हे बदलायचं ना?

तिच्या घरी धुणी-भांडी करायला येणारी मदतनीस बाई लक्ष्मी. तिचा नवरा (दारू पिणारा होता, हे सांगायला नकोच) आजारी पडला. आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहून, साठ-सत्तर हजार रुपये उपचारावर खर्च झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, आता याची काही गॅरंटी नाही. लक्ष्मी तामिळनाडूमधल्या एका छोट्याशा गावातली, दहावी शिकलेली आणि लग्नानंतर मुंबईत आलेली. नवरा कामावर नीट जात नाही हे लक्षात आल्यावर, बिचारी दोन मुलांकडे पाहून घरकाम करू लागलेली. डॉक्टरांनी असं सांगितल्यावर तिने ठरवलं त्याला गावाला न्यायचं. तिथे नातलग आहेत आणि हवाही मुंबईपेक्षा बरी, असा विचार तिने केला आणि ती त्याला घेऊन गेली. जाताना जिथे काम करायचे, तिकडनं दहा दहा हजार तरी उसने घेतलेलेच होते. काही तरी करून मी परत करीन पैसे, हा तिचा विश्वास.

लक्ष्मीचा धाकटा मुलगा मूकबधिर. त्याला घरापासून बर्‍यापैकी लांब असलेल्या अलियावर जंग इन्स्टिट्यूटमध्ये नेऊन उपचार करून घेणारी लक्ष्मीच. त्याला जवळच्या महापालिकेच्या स्पेशल मुलांसाठीच्या शाळेत रोज वेळेवर पोहोचवणारी व घरी आणणारी तीच. आणि अनेक घरी कामं करून घर चालवणारी तीच. नवर्‍याला लांबच्या सरकारी हॉस्पिटलात ठेवलं असतं तर पैसे वाचले असते हे तिला माहीत आहे; पण मग तिला कामावर जाता नसतं आलं. आणि तिच्या मुक्या मुलाला कोणी सांभाळलं असतं, या विचाराने तिने पैसे उधार घेतले; पण त्याला जवळच्या हॉस्पिटलात ठेवलं. हे सगळं आपण काम करू आणि पैसे भरून काढू या जोरावर.

अशा किती लक्ष्मी आपल्या पाहण्यात असतात. त्यांच्याशी आपण कसं वागतो? आपण कामावर जात असताना अशी वेळ आपल्यावर आली तर आपण ऑफिसकडून, सहकार्‍यांकडून, बॉसकडून कशाची अपेक्षा ठेवतो? मग त्याच अपेक्षा लक्ष्मीने आपल्याकडून ठेवल्या तर तिची चूक नाही ना? आपल्याला वर्षातून सगळ्य्या मिळून किमान महिनाभर भरपगारी रजा असते, पण लक्ष्मी तीन-चार दिवसांहून अधिक कामावर आली नाही की आपण तिचा किती सहजपणे पगार कापतो. हे बदलायची वेळ आलीये ना आता?

Comments