संकल्प

नवीन वर्ष सुरू होताना, किंबहुना वर्ष संपायला येताना कुठेतरी मनात विचार येतो, आता एक जानेवारीपासून काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी म्हणजे काहीही असू शकतं. बर्‍याच जणांच्या यादीत एक नंबरवर असतो व्यायाम किंवा पथ्य किंवा वजन कमी करणं. दोन नंबरवर असतं रोज डायरी लिहिणं. मग चहा/कॉफी/सिगारेट/दारू सोडणं वा किमान कमी करणं. (या व्यसनांच्या यादीत आता फेसबुकचाही समावेश होईल बहुधा.) दहावी-बारावीच्या मुलांच्या यादीत असतं पहाटे उठून अभ्यास करणं. काही जण ठरवतात नवीन भाषा शिकायची. काहींना प्रवास करायचा असतो, काहींना रागावर नियंत्रण आणायचं असतं, काहींना एखादं पुस्तक लिहून पूर्ण करायचं असतं, कोणाला दोनाचे चार करायचे असतातच या वर्षी. यातले किती संकल्प किती दिवस टिकतात, किती पूर्ण होतात हा अनेक वर्षांपासून विनोदाचा विषय आहे. परंतु या संकल्पाच्या निमित्ताने आपल्याला एक फोकस मिळतो, काय करायला हवंय याची ठोस नोंद आपल्या मनाने आणि मेंदूने घेतलेली असते, हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे फलित असते. म्हणजे व्यायाम करायला हवाय असं ठरवताना जीवनशैली बदलायला हवीय, वजन आवश्यकतेपेक्षा वाढलंय याची जाणीव एका गंभीर पातळीवर आपण घेतलेली असते. त्यामुळे अगदी रोज व्यायाम नाही केला तरी जेवताना कुठेतरी मनात हे निश्चित येतं की जरा कमी करायला हवं. चहा हातात आला की जाणवतं, अरेच्चा, आपण नव्या वर्षात चहा कमी करणार होतो. असा हा स्वत:च स्वत:वरचा ‘मनोवैज्ञानिक’ दबाव नकोशा गोष्टी कमी करायला नक्की मदत करतो. किंवा ज्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची त्यांचा विचार तरी करायला भाग पडतो. म्हणूनच संकल्प टिकला नाही, पूर्ण झाला नाही तरी चालेल, पण तो करा. नवीन वर्षाच्या निमित्ताने एक ठाम विचार करून काहीतरी करायचं किंवा थांबवायचं असं ठरवा. बघा नक्की उपयोग होईल. आणि आम्हाला कळवा, काय संकल्प केला आहात ते.

अमुक एका पुस्तकाचं वाचन किंवा लिखाण हा अनेकांच्या संकल्पाचा विषय असतो. त्यांना मदत आणि इतरांना स्फूर्ती म्हणून आजचा ‘मधुरिमा’ पुस्तकं, पुस्तकवेडे, वाचनालये, पुस्तकभिशी आदी विषयांना वाहिलेला आहे. कसा वाटला ते नक्की कळवा आम्हाला.

सर्व वाचक आणि लेखक मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

Comments