प्रतिक्रिया की प्रतिसाद ?

बसमध्ये ब-यापैकी गर्दी होती. अचानक एका बाईची किंकाळी ऐकू आली, ई ऽऽ. लोकांनी तिच्याकडे वळून पाहायच्या आतच ती जागेवरून उठली आणि आता काय करू नि कुठे जाऊ अशा आविर्भावात उभी राहिली. हे सगळं का झालं कोणालाच कळेना. तेवढ्यात कोणाला तरी तिच्या पर्सवर असलेलं झुरळ दिसलं. ते दिसल्यावर आणखी दोघीतिघी किंचाळायला लागल्या. शेवटी एका तरुण मुलाने त्या झुरळाला चिमटीत पकडून बसबाहेर फेकून दिलं. झुरळच नव्हे तर कोळी, गांडूळ, गांधीलमाशी असे जीवही अनेक बायकांना किंचाळायला लावू शकतात.

खरं आहे का हे? हे जीव बायकांना किंचाळायला लावतात की बायका त्यांच्या मानसिकतेमुळे किंचाळतात आणि तमाशा करतात? जर तो जीव खरेच धोकादायक असेल तर पुरुषाला व अन्य बायकांनाही तो धोका वाटला पाहिजे. सर्वांची प्रतिक्रिया समान असली पाहिजे. परंतु तसे आपल्याला दिसत नाही. मग हा फरक कशामुळे असतो? ब-याचदा दिसून येते की बायका अशा प्रसंगात प्रतिक्रिया देतात, प्रतिसाद नाही. प्रतिक्रिया देताना विचार नसतो, त्याचा परिणाम काय होईल याचीही जाणीव नसते. पण प्रतिसाद वेगळा, मॅच्युअर असतो. झुरळ दिसलं की किंचाळणं ही प्रतिक्षिप्त क्रिया झाली, चटका लागल्यावर हात मागे येतो तशी. झुरळ दिसलं की तत्काळ किंचाळणं आपल्या हातात असतं. तसंच ते केवळ एक झुरळ आहे, ते आपल्याला काही करू शकत नाही, आपण त्याच्यापेक्षा शक्तिवान आहोत, एका फटक्यानिशी आपण त्याला मारू शकतो, हा विचार करून शांत राहणंही आपल्याच हातात असतं.

झुरळ एक क्षुल्लक गोष्ट आहे असं वाटतं आपल्याला, पण अशाच अनेक गोष्टी असतात ज्यांना आपण महत्त्व देतो, ज्यांच्यामुळे आपला मूड खराब करून घेतो, संतापतो, अद्वातद्वा बोलतो. तिच्यामुळे माझा मूड गेला, त्याच्यामुळे मला राग आला, त्याच्यामुळे मला उशीर झाला, अमुकमुळे मला नोकरी नाही मिळाली, वगैरे. आपल्याला राग येतो, तो आपल्यावर, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो, हे लक्षात घेतलं तर आपल्या आयुष्यातले ताणतणावाचे क्षण कमी होतील. कदाचित आनंदाचे, समाधानाचे क्षण वाढतीलही. काय वाटतं तुम्हाला?

Comments