडे विहीर

नुकतंच एका संशोधनाविषयी वाचनात आलं. ज्या स्त्रिया त्यांच्या सासू-सास-यांच्या लाडक्या असतात किंवा त्यांचे सासू-सास-यांशी संबंध चांगले असतात, त्या त्यांच्या नव-या पासून दुरावण्याची शक्यता जास्त असते. पहिल्या झटक्यात वाटलं की सासूशी ज्या स्त्रीचं छान पटतं तिचा नवरा किती आनंदी असेल. रोजची किटकिट नाही डोक्याला, कोणाची बाजू घ्यावी, आई व बायकोपैकी कोणाला चुकीचं म्हणावं याचं टेन्शन नाही. रोज घरात शांतता आणि समाधान. मग या संशोधनातून असा निष्कर्ष कसा निघाला? मग नीट विचार केला तेव्हा त्यातली गोम कळली. ज्या अर्थी ती स्त्री सासूची लाडकी आहे, त्या अर्थी ती तिच्या मनासारखं वागत असणार, सासूचं मन राखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असणार. प्रसंगी नव-या च्या मनाविरुद्ध वागत असणार. ती लहानपणापासून हेच ऐकत आलेली असते ना, सासू-सास-यांची मर्जी राख, त्यांना आवडणार नाही असं काही करू नको, वगैरे वगैरे. त्यामुळे बिचारा नवरा मागे पडत असणार. नव-या सोबत रात्री गप्पा मारत बसलं तर सकाळी उठायला उशीर होणार आणि सासूचा पारा चढणार, हे माहीत असणारी स्त्री नव-या च्या इच्छेला मान देत नाही. आणि सासूला खुश ठेवायचा प्रयत्न करते. मग तिचा नवरा तिच्यापासून दूर जाणारच नाही, अशी खात्री कोणी देऊ शकत नाही.

आधीच आपल्याकडच्या सामाजिक वा कौटुंबिक व्यवस्थेत एक स्त्री कायम मुलगी, बहीण, बायको, सून, आई, काकी, मामी, मावशी, आत्या, जाऊ, नणंद, भावजय अशा लेबलांखाली वावरत असते. ही सगळी नाती एकमेकांत अडकलेली असतात. त्यामुळे बायको म्हणून पेपर चांगला लिहिला तर सून म्हणून नापास होण्याची शक्यता आणि मुलगी म्हणून परीक्षा दिली तर नणंद म्हणून फटका बसण्याची. (जसं आपली आई तिच्या सुनेशी चांगलंच वागत असेल, याची खात्री कोणीही मुलगी देऊ शकत नाही.) म्हणजे कोणीही स्त्री, खरं तर पुरुषसुद्धा, एका वेळी सर्व माणसांना खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे एकाला सावरून धरायचं तर दुसरा लांब जातोय, एकाच्या मनासारखं केलं तर दुसरा खप्पामर्जी होतोय, असं काहीसं हे त्रांगडं आहे.

या इकडे आड तिकडे विहीर परिस्थितीत आपण सगळेच नेहमी पडत असतो. तुम्ही कसा मार्ग काढलात यातून, कळवाल ना आम्हाला?

Comments