बंधन


पुतणीच्या 13व्या वाढदिवसाला तिने बाथरोब भेट दिला तेव्हा जाऊबाई जरा वैतागल्याच होत्या. पण अंघोळीनंतर त्या ओल्या, गरम न्हाणीघरातच पूर्ण कपडे घालणं किती जिकिरीचं असतं, हे तिला माहीत होतं. त्यावर बाथरोब हाच एक पर्याय होता. ज्या घरांमध्ये शयनगृहात न्हाणीघर असतं, तिथे प्रश्न नसतो. पण लहान घरांमध्ये बायकांना किती त्रासाचं होतं, विशेषत: उन्हाळ्यात. पुरुषांसारखं नुसता कमरेला टॉवेल गुंडाळून बाहेर नाही ना पडता येत. बायकांना नुसतं कपडे बदलतानाच नाही काही, पण जरा साडी वर गेली, फ्रॉक गुडघ्याच्या वर गेला, वा-याने कुडता उडाला तरी लगेच तो खाली खेचा. अर्धं लक्ष त्याकडेच. काय झालं कुडता उडाला थोडा तर, आत सलवार/जीन्स असतेच ना? आणि फ्रॉक घालणा-या मुलींचं वय असतं सहा ते सात वर्षांपर्यंत.

तिच्या एका मावशीने तर तिची मुलगी आठ-नऊ वर्षांची असतानाच सलवार-कुडते शिवले होते तिच्यासाठी, ती जमिनीवर बसताना आवरून नाही बसायची म्हणून. म्हणजे माणसाने अजागळ, अस्ताव्यस्त, अव्यवस्थित नसावं हे मान्यच. पण सारखा किती शिस्तीचा बडगा दाखवायचा मुलींना? मुलग्यांना/पुरुषांना हे नियम अजिबातच लागू नसतात. कपडे बदलायचे झाले तरी टॉवेल गुंडाळला कमरेला की काम झालं. कोण समोर आहे, याचा विचारदेखील अनेक पुरुष करत नाहीत. बायकांना असं सर्वांसमोर कपडे बदलायला मिळावं, असा अर्थ नाही याचा. पण त्यांच्यावर किती बंधनं आहेत, त्याचा तिला राग येऊ लागला होता. पंजाबी ड्रे स घातला, अंगकाठी सुडौल असली, तरी त्यावर ओढणी हवीच. शक्यतो बिनबाह्यांचे कपडे नकोत, वगैरे वगैरे.

तिला बायकांना उघडंनागडं राहायची परवानगी नकोय. त्यांच्या मनावर सतत असलेला हा ताण आहे, तो तिला दूर करावासा वाटतोय. शाळेत वर्गात उत्तर द्यायला उभं राहिल्यानंतर बाकावर बसायच्या आधी हाताने स्कर्ट सावरून मगच बसायची सवय होती सगळ्याच मुलींना. हातांना जी सवय लागलीय ते सावरायची, विचार न करताही हात तेच करतात, इतकं ते भिनलंय मुलींच्या आणि बायकांच्या विचारात. ते नकोसं झालंय तिला इतकंच.

Comments