सात्त्विक दिवस

काल रमजानचा पवित्र महिना सुरू झालाय, पुढच्या शुक्रवारी चतुर्मासाला सुरुवात होईल. घरोघरी या सात्त्विक दिवसांमध्ये काही वेगळे नियम लागू होतात. काही जण कांदा/लसूण/वांगं खात नाहीत, मांसाहार बंद करतात. अनेक बायका वेगवेगळी व्रतं करतात, एखादा आवडीचा पदार्थ चार महिन्यांसाठी त्यागतात. एकभुक्त राहतात, परान्न खात नाहीत, वगैरे वगैरे. प्रत्यक्ष श्रावणात तर आणखीही काही नेम असतात. बरेच सणही या काळात येतात. त्यामुळे एकीकडे उपास, तर दुसरीकडे सणांची विशेष पक्वान्नं. नागपंचमीची दिंडं, नारळी पौर्णिमेचा नारळी भात/करंज्या/नारळाच्या वड्या, गोकुळाष्टमीचा गोपाळकाला, गणपतीत उकडीचे/तळलेले मोदक, ऋषिपंचमीची भाजी वगैरे. वेळोवेळी होणा-या पुरणपोळ्या आहेतच. रमजानमध्येही दिवसभर उपास असतो, त्यामुळे पहाटे संध्याकाळी पौष्टिक/सात्त्विक खाणंच असतं घरात. हा उपास सूर्यास्तानंतर सोडायचा, तर श्रावणी सोमवारचा सूर्यास्तापूर्वी. फळं, सुका मेवा, वगैरे. श्रावणातल्या उपासाला अनेक घरांमध्ये धान्यफराळ करतात, म्हणजे वेगवेगळी धान्यं भाजून त्याचे केलेले पदार्थ. मंगळागौरीला संध्याकाळचा बेत असतो मटकीची उसळ, मसालेभात, मिश्र धान्यांच्या भाजणीचे वडे.

आषाढी एकादशीला म्हणतात देवशयनी एकादशी. म्हणजे या दिवशी देव झोपी जातात, चार महिन्यांसाठी. त्यांनाही पाऊस नकोसा होतो की काय, म्हणजे आपल्याला जसं बाहेर पाऊस पडत असताना पांघरुणात गुरफटून पडून राहावंसं वाटत असतं, तसंच काहीसं? देवाला असं माणसासारखं वागवणारे आपण. त्याला अंघोळ घालतो, नैवेद्य दाखवतो, त्याची रंगांची आवडनिवड ओळखून त्या त्या रंगाची फुलं वाहतो, एवढंच काय, त्याचा वाढदिवसही साजरा करतो. (आणि त्याच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा देतो एसएमएस करून हॅप्पी रामनवमी असा!) वाढदिवसानिमित्त सुंठवडा वगैरे करून वाटतो सर्वांना. (आसामातील कामाख्या देवी तर वर्षातून एकदा तीन दिवस रजस्वलाही होते, असे मानतात. हे तीन दिवस मंदिर बंद असते आणि नंतर तिच्या रक्ताने पवित्र झालेले लाल कापड तिचा प्रसाद म्हणून घरी नेले जाते.)

तर अशा आपल्यासारख्याच देवांच्या सान्निध्यात काही काळ कंठण्याचे हे दिवस. उरलेले दिवस आपण त्याच्यासारखे वागण्यासाठी असतातच की. हो ना?

Comments