फुलपंखी दिवस


‘अकरावीच्या वर्षात अभ्यास करताना दिसलीस तर याद राख, घरातून हाकलून देईन.’ बाबाचं हे वाक्य ऐकून अनया उडालीच. नुकतीच घराजवळच्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली होती तिने, कला शाखेत. मार्क तसे बरे मिळाले होते. आता एक परदेशी भाषा शिकायची होती आणि भरतनाट्यम पुढे चालू ठेवायचं होतं. कला शाखेत जाऊन हे उद्योग करता येणार होते, म्हणून ती खुश होती. त्यात बाबाची ही धमकी. तिला कळेना असं का म्हणतोय तो.

कला शाखेचा अभ्यास म्हणजे पुस्तकी नकोय फक्त, प्रत्यक्ष कलेचे जे आविष्कार आहेत ते पाहणं, त्यांचा अनुभव घेणं जास्त महत्त्वाचं आहे. सगळे चित्रपट, नाटकं, चित्रप्रदर्शनं सगळं पाहायचं, त्याच्यावर लिहून आलेलं वाचायचं, आपलं मत व्यक्त करायला शिकायचं, तर कला शाखेत गेल्यामुळे मिळणा-या वेळेचा उपयोग होईल, हे अनयाच्या बाबाचं लॉजिक.

गेल्या आठवड्यात दहावीचे निकाल लागले, आतापर्यंत कॉलेजचे प्रवेश झाले असतील. आमची तरुण मित्रमंडळी खूप उत्साहात असेल. नवे मित्रमैत्रिणी, नवे शिक्षक, मुख्य म्हणजे रोज नवीन छानछान कपडे मिरवण्याची संधी. पोळीभाजीचा डबा नको, हजेरीपटाचा बडगा नाही, दप्तर नाही... नावडत्या विषयांना निरोप दिलेला, आवडत्या विषयांना हॅलो म्हणायचं, कॉलेजच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घ्यायचा, एक ना दोन...

शाळा संपून कॉलेज जीवनात प्रवेश हा आपल्या आयुष्यातला निव्वळ एक शैक्षणिक टप्पा उरलेला नाही. तथाकथित धोक्याचं सोळावं वरीस लागलेलं असतं याच सुमारास मुला-मुलींना. एका संरक्षित कोषातून काहीशा मुक्त वातावरणातलं हे पहिलं पाऊल असतं. शाळेच्या बारा वर्षांतलं गणवेशाचं बंधन तर नसतंच, पण आधुनिक कपडे घालता येतील, याचा आनंद अधिक असतो, होय ना? हो, आणि मुलींना शाळेत घालाव्या लागणा-या दोन वेण्या सोडून केस हवे तसे कापता/सोडता येतात, तर मुलांनाही नवीन हेअरस्टाइल करून पाहायला मिळतात. मुलग्यांना बाइकची स्वप्नं पडायला लागलेली असतात. सिगारेटच्या धुराची किंवा बिअरच्या फेसाची चव पाहायचा अतोनात मोह होत असतो. बरेच जण या मोहाला बळीही पडलेले असतात. याच सर्व कारणांमुळे घरी आई-वडिलांशी किंवा आजी-आजोबांशी खटके उडण्याचीही शक्यता असते.

विज्ञान शाखेकडे जाणा-या, इंजिनिअर किंवा डॉक्टर होण्याची स्वप्नं पाहणा-या मुला-मुलींना मात्र आता कसून अभ्यासाला लागायचं असतं. बारावी आणि नंतर सीईटीमध्ये उत्तम मार्क मिळवल्याशिवाय हे स्वप्न सत्यात उतरणार नसतं. त्यामुळे क्लास, कॉलेज, अभ्यास हेच त्यांचं आयुष्य असतं पुढची काही वर्षं तरी. पण मेहनत केल्याशिवाय फळ मिळणार नाही, हेच वय आहे अभ्यास करायचं, तर पुढचं आयुष्य समाधानाने जगता येईल. त्यामुळे अभ्यासही मनापासून केलेला बरा, होय ना? कला किंवा वाणिज्य शाखेत जाणा-यांनादेखील अभ्यासाचे हे नियम लागू आहेत. पण त्यांचा कॉलेजमध्ये वर्गात त्या मानाने कमी वेळ जातो. मग नवीन भाषा शिकणं, अंगात एखादी कला असेल तर तिचं अधिक शिक्षण घेणं, घरातल्या कामांची जबाबदारी घेणं, आई-वडिलांना मदत करणं, जमल्यास छोटी-मोठी कामं करून निदान महिन्याचा पॉकेटमनी कमावणं, यासाठी वेळ देणं शक्य असतं.

बहुतेक सर्वच कॉलेजमध्ये ग्रंथालय अतिशय सुसज्ज असतं आणि ते आपल्याच भल्यासाठी असतं, असा विचार करून कधीमधी तिकडेही फेरी टाकायला वेळ मिळू शकतो, होय ना? ही पाच वर्षं अशी आहेत की ज्यात तुम्ही तुमच्या उर्वरित आयुष्याचा पाया रचत असता. व्यसनं कूल आहेत, काय हरकत आहे एक झुरका मारला तर वा एक पेग घेतला तर, असं वाटणं साहजिक आहे. पण या कोवळ्या वयात नशा करा एखाद्या खेळाची, लेखकाची, संगीताची, नवनवीन पदार्थांची, भटकंतीची आणि आवडता विषय झपाटल्यासारखा अभ्यासण्याची. हे सगळं करताना आई-वडिलांची, शिक्षकांची, सुजाण मित्र-मैत्रिणींची साथ कायम ठेवा म्हणजे हे फुलपंखी दिवस रंगीबेरंगी होऊन सदैव स्मरणात राहतील, होय ना?

Comments