यशस्वी महिलांचे 11 मंत्र


यश म्हणजे काय असते बरे? मानसिक समाधान, आरोग्यपूर्ण जीवन, हाताला पुरेसे व आनंद देणारे काम, त्यातून मिळणारा पुरेसा पैसा, स्वत:साठी व कुटुंबासाठी वेळ. यात कदाचित तुम्हाला काही वैयक्तिक मुद्दे जोडावेसे व वगळावेसे वाटेल; पण सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीकडे हे सगळं असतं तेव्हा तो/ती यशस्वी असतो/ते असे आपण म्हणू शकतो. यश म्हणजे काय याचे आपल्यापुरते उत्तर सापडले की पुढचा प्रश्न पडतो. यशस्वी होण्याचा मंत्र कोणता? त्याचा एक नव्हे, 12 मंत्र आहेत. ते रोज जपावे लागत नाहीत, तर पाळावे लागतात. कोणते हे मंत्र?

त्यांना त्यांचे काम प्रचंड आवडत असते, त्याखेरीज त्यांना काही सुचत नसते. काम आवडीचे असेल तर कामात जाणारा वेळ आनंदाचा असतो. काम अधिकाधिक चांगले कसे होईल, त्यात नावन्ीय कसे आणता येईल, असा विचार त्या करत असतात.

पूर्णत्व म्हणजे परफेक्शन. कोणतीही गोष्ट अमुक एका पद्धतीने, अमुक एका वेळेतच झाली पाहिजे, त्यात कुठेही कसूर चालणार नाही असे वाटणे म्हणजे परफेक्शन. आणि यशस्वी महिला नेमके हेच टाळतात. परफेक्शनची हाव धरली की सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार, हे त्यांना ठाऊक असते. प्रत्येक फुलका फुगलाच पाहिजे यापासून गाडी अशीच धुतली गेली पाहिजे, रोज संध्याकाळी पाच वाजता मुलाला पौष्टिक नाश्ताच मिळाला पाहिजे व कार्यालयात कागदपत्रे एकाच प्रकारे फाइलला लावली गेली पाहिजेत यापर्यंत परफेक्शनची हाव असू नये. जे आपल्याला जमते ते मनापासून करावे, इतर चक्क सोडून द्यावे.

आपणच एखाद्या ठिकाणी बॉस असलो तर काम करणे सोपे जाते, आपले नियम बनवता व वापरता येतात, हे या यशस्वी महिलांनी ओळखलेले असते. अधिक गोष्टींवर आपले नियंत्रण असते जेणेकरून आपण स्वत:साठी व सहका-यांसाठी आनंदी व समाधानी कार्यालय निर्माण करू शकतो.

कोणत्याही यशस्वी महिलेचा पती 100 टक्के तिला साथ आणि पाठिंबा देणारा असतो; परंतु अनेक महिला अविवाहित राहतात आणि तरीही यशस्वी होतात. महत्त्वाचे हे की पतीची साथ असेल तर यश अधिक सोपे असते. म्हणजेच यशासाठी विवाह आवश्यक नाही; परंतु विवाहित असाल तर पतीची पूर्ण साथ हवीच.

आपली कल्पना कितीही वेड्यासारखी असली तरी ती यशस्वी होणारच, मी ती यशस्वी करणारच यावर या महिलांचा विश्वास असतो. कसं होईल, कोणाला आवडेल का, जमेल का, लोक काय म्हणतील या प्रश्नांना या महिलांकडे थारा नसतो.

मला भीती वाटली नाही तर मी काय करेन, खरे तर काय काय करू शकेन हा प्रश्न सर्वच महिलांनी स्वत:ला विचारला पाहिजे. परिस्थितीत व स्वत:मध्ये बदल घडवायचा असेल तर टप्प्याटप्प्याने धोका पत्करणे, जोखीम उचलणे आवश्यकच आहे. चाकोरीबद्ध वाटचालीऐवजी विचारपूर्वक पत्करलेला धोका यशाकडे घेऊन जातो.

नियमित व्यायाम, वेळेवर खाणे/झोप हे यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक आहे, हे या महिलांना पटलेले असते. त्यामुळेच त्या त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतात, प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत नाहीत.

प्रत्येकालाच जीवनात अनेक गोष्टी करायच्या असतात. नवीन भाषा, गाणे, बागकाम, भटकंती, पाककला आणि इतर अनेक गोष्टी आपल्या करावयाच्या यादीत असतात. त्यातल्या काही कधीच पूर्ण होणार नाहीत, याची वास्तव जाणीव यशस्वी महिलांना असते. एका टप्प्यावर त्यातल्या काही गोष्टींवर फुली मारणे योग्य ठरते, त्याने ताण कमी होतो.

‘मधुरिमा’च्या एका ‘कव्हर स्टोरी’त नुकतेच आपण वाचले होते की साप्ताहिक सुटीच्या दिवशी कुटुंबासाठी वा घरासाठी वेळ देणे म्हणजेच स्वत:साठी वेळ देणे असे बहुतांश महिलांना वाटते; परंतु खरे तर कामाच्या बैठका, बालसंगोपन, घरगुती समारंभासाठी जसा आपण वेळ काढतो तसा स्वत:साठी काढणे यशस्वी महिलांना महत्त्वाचे वाटते आणि तसा त्या काढतात. त्या वेळात तुम्ही केवळ तुम्हाला स्वत:ला जे करायचे आहे तेच करायचे. एक वेळ बैठक रद्द करा, एखाद्या साखरपुड्याला जाऊ नका, पण हा स्वत:चा वेळ रद्द करू नका.

जुन्या मित्रमैत्रिणींना जपून ठेवावे आणि नवीन मित्रमैत्रिणी जोडत राहावे. यशस्वी महिलांनी हवीहवीशी सकारात्मक नाती जपलेली असतात.

कोणत्याही महिलेचे यश एका पोकळीत निर्माण होत नसते. त्यांना घरी आणि कार्यालयात अनेक जणांचा आधार, पाठिंबा, साथ मिळत असते. आणि या महिला या सर्वांचे ऋण मान्य करतात, त्यांचे आभार मानतात, त्याची योग्य रीतीने परतफेड करतात.
तसे पाहायला गेले तर हे मंत्र अशक्य नाहीत, फारसे कठीणही नाहीत. फक्त स्वत:च्या मनाला पटवून देण्याची आवश्यकता आहे की मला यशस्वी व्हायचंय. आजपासूनच करायची ना सुरुवात हे मंत्र अमलात आणायला?

(www.huffingtonpost.com वरील एका लेखाच्या आधारे)

Comments