सवय

कधीतरी कामाच्या रगाड्यात तिला गहू आणून, निवडून दळायला द्यायला वेळ नव्हता म्हणून तिने तयार कणीक आणली. फुलके चांगले झाले, घरातलं कोणी काही बोललं नाही. मग तिने परत कधी गहू आणायचा विचारच केला नाही.

कुडत्याला मॅचिंग सलवारचं कापड नाही मिळालं म्हणून तिने होजियरीची लेगी घेतली. ती इतकी कम्फर्टेबल वाटली तिला. शिवाय नाडी सोडायचं/बांधायचं टेन्शन नाही. आणि इस्त्रीही नको करायला. मग कपाटातल्या सलवारींची संख्या कमीच होत गेली.

अचानक मुलगी म्हणाली, आज डोसे खायचेत. तिला म्हटलं, ‘अगं त्यासाठी डाळ-तांदूळ भिजवावी लागते पाच-सहा तास, मग ते वाटायचं, ते पाच-सहा तास आंबल्यानंतर डोसे करता येतात.’ तर म्हणाली, ‘कशाला एवढा त्रास? मिळतं ना दुकानात तयार पीठ, ते आण की. शिवाय ते रगड्यावर वाटलेलं असतं, एकदम ऑथेंटिक साउथ इंडियन स्टाइलने.’ ते विकत घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता तिच्यासमोर. घरी वाटलेल्या पिठाचे डोसे कधी केले ते आठवायलाच लागेल तिला.

गरम मसाला, काळा मसाला, सांबार व रसम मसाला हे सगळे ती अगदी आताआतापर्यंत घरी करायची, ते तिचे अगदी ट्रेडमार्क होते. इतके की तिने केलेला मसाला घालून आमटी केली की वासावरून ओळखता यायचं. पण कधीतरी घाई होती, मसाला संपला म्हणून घरगुती मसाले/पिठं करून विकणा-या काकूंकडून आणला. त्यानंतर तिने घरी केलाच नाही कोणताच मसाला. मग कधीतरी चिरलेल्या भाज्या, सोललेली लसूण, किसलेलं गाजर, आलंलसूण पेस्ट असं रेडीमेड काहीबाही घरात येऊ लागलं. या सगळ्या सोयींमुळे तिला थोडा वेळ स्वत:साठी मिळू लागला, हे नक्की. पण कधीतरी तिला मनात अपराधी वाटे खूप. कधी वाटे, कसं याआधी आपण हे सगळं घरी करत होतो, एवढा पसारा घालत होतो. ते करण्यात आनंदही होता. घरी केलाय हं मसाला, असं म्हणताना किती छान वाटायचं. मुलीलाही त्यामुळे माहीत होतं की कणीक गव्हाची असते, मसाले घरी करता येतात, डोसा हे फास्टफूड नाही!

मग रेडीमेडची इतकी कशी सवय होऊन गेली आपल्याला, की आता कशाचाही घाट घालायला कंटाळाच येतो, नकोसं वाटतं अगदी? कशामुळे?

चुकतंय का तिचं काही?

Comments