खरेदीच्या खास जागा

लग्न होईपर्यंत मी फारशी मुंबई सोडून फिरलेले नव्हते. गेलंच तर कोकणात आजोळी, आणि वाई किंवा मनमाडला काकांकडे. एकदोनदा गोव्याला गेलो होतो बाबांच्या मित्राकडे. पण तेवढंच. तेव्हा बाहेर गेलं तरी खरेदी हा विषय नसायचाच डोक्यात. सगळी भावंडं भेटल्यावर धम्माल करायची, एवढंच. सासर मध्य प्रदेशातलं होतं. पहिल्यांदा जेव्हा जबलपूरला गेले तेव्हा तिथलं लखनवी कपडय़ांचं दुकान पाहून हरखून गेल्याचं आठवतंय. तोपर्यंत नोकरीही लागली होती त्यामुळे हातात थोडे पैसेही खेळत होते. इकडे मुंबईत लखनवी ड्रेस घ्यायचा तर तेव्हा क्रॉफर्ड मार्केटजवळचं लखनवी हाउस हे एकदम दुकान होतं. ते इतकं महागडं होतं की तिथे फार कमी खरेदी होई. त्यामुळे जबलपूरचे ते दुकान पाहून मी वेडय़ासारखी ड्रेसची कापडं, टॉप, साडय़ा घेत सुटले. आजही तिथे कितीही घाईत जाणं झालं तरी लखनवी दुकानाची फेरी चुकत नाही.

नंतर एकदा इंदूरला गेले. तेव्हा तर वेड लागलं होतं मला. मृगनयनी या मध्य प्रदेश हातमाग विभागाच्या दुकानात महेश्वरी, चंदेरी, बाटीक यातली किती व्हरायटी होती. किती रंग, किती पोत आणि किती वेगवेगळय़ा प्रकारचे छाप. मुंबईतही मृगनयनीचे शोरूम आहे परंतु वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये. तिथपर्यंत पोचणेच महामुश्कील. मग इंदूरच्या कापड बाजारात गेले एकदा जावेबरोबर. ती तिथलीच राहणारी आणि हौशी. भरतकाम वगैरे करणारी. त्यामुळे तिथली निवडक दुकानं तिला बरोबर माहीत. या बाजारात काही दुकानं अशी आहेत, जिथे वजनावर कापडं मिळतात. जी तलम कापडं असतात, ती खूप स्वस्त मिळतात तिथे. याच बाजारात परकर, तयार ब्लाउज, ओढण्या खूप स्वस्त मिळतात. खेरीज घरी रात्री घालायचे गाउनही खूप विविध प्रकारचे मिळतात. इंदूरपासून जवळ असलेल्या म्हऊ येथे स्मॉकिंगचे कपडे मिळतात. स्मॉकिंगचे गाउन आणि लहान मुलींचे फ्रॉक खूप सुंदर दिसतात.

पहिल्यांदा मी काशी/वाराणसी/बनारसला गेले काही घरगुती कार्यासाठी. जेमतेम दोन दिवस आम्ही तिथे होतो. पण तिथेही अनेक वर्षांपासून राहणाऱया आमच्या मामींच्या ओळखीने एका जबरदस्त आडत्याकडे जाणं झालं. आम्हाला साधारण काय हवंय, ते विचारून या राजेंद्रभैयाने तीनचार विणकर कारागीरांना साडय़ा घेऊन दुकानावर बोलावलं. त्यांनी स्वता विणलेल्या साडय़ा इतक्या भारी होत्या की मला एकही साडी रिजेक्ट करवेना. खास बनारसी विणकाम, नजरेत भरतील असे रंग, सुंदर नक्षीकाम, कापडाचे वेगळे पोत. इतकी व्हरायटी मी पहिल्यांदाच पाहात होते आणि भारून गेले होते. बरं किमती विचाराल तर मुंबईतल्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी. त्यामुळे माझ्या लग्नातल्यापेक्षा जास्त खरेदी करून मी मुंबईला परतले. राजेंद्रभैयाकडे आपल्या मराठी बायकांच्या फेवरिट कलकत्ता साडय़ा पण मस्त मिळतात. तसंच लग्नात/मुंजीत घ्यावयाचा रेशमी बनारसी शेला तिथे फार संदर मिळतो. बहुतेक शेले नंतर दुपट्टा म्हणूनही वापरता येतात. साडय़ांखेरीज बनारसला घेतलीच पाहिजे ती म्हणजे आर्टिफिशियल ज्युलरी. काशीविश्वेश्वराच्या देवळाच्या आसपास असलेल्या दुकानांच्या रांगांमधून गर्दीमुळे वाट काढता येत नाही. आणि दुकानात शिरल्यावर काही घेतल्याखेरीज बाहेर निघता येत नाही. नाजूक ते ठसठशीत अशा सर्व प्रकारच्या बांगडय़ा, गळय़ातली, साडी पिना, ब्रूच, कानातली आणि बरंच काही तिकडे मिळतं. किमती मुंबईच्या नव्हेत, बनारसच्याच.

या वर्षाच्या सुरुवातीला जयपूरला गेले होते, जयपूर लिटररी फेस्टिवलसाठी. पाच दिवस होते, पण दिवसभर काम खूप होतं आणि रात्री कुडकुडणाऱया थंडीत खरेदी वगैरे कठीणच होती. पण जयपूरला जायचं आणि बांधणी न घेता परत यायचं, हा डाग मला लावून घ्यायचा नव्हता. तिथल्या एका पत्रकार मित्राला बरोबर घेतलं नि गेलो बापू बाजारात. बांधणीचे पण किती प्रकार होते. सुती कापडावरची, रेशमी, नायलॉन, ओढणी नि सलवार लहरिया असलेली, टिकलीकाम केलेली... वा. आणि ते नजरेत भरणारे रंग. लाल, केशरी, हिरवा, पिवळा. खूप छान वाटलं रंगांचा चॉइस करताना. शिवाय जयपुरी कॉटन म्हणतात त्यातली ड्रेस मटीरिअल होतीच. आणि चादरी आणि दुलया/रजया. गोल डिझाइनचे स्कर्ट. पतियाळा सलवार नि ओढणीचे सेट. आणि चामडय़ाची जूती. खेरीज रस्त्यावर हातगाडीवर एक माणूस घरी घालायच्या उबदार सपाता विकत होता. त्या तर चारपाच घेतल्या, इतक्या छान नि स्वस्त होत्या. मुंबईला परत येताना एक मित्र होता, म्हणून सामान नीटपणे पोचलं तरी.

एका परदेशी मैत्रिणीसोबत कोलकात्याला गेले होते. तिकडे खरेदी म्हणजे अर्थातच कलकत्ता साडय़ांची. पण चामडय़ाच्या पर्स, बॅग्ज, पट्टेही तिथे खूप चांगले मिळतात. श्री लेदर्स नावाचं दोनमजली चपलांचं दुकान आहे ग्लोब सिनेमाजवळ. तिथे म्हणे, दुर्गापूजेच्या आधीच्या दिवसांत किलोमीटर लांब रांग असते, खरेदीसाठी! खेरीज खाऊगिरीला खूप वाव आहे, तोही रस्त्यावर, स्वस्त आणि मस्त. मी फेब्रुवारीत गेले होते तेव्हा खूप ताजे हिरवेगार पेरू होते. तिथला समोसा, पुरीभाजी, झालमुरी म्हणजे राईच्या तेलातली कुरमुऱयाची सुकी भेळ, अडीचतीन रुपयांना मिळणारा चहा आणि बंगाली मिठाई घरी आणू नका एक वेळ पण तिथे खाऊन नक्की बघा. तिथली पेस्ट्री शॉप्स पण खूप मस्त आहेत. कोलकात्यात पुस्तकांची खूप दुकानं आहेत. या शहरात पायी फिरायला खूप मजा येते, आपलंच गाव आहे असं वाटतं.

दिल्लीचा उल्लेख खरेदी संदर्भात नाही झाला तर ते दिल्लीचा अपमान केल्यासारखं होईल. दिल्लीत अगदी रस्त्यापासून वातानुकूलित पॉश खरेदीला वाव आहे. रस्त्यावरची कपडे आणि चपलांची खरेदी म्हणजे सरोजिनी मार्केट, जनपथ मार्गावरचं मार्केट इकडे उत्तम. खूप व्हरायटी असते तिथे. तिकडे घेतलेला टॉप मुंबईत घातला तर हमखास विचारणा होते, कुठे घेतला म्हणून. दिल्ली हाटदेखील खरेदीसाठी बेस्टच. देशातल्या सर्व राज्यांच्या हातमाग उत्पादनांची दुकानं इथे आहेत, ती थोडय़ा दिवसांनी बदलत असतात. खेरीजी बहुतेक राज्यातले विशेष पदार्थही इथे खायला मिळतात. दिल्ली हाटमध्ये जाऊन रिकाम्या हाताने परतणारा माणूस नसावाच. खान मार्केटही इथलं प्रसिद्ध मार्केट पण थोडं महागडं कारण तिथे ब्रँडेड दुकानं आहेत. पालिका बाजारही पूर्वी खूप नावाजलेला होता, पण आता त्याची मजा उरलेली नाही. दिल्लीतल्या वास्तव्यातला एक अख्खा दिवस चांदनीचौकसाठी ठेवायला हवा. आणि पायी फिरायची तयारी हवी. तिथल्या गल्ल्यांमध्ये अनेक वस्तू तयार होतात, त्यामुळे अतिशय स्वस्त मिळतात. फक्त भुरटय़ा चोरांपासून सावध राहायला हवं.

खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, असं मी मनाला नेहमी बजावत असते. जे मुंबईत मिळतं ते मी बाहेर विकत घेणार नाही, शक्यतो सामान वाढवणार नाही. पण होतं काय, या वस्तूंच्या किमती मुंबईपेक्षा इतक्या कमी असतात ना की राहावतच नाही हो...
(first published in Kalnirnay almanac.)

Comments