प्रेमाची भाषा

‘बरंय, कोणाला आपण आवडत नाही ते,’ तिचा अविवाहित सहकारी म्हणाला नि बाकीच्या विवाहित सहका-यांनी त्याला टाळी दिली. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने काही तरी चर्चा सुरू होती ऑफिसात. काय करणार त्या दिवशी, फेसबुकवर कसे त्या निमित्ताने विनोद फिरतायत, वगैरे. शिवाय टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं सगळीकडे गुलाबी रंगाचा ताप चढला होता. सगळी जोडपी आम्ही कसे एकमेकांच्या कित्ती प्रेमात आहोत नि ते सांगायला व्हॅलेंटाइन डे कशाला हवाय, असं काही तरी सांगत होती. बहुधा ते वाचून तो असं म्हणाला असावा. मग टूम निघाली की (आपापल्या) बायकोला मिस यू असा एसएमएस करायचा. पाहू काय उत्तर येतं. एकीचं उत्तर आलं, अरे बापरे. असं म्हटल्यावर बोलणंच खुंटलं आणि त्या सहका-याला रात्री घरी गेल्यावर काय प्रतिक्रिया मिळणार, याची भीती वाटू लागली.

दुसरीने तितक्याच प्रेमाने उत्तर दिलं, लवकर ये घरी. तिने  नव-याला पाठवला एसएमएस, तर उत्तरच नाही आलं काही! काय हा थिल्लरपणा, असंही वाटलं त्यांच्या सहका-यांना. मिस यू आणि लव्ह यू काय लिहायचं वर्षानुवर्षं जुन्या नव-याला किंवा बायकोला आणि व्हॅलेंटाइन डेच कशाला हवाय वगैरे वगैरे. तिने विचारलंच मग, ‘तुम्ही रोज म्हणता एकमेकांना असं? इंग्रजी सिनेमात पाहतो तसं सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग डार्लिंग किंवा ऑफिसला जाताना/ऑफिसातून आल्यावर छान चुंबन देता का? रोज? तसं असेल तर तुम्हाला व्हॅलेंटाइन डेची गरज नाही हे मान्य.’ आता त्याचीही गरज नाही, असंही म्हणणारे काही भिडू होतेच. त्यांचं म्हणणं रोज तिच्यासाठी चहा करतो सकाळी नि ऑफिसला जायची घाई असते तर अंघोळीसाठी गरम पाणी काढून ठेवतो. कधी तरी गजरा आणतो, रात्री जेवणानंतर मागचं आवरायला मदत करतो, तीच आमची प्रेमाची भाषा. ती म्हणाली, ‘चालेल ना, अशी भाषा पण चालेल. कोणतीही भाषा वापरा, एसएमएस, डोळे, स्पर्श, विशिष्ट शब्द, कृती कशाचीही भाषा वापरा; पण आपलं प्रेम व्यक्त करा. नवरा/बायको, मुलं, आई-वडील, मित्रमैत्रिणी, या सगळ्यांवरचं प्रेम निदान त्या व्यक्तीला तरी कळेल, अशी भाषा वापरा. एवढंच.’ तुमची आहे अशी स्पेशल प्रेमाची भाषा? तुमच्या आवडत्या मधुरिमाला सांगणार ना?

Comments