मला वाटलं घरगुती भांडण...


‘आमेरिकेतल्या त्या तिघी जवळजवळ दहा वर्षांपूर्वी नाहीशा झाल्या होत्या. त्यांचे मृतदेह सापडले नव्हते, त्यामुळे त्या जिवंत असतील अशी आशा पोलिसांनाही होती आणि अर्थातच त्यांच्या घरच्यांनाही. गेल्या आठवड्यात अचानक त्या सापडल्या. एका घराचे दार आतून कोणी तरी निकराने उघडायचा प्रयत्न करताना तेथे शेजारी राहणार्‍या माणसाने पाहिले आणि त्याने पोलिसांना मदतीसाठी फोन केला. त्याने व इतरांनी मिळून दार तोडले तेव्हा त्या घरातून तीन बायका आणि एक लहान मूल बाहेर पडले. या शेजार्‍याने नंतर पोलिसांना सांगितले की, त्याला हा घरगुती भांडणाचा प्रकार वाटला. ‘न्यूयॉर्कर’मध्ये याविषयी आलेल्या एका लेखात या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. ‘घरगुती भांडण आहे,  आपण कशाला मध्ये पडायचं म्हणून मी मदत करायला गेलो/गेले नाही,’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकलेलं, क्वचित म्हटलेलंही असतं.

बाईला एक बुवा मारतोय, असं चित्र आपण सर्वांनीच अनेकदा, वेगवेगळ्या परिस्थितीत पाहिलेलं असतं. पण, त्या बाईला सोडवायला जाण्याचं आपण टाळतो, कारण आपल्याला वाटतं, त्यांचं दोघांचं घरगुती भांडण आहे. या अशा तथाकथित तटस्थ बघ्यांमुळे किती बायांचा जीव गेला असेल, भारतातच नव्हे तर जगभरात, याची गणती अशक्य आहे; पण आपण याची कल्पना करू शकतो. आपण असं भांडण पाहत राहतो किंवा चक्क पाठ फिरवून निघून जातो. कारण  आपल्याला अशा प्रकारांची सवय होऊन गेलेली असते.

त्या बाईला मारणारा माणूस आपल्यालाच मारेल किंवा म्हणेल, ‘हे आमचं आपसातलं भांडण आहे,
तू का मध्ये पडतोयस,’ याची आपल्याला भीती वाटत असते. या अपमान ऐकून घेण्याच्या ऐवजी आपण त्या मार खाणार्‍या बाईकडे पाठ फिरवतो. नंतर कळलं तिचा जीव गेला, तर हळहळतो. म्हणतो, ‘हो ना, कोणीच गेलं नाही मदतीला तिच्या.’ ‘मी स्वत: गेलो/गेले नाही,’ हे आपण सोयीस्करपणे स्वत:शीच कबूल करायचं टाळतो. आपल्यावर अशी वेळ आल्यास काय, याचा विचार आपण केलेलाच नसतो. पण असं किती दिवस चालणार, केव्हा आपण ‘मी, माझं’च्या पलीकडचं पाहणार?

Comments