विनोदाची मर्यादा

फेसबुक, ई-मेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप आदी माध्यमांतून विनोदांचा 24 तास मारा होत असतो हल्ली. पीजे म्हणजे पांचट जोक्स त्यात भरपूर असतात; बायको, सासू, आदी चावून चोथा झालेल्या व्यक्तींवरचे. आणि बाकीचे अर्थात चावट. त्यातले काही खूप खळखळवून हसवणारे, संयमित, नर्मविनोदी, हलकेच चिमटा काढणारे. पण काही असतात अश्लीलतेकडे झुकणारे. वाचून कसं तरी वाटायला लावणारे. तो विनोद पाठवणार्‍या व्यक्तीच्या मॅच्युरिटीविषयी शंका निर्माण करणारे. प्रत्यक्ष/समोरासमोर असे विनोद सांगताना बहुतांश वेळी ऐकणार्‍यांमध्ये कोण कोण आहे, याचा अदमास घेऊन ते सांगितले जातात. स्त्रिया असतील तर ही काळजी नक्की घेतली जाते. परंतु इंटरनेट वा मोबाइलवरून असे विनोद पाठवताना असं होत नाही. ते सरसकट पाठवले जातात. विनोद वाचणार्‍या व्यक्तीला अस्वस्थ वाटू शकतं, याची जाणीवही त्यात नसते. जशा अनेक स्त्रिया चावट विनोद एंजॉय करू शकतात, तसंच पुरुषांनाही असे विनोद वाचताना/ऐकताना अस्वस्थ वाटू शकतं, याकडे अशा वागण्यातून दुर्लक्ष केलं जातं.

स्त्रिया चावट किंवा अश्लील बोलत नाहीत, बोलू शकत नाहीत, त्यांना असे विनोद कळत नाहीत असं अर्थातच नाही. परंतु, त्यांना तसे विनोद पुरुषांशी शेअर करायला आवडत नाही, हे नक्की. व्हॉट्सअ‍ॅप हल्ली मित्रमैत्रिणींच्या किंवा नातलगांच्याही ग्रुपमध्ये संपर्काचं सोपं आणि स्वस्त साधन झालंय. फेसबुकवरही अनेक वयोगटातले नातलग एकमेकांचे ‘फ्रेंड्स’ असतात. त्यामुळे आपण कोणत्या ठिकाणी काय शेअर करतोय, याची काळजी घेणं अधिक आवश्यक बनलं आहे. सर्वच विनोद सर्वांशी शेअर करण्याजोगे नसतात, याची जाणीव असायला हवी. समोरच्या व्यक्तीला कसनुसं वाटेल, असं काहीही करणं चुकीचं आहे, याची स्पष्ट जाणीव आताच्या वेगवान संपर्क माध्यमांच्या जगात सर्वांनीच ठेवलेली बरी ना?  तुमचा काय अनुभव या बाबतीत? तुम्हालाही असं अस्वस्थ कधी वाटलंय का?
दरम्यान, ‘मुलगा वाढवताना’ या विशेषांकासाठी अजूनही वाचकांकडून प्रतिसाद येतोय. आम्ही या प्रतिक्रियांनी भारावून गेलोय. वेळात वेळ काढून आपले मत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Comments

  1. अगदी योग्य आहे हे. संपूर्ण समाजालाच ' नवा समंजसपणा' शिकवायला हवा. कारण विज्ञान तुम्हाला तांत्रिक बाबतीत पुढे नेतं त्याचवेळी तुमच्यातल्या नीतीमूल्यांना त्याच वेगाने सोबतीस ठेवणे अगत्याचं असलं तरी ते होत नाही. भारतीय संदर्भात हा विरोधाभास सतत पाहायला मिळतो. आपल्याकडे आर्य, शक, कुशाण , नि मोगल यांच्यानंतर ब्रिटीश आले म्हणून बरे नाहीतर आपले काही खरे नव्हते.सामाजिक सभ्यता, सभा नियम, सार्वजनिक वागण्याच्या रिती त्यानीच शिकवल्या आपल्याला.मात्र आधीच्या परक्या मंडळींनी आपल्यात रुजवलेल्या गोष्टी अशा अधुन मधुन डोकं वर काढतात..

    ReplyDelete
  2. आमच्या महान शिक्षित सर्कलमध्ये बिनधास्त असे विनोद येतात, मी एकटीच विरोध नोंदवते. त्यावरून इतरांना विचार करण्याची गोष्ट आहे असे वाटते म्हणे पण स्पष्ट पाठींबा नोंदवण्याचे धार्ष्ट्य नाही असे अलिकडे ऐकायला मिळाले :(

    ReplyDelete

Post a Comment