‘आमचं एकत्र कुटुंब आहे.’ ‘हो? कोणकोण आहेत त्यात?’ ‘आई, बाबा नि मी...’ हा विनोद अनेकदा ऐकायला मिळतो. पण त्याला वास्तवाची किनार आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. घरात आजी-आजोबा, दोन-तीन काका, आई-वडील, अनेक चुलत भावंडं, एखादी माघारी आलेली आत्या, लांबची आजी यांचं मिळून होणारं एकत्र कुटुंब एकेकाळी आपल्याकडे असायचं. त्यानंतर हळूहळू औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे या कुटुंबातील सदस्यसंख्या एकदम रोडावली. म्हातारे आई-वडील दोन-तीन मुलांच्या घरी थोडेथोडे दिवस राहायला जात, वाटणी केल्यासारखे. कालांतराने तेही दिवस बदलले. आजकाल एकच मूल, तेदेखील आधी शिक्षण आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी अशी परिस्थिती अधिकाधिक घरांमधून दिसून येते. आणि ते प्रमाण वाढतंच राहणार आहे असं सध्याचं तरी चित्र आहे. त्यामुळे आईबाप नि मूल यांचं एकत्र कुटुंब हीदेखील दुर्मिळ परिस्थिती होऊन बसणार आहे.
बदलत्या कुटुंबाच्या चित्रात एक रंग असतो सिंगल पॅरेंट्सचा.
बदलत्या कुटुंबाच्या चित्रात एक रंग असतो सिंगल पॅरेंट्सचा.
फक्त आई किंवा फक्त वडील आणि मूल अशी कुटुंबंही हल्ली अनेक दिसू लागली आहेत. (अशा घरांमध्ये आजी-आजोबा असतात अनेक वेळा, हाच काय तो फरक.) वाढते घटस्फोट हे यामागचं महत्त्वाचं कारण. पुरुष असो की स्त्री, एकटं राहणं कठीण, मनुष्यस्वभावाच्या विरुद्ध. आणि त्यात एकटा/एकटी पालक म्हणून एखादं मूल वाढवणं यापेक्षा कठीण. आणि तरीही अशी वेळ आता अनेक व्यक्तींवर येते आहे आणि त्या त्यातून आपापल्या परीने मार्ग काढत चांगलं आयुष्य जगायचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न आहे आपण, त्यांचे शेजारी, नातलग, सहकारी त्यांच्याशी कसे वागतो याचा. अशी वेळ आपल्यावर आली तर आपली या सर्वांकडून कशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा असेल याचा विचार आपण करत नाही. बहुतेक वेळा आपण अशा एकट्या पालक व्यक्तीला दुखावण्याजोगेच वागत असतो. असंवेदनशील पद्धतीने बोलत असतो.
एकट्या आईला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्याचा तर आपण सुरक्षित घरांमधली माणसं, विचारही करू शकणार नाही. एकट्या बाबाला निदान समाजपुरुषाच्या विकृत नजरेचा तरी सामना करावा लागत नाही.
म्हणूनच पुढच्या आठवड्यात जगभर साज-या होणा-या कुटुंबदिनाच्या निमित्ताने आपल्या वागणं नीट तपासून पाहायला काय हरकत आहे?
Comments
Post a Comment