नकोसा भपका


नुकतीच एका लग्नाला गेली होती ती. हॉलच्या दारात रांगोळी. पहिल्या मजल्यावर विवाह सोहळा. सनई, पेटी नि तबल्यावर प्रत्यक्ष संगीताचे सूर घुमत होते. आलेल्या बायका खूप भरजरी डिझायनर साड्यांमध्ये नव्हत्या, दागिन्यांनी मढलेल्या नव्हत्या, कुठेही श्रीमंतीचा बडेजाव नव्हता. प्रत्यक्ष लग्न लागतानाही, हिंदी चित्रपटांच्या प्रभावांमुळे आपल्याकडेही आलेल्या नव-या मुलाला उचलून घेण्याचा प्रयत्न झाला. पण मुलीने त्याला खाली उतरवल्याशिवाय हार घालणार नाही, असे ठाम सांगितल्याने त्याला तसे करण्यावाचून उपाय नव्हता. भटजींसोबत दोन्ही घरच्या हौशी नातलगांनी मंगलाष्टकेही म्हटली. लग्न लागल्यावर चक्क पाच मिनिटांत वधू वस्त्र बदलून शालू नेसून हजर झाली आणि उपस्थितांना गोड धक्का बसला. जेवणात अतिशय साधे, मोजकेच पण रुचकर पदार्थ होते. ते चविष्ट पदार्थ चाखताना तिला अनेक भपकेबाज लग्नांची आठवण झाली. देशी-विदेशी फुलापानांनी सजवलेले स्टेज, आल्याआल्या अनेक ज्यूसचा आणि स्टार्टर्सचा मारा, प्रत्यक्ष जेवणात किमान 50 पदार्थ. चायनीज, चाट, काँटिनेंटल, दक्षिण भारतीय, वगैरे वगैरे डिशेसची रेलचेल, त्या पदार्थांनी ओसंडून वाहणा-या प्रत्येकाच्या डिश आणि नंतर बरंचसं टाकून दिल्याने ओसंडून वाहणारे कच-याचे डबे. आणि हे सगळं करणारे महागडे कपडे, दागिने घातलेले पाहुणे. एकमेकींच्या साड्या आणि दागिन्यांच्या किंमतींचं मनातल्या मनात ऑडिट करणा-या बायका. या सगळ्याचे फोटो काढणारे स्पेशलिस्ट फोटोग्राफर. या आठवणीमुळे तिला हे लग्न अधिक जवळचं, आपलं वाटलं आणि तिने अधिक मनापासून वधुवरांना शुभेच्छा दिल्या.

का आपण इतके भपक्याच्या मागे लागलोय? असलेले सर्व दागिने एकाच वेळी घालून आपण काय दाखवायचा प्रयत्न करतो? दुसरीची साडी कशी कमी किमतीची आहे, हे मुद्दाम का जाणवून देतो? लग्नाला बोलावलेली सर्व आप्तमंडळी अगत्याने आली आहेत तर त्यातल्या प्रत्येकाशी दोन शब्द तरी बोलण्याएवढा वेळ देण्याऐवजी ब्यूटिशियनकडे तयार होण्यात दोन दोन तास लावून या आप्तांना तिष्ठत ठेवण्यापर्यंत आपण कसे पोचलो, याचा विचार तिच्या मनात आला. कशामुळे झाला हा बदल आणि या दिखाऊ श्रीमंतीवर औषध कसं नि कुठलं शोधायचं?

तुमच्याकडे आहे यावर औषध?

Comments