नदीकिनारी


नदीच्या काठावर वसलेली अनेक शहरं जगभरात आहेत, त्या नदीच्या नावाने ती संस्कृतीही ओळखली जाते, इतका या नदीचा प्रभाव असतो. लंडनमधील थेम्स किंवा इजिप्तमधील नाइल ही याची दोन प्रमुख उदाहरणे. भारतातही अर्थातच गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कावेरी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा आदी नद्यांच्या काठी वसलेल्या संस्कृती, शहरं आहेत. आज या नद्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांचं पाणी, असलंच तर, अशुद्ध आहे. त्यात सांडपाणी सोडलेलं आहे. ज्यांनी लहानपणी या नद्यांचं वैभव पाहिलेलं आहे त्यांना ही अवस्था पाहून अतिशय खंत वाटते; पण तरीही त्या नदीची ओढ कायम राहते. नदीच्या पुरात मारलेल्या उड्या विसरू म्हणता विसरता येत नाहीत.

सातारा जिल्ह्यातील वाईत माघ महिन्यात साजरा होणारा कृष्णा नदीचा वा कृष्णाबाईचा उत्सव ही गाव सोडून इतरत्र स्थायिक झालेल्या वाईकर मंडळींसाठी संधी असते गावाकडे पुन्हा येण्याची. जुन्या आठवणी काढून त्यात रमण्याची. कृष्णाकाठच्या सुप्रसिद्ध वांग्यांची भाजी, हल्ली सर्रास मिळू लागलेल्या पाचगणी/महाबळेश्वरच्या चविष्ट स्ट्रॉबेरी, काळ्या दाण्यांची उसळ, ताज्या उसाचा रस, खामकरकडचे पेढे, केरळा बेकरीतील बिस्किटं चाखण्याची. गेल्याच आठवड्यात या उत्सवाची सांगता झाली. त्या निमित्ताने गावातल्या महिलावर्गालाही एकमेकींना भेटण्याची संधी मिळते. सकाळी शुचिर्भूत होऊन घाटावर जाऊन यायचं, संध्याकाळी हळदी-कुंकवाला जायचं, रात्री घरचं जेवणखाण आवरून कार्यक्रमाला जायचं, दारासमोर रांगोळी काढायची, छबिन्याच्या दिवशी कृष्णाबाईची पालखी येते तिची ओटी भरायची आणि साश्रुनयनानं तिला निरोप द्यायचा, हा या दिवसांतला कार्यक्रम.

खूप गर्दी होते त्या कारणाने नको जायला म्हणता म्हणता प्रयोजनाला, म्हणजे महाप्रसादाला, वांग्याचं भरीत, आमटी-भात आणि खीर जेवायला जाणं होतंच. नदीभोवती आयुष्य गुंफण्याचे दिवस आता उरले नाहीत. धरणं बांधल्याने ऐन पावसाळ्यातही नद्यांना पाणी नसतं; पण तरीही नदीशी आपण बांधले गेलेलो असतो. तिचं ऋण पाण्याचा योग्य वापर करूनच फेडता येईल ना?

Comments