अनिश्चिततेच्या भोवर्‍यात

मला लग्न नक्की करायचंय का, कशासाठी, माझं लग्न ठरेल का, कधी, कोणाशी होईल, कसा/कशी असेल तो/ती, सासू कशी असेल, पटेल का आमचं एकमेकांशी, किती दिवस, मूल झाल्यावर काय, संसाराची आर्थिक बाजू, सेक्स, इत्यादी इत्यादी अनेक प्रश्न सध्याच्या लग्नेच्छू मुला-मुलींच्या मनात आहेत. त्यांच्या पालकांच्या मनातले प्रश्न अर्थातच वेगळे. या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार, ती स्वीकारणं त्यांना जमणार का, की आपणच आपल्या प्रश्नांवर उत्तरं शोधायची, ही सगळी अनिश्चितता सध्या विवाहसंस्थेविषयी तरुण पिढीच्या मनात आहे. सध्या जी मुलं टीनएजमध्ये आहेत, त्यांच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा तर परिस्थिती आणखीनच बदललेली असेल, असं सध्या ज्या गतीने विवाहाची वेगवेगळी रूपं समोर येत आहेत, त्यावरून वाटतंय. आपल्या प्रत्येकाच्याच ओळखीत किमान दहा मुलगे आणि दहा मुली लग्नाच्या आहेत, पण त्यांची लग्नं ठरता ठरत नाहीएत. म्हणूनच ‘मधुरिमा’चा हा दुसर्‍या वर्धापनदिनाचा विवाह विशेषांक आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. त्यातून वरील प्रश्नांची उत्तरं मिळतील असं नाही, पण प्रश्न काय आहेत ते स्पष्टपणे स्वत:शी तरी तुम्हाला कबूल करायला उद्युक्त करेल, अशी आशा आहे. एकदा प्रश्न कळला की उत्तर शोधायला सोपं जातं. आणि ते शोधायचं असेल तर काय आणि कुठे मदत मागाल, हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हा विषय ठरवला आणि संजय पवार यांचं ‘ठष्ट’ पाहायचा योग आला. मुलीचं लग्न करून टाकायचं आणि मुलाच्या लग्नाचा बार उडवायचा... हे एका पात्राच्या तोंडचं वाक्य ऐकलं आणि मनात भावनांचा कल्लोळ उडाला. नात्यातल्या, ओळखीच्या अनेक मुलांच्या आणि मुलींच्या लग्नांची आठवण झाली. या वाक्याची सत्यता पटवून देणारे प्रसंग डोळ्यांसमोर आले. ‘ठष्ट’ ही ‘ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलीची गोष्ट,’ त्यामुळे अशा मुलीही नजरेसमोर तरळून गेल्या. लग्न मुलीच्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं का? मुलगी जेमतेम शिकली, नोकरीला लागली की तिच्यासाठी मुलगा पाहायला सुरुवात होते, जणूकाही तिला हाकलून लावायची घाई असते आईबापाला. म्हणायचं मात्र, एकदा चांगल्या स्थळी पडली की आम्ही मरायला मोकळे! लग्न तिने ठरवलं तर त्याला विरोध करायचा, पारंपरिक कांदेपोहे पद्धतीने करायचं तर तिच्या मनाचा विचारच करायचा नाही, एकदा ठरलं की वाट्टेल ते झालं तरी मोडायचं नाही, लग्न करून गेली की कितीही त्रास झाला तरी तिने परत यायचं नाही हेच अजूनही बहुतांश मुलींसाठी सत्य आहे. त्यात बदल होतोय, पण हळूहळू. शिक्षण आणि नोकरी, या दोनच गोष्टींमुळे या परिस्थितीत बदल होणार आहे, एवढं नक्की.

लग्न करायचं हे मनाशी पक्कं झालं, की आंधळेपणानं पुढे न जाता विचार करून, नियोजन करून वाटचाल केली पाहिजे. मनात कसलाही गोंधळ असला तर तो आईवडील, घरातली इतर विश्वासाची माणसं, वैचारिक स्पष्टता असलेले मित्रमैत्रिणी अथवा चक्क व्यावसायिक समुपदेशक यांच्याशी त्याबद्दल बोललं पाहिजे. ‘आमची नाही का झाली लग्नं, पन्नास वर्षं एकत्र काढलीच ना?’ या खोचक प्रश्नाला, ‘आमचं वेगळं आहे, आम्हाला प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी कष्ट घ्यायची तयारी आहे,’ असं ठाम उत्तर देणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून या अंकातील समुपदेशक व कुटुंब न्यायालयातील वकील यांचे लेख उपयोगी ठरतील. मुलगे वा मुलींच्या मनात काय चाललेलं असतं, मुलगा पाहायला जाताना मनात काय असतं लग्न ठरल्यावर काय वाटतं, याची उत्तरं मिळतील तीन तरुण लेखकांच्या मनोगतांमधून. घटस्फोट हादेखील विवाहसंस्थेचा एक भाग होऊ घातलाय, कितीही नकोसा वाटला तरी अपरिहार्य झालाय. त्या अनुषंगानेदेखील एका लेखाचा समावेश अंकात आहे.

अंक वाचून तुम्हाला तुमच्या स्वत:च्या वा मुलाच्या/मुलीच्या झालेल्या/मोडलेल्या लग्नाची आठवण होईल. व्यावसायिक पातळीवर घेतलेले काही निर्णय आठवतील. या तुमच्या आठवणी प्रतिक्रियेच्या स्वरूपात आमच्यापर्यंत नक्की पोचवा, त्याचा इतर वाचकांना फायदाच होणार आहे.
शुभमंगल ‘सावधान’ का म्हणतात, याचा अंदाज येईल या अंकातून निश्चितपणे तुम्हाला.

Comments