तिची सोय

तिने नवीन फ्रिज घेतला नुकताच. पूर्वी होता त्यापेक्षा मोठा. मुख्य म्हणजे त्याचा फ्रीजर खाली आहे. त्यामुळे त्याचं जास्त कौतुक. येणारी- जाणारी मैत्रीण, बहीण, वहिनी यांनाही त्याचंच कौतुक. कारण काय, तर बायका सतत फ्रिज उघडत असतात; पण तो भाजी/कोथिंबीर, मिरच्या, दही, दूध, वाटण अशा गोष्टी ठेवायला किंवा काढायला. दिवसभरातून किमान 25 वेळा. पण डीप फ्रीजरच्या दाराला हात लागणार दिवसातून जास्तीत जास्त एकदा किंवा दोनदा. आतापर्यंत आपल्याकडे मिळणा-या सर्व फ्रिजचं डिझाइन असं होतं की फ्रीजर वर आणि मुख्य फ्रिज खाली. त्यामुळे दिवसातून किमान 25 वेळा बाई कमरेतून वाकून फ्रिजमधल्या वस्तू शोधणार, काढणार.

नवीन फ्रिजमुळे सगळं तिच्या डोळ्यांच्या पातळीवर आलं. फ्रीजर मोठा असला तरी खाली. त्यातनं काही शोधायचं झालं तर चक्क जमिनीवर मांडी ठोकून आरामात शोधता येतं. त्यामुळे बायका खुश. त्यांच्याकडनं कौतुक ऐकल्यावर तिला वाटलं की, ही खरी किती सोपी गोष्ट, फ्रिजचं डिझाइन करणा-या नी कोणत्याही गृहिणीला विचारलं तर सहज कळू शकणारी. अशी स्वयंपाकघरातील अनेक उपकरणं किंवा करून घेतलेल्या ‘सोयी’ तिला आठवल्या नि वाटलं जी व्यक्ती एखादी गोष्ट/जागा/उपकरण वापरणार असते तिलाच विचारून ती विकसित केली पाहिजे. ओट्याची उंची, सिंकची जागा, मायक्रोवेव्ह/मिक्सर/फ्रिज/माठ/वॉटर प्युरिफायर आदींच्या जागा, हे सगळं ठरवताना गृहिणीची उंची आणि ती डावखुरी तर नाही ना, हे पाहिलं पाहिजे. तिला स्वयंपाक करताना गाणी ऐकायची असतील तर रेडिओ ठेवायसाठी, झाडांची आवड असेल तर एखादी छोटीशी कुंडी ठेवायसाठी आणि तिला कामांच्या धबडग्यात मिनिटभर टेकावंसं वाटलं तर त्यासाठीही जागा अत्यावश्यक; पण किती घरांचं डिझाइन घरच्या बाईला विचारून केलं जातं आणि किती घरातले सर्व निर्णय घरचा ‘कर्ता पुरुष’ घेतो, याची आकडेवारी आपल्या आजूबाजूला पाहिलं तरी स्पष्ट दिसून येईल. एक वेळ रंग, टाइल्स त्या पुरुषाच्या आवडीच्या चालतील; पण बाकी प्रॅक्टिकल सोय तिची नीट झाली पाहिजे. हो ना?


Comments

Post a Comment