७७ नव्हे ३६

15 दिवसांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, विम्बल्डनची पुरुषांची अंतिम फेरी तिला पाहायला मिळाली. म्हणजे, तिने ती विनाअडथळा पाहता येईल, अशी परिस्थिती निर्माण केली आणि तब्बल तीन तास अँडी मरी आणि नोवाक जोकोविच यांच्यातला सामना डोळे भरून पाहिला. जवळजवळ 40 अंश से. तापमानात खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोघेही तोडीस तोड होते. मरी आणि इतिहास यांच्यामध्ये केवळ जोकोविच होता, 77 वर्षांपूर्वी फे्रड पेरी यांनी विम्बल्डन पुरुष एकेरी सामना जिंकल्यानंतर एकाही ब्रिटिश खेळाडूला या चषकावर नाव कोरता आले नव्हते, त्यामुळे तमाम ब्रिटिश मंडळी, अगदी राणी आणि पंतप्रधान यांच्यासह, त्याच्या विजयासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत, अशा बातम्या सामन्यापूर्वी तिने वाचल्या होत्या. पण नंतर इंटरनेटवर काही न्यूज साइट्स चाळताचाळता जे वाचायला मिळालं त्याने ती चकित झाली. त्यात अशी माहिती होती की 1977मध्ये व्हर्जिनिया वेड या ब्रिटिश खेळाडूने विम्बल्डन महिला एकेरी किताब जिंकला होता. तरीही, एखाद्दुसरा सन्माननीय अपवाद वगळता, एकाही प्रसिद्धिमाध्यमाने मरी हा 36 वर्षांनंतरचा पहिला ब्रिटिश खेळाडू असे लिहिलेले/म्हटलेले तिने वाचले/ऐकले नाही. सर्वांचा सूर हाच की 77 वर्षांनंतर विम्बल्डन जिंकणारा मरी हा पहिला ब्रिटिश खेळाडू.

ज्या विम्बल्डनला इतकी प्रतिष्ठा आहे, चार ग्रँड स्लॅम स्पर्धांमधली हिरवळीवर खेळली जाणारी ती एकमेव आहे, जिला सव्वाशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे, ती जिंकणारी एक महिला आपल्या देशाची आहे, हेच ब्रिटिश आणि इतर देशांतली माध्यमे विसरली यावर विश्वास कसा ठेवायचा? मरी हा पहिला ब्रिटिश पुरुष खेळाडू असे यांपैकी बहुतेक प्रसिद्धिमाध्यमांनी स्पष्ट केलेले नाही. सर्वांनी 77 वर्षांपासूनच्या (चषकाच्या) दुष्काळाचाच हवाला दिला आहे.

व्हर्जिनिया सध्या 67 वर्षांची आहे, तिला हे सर्व वाचून काय वाटले असेल? आपण कमावलेले लखलखीत यश असे निव्वळ पुरुषप्रधान संस्कृतीमुळे अदृश्य झाल्याचे पाहून तिची काय अवस्था झाली असेल? ती चिडली असेल, निराश झाली असेल की चालायचंच, जग हे असंच आहे, असं म्हणून गप्प बसली असेल? काय वाटतं तुम्हाला?

Comments