ओळख

आपल्या आईवडिलांचं नाव आपण बदलू शकत नाही. आई किंवा वडील खूप मोठे कुणी असतील, सेलिब्रिटी असतील तरीही किंवा ते भ्रष्ट, गुन्हेगार असले तरीही. मुलांचं त्यात काही श्रेय नसते की त्यांचा दोषही नसतो. सुनील गावसकरचा मुलगा क्रिकेटच्या पिचवर सहज पाय ठेवू शकला असेल, पण रोवून उभा नाही राहू शकला. राजेंद्रकुमारसारख्या स्टार बापाचा मुलगा कुमार गौरवला पहिला सिनेमा सहज मिळाला, पण तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही. ही झाली अशा क्षेत्रातली उदाहरणं जिथे कामाची पोचपावती ताबडतोब मिळते. मैदानात धावा/बळी मिळतात किंवा सिनेमा बॉक्सऑफिसवर चालतो हे ताबडतोब दिसून येतं. राजकारण याहून काहीसं वेगळं. तिथेही आई किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून जनमताचा कौल घेणारे अनेक. पण ज्यांना हा कौल मिळतो त्यांना आपण उत्तम लोकप्रतिनिधी किंवा नेता आहोत हे सिद्ध करणं कठीण. तेही काही वर्षांनंतर लोकांना उमजणार. म्हणूनच राजकारण्यांच्या मुलांना राजकारणात प्रवेश सोपा असला तरी नंतरची लढाई स्वत:च लढायची असते आणि तीही इतरांपेक्षा अधिक जोमाने. औरंगाबादेत गेल्या आठवड्यात दैनिक दिव्य मराठीच्या दुसर्‍या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित प्रणिती शिंदे आणि पूनम महाजन यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला तेव्हा हा विषय निघाला. प्रणितीला कोणी विचारलं, प्रणिती वजा सुशीलकुमार बरोबर काय? त्यावर तिने दिलेलं उत्तर होतं - ‘ते माझं मधलं नाव आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. त्यांच्यामुळे मला तिकीट मिळणं सोपं गेलं हे मी नाकारलं तर मी खोटं बोलतेय असं होईल. पण निव्वळ तिकीट मिळण्यापर्यंतच हा फायदा आहे, आता मला यशस्वी आमदार होण्यासाठी इतरांपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागते. आणि ती करायची माझी तयारी आहे.’ पूनमनेही सांगितलं की पार्टीत आता अशी चर्चा आहे की प्रमोदजी परत आलेत. ‘त्यांची गादी चालवणं कठीण आहे. खूप दडपण आहे, पण मी प्रयत्न करतेय,’ असं ती म्हणाली. म्हणजेच समोरच्या व्यक्तीकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहणं महत्त्वाचं, त्याची ओळख तिला/त्याला बनवू देण्याचा मोकळेपणा आपल्यात आणायला हवा. होय ना?

Comments