जेनेटिक घड्याळ

काही लोक असतात जे सकाळी लवकर, खरं तर भल्या पहाटे उठून कामाला लागतात. गजराशिवाय उठतात, गरजेशिवायही उठतात, सुटी असली तरी उठतात. काही लोक असतात जे सूर्य चांगला हातभर डोक्यावर आल्याशिवाय डोळे उघडू शकत नाहीत. गरज असेल तेव्हाच गजर ठणठणल्यावर उठतात, आळसावलेल्या मनाने आणि चेहर्‍याने कामाला लागतात. पहिल्या वर्गातल्या लोकांची रात्रही जरा लवकर होते आणि दुसर्‍या वर्गाचे लोकांची रात्र मध्यरात्रीशिवाय होत नाही. कधीकधी रात्री उशिरा झोपण्यामागे कामाच्या वेळा असतात, उदा. सेकंड शिफ्ट. पण तसे नसेल तरीही खरे तर या लोकांना रात्री जागायला जास्त आवडतं. यांचा अभ्यासही पहाटे उठून करण्यापेक्षा रात्री जागून जास्त चांगला होतो. पण लवकर निजे लवकर उठे वगैरे सुविचार आपल्याकडे फार प्रसिद्ध असल्याने दुसर्‍या वर्गातल्यांची गोची होते. नेहमी उशिरा उठल्याने लोकांच्या तिखट नजरांना त्यांना तोंड द्यावे लागते, बोलणी खावी लागतात, लोळतोयस काय गाढवासारखा सूर्य कासराभर वर आला तरी वगैरे टाइपची. लवकर उठणारी माणसं काही फार दिवे लावत नाहीत, पण आमची बनी लवकर उठते हो, अगदी सहाच्या ठोक्याला जाग येते तिला, असली कौतुकं त्यांच्या पदरी येतात.

हे कौतुक आणि बोलणी दोन्ही चुकीचं आहे, असं ठाम म्हणू शकतो आपण कारण नुकतंच एका संशोधनातून असं सिद्ध झालंय की आपलं हे जे शारीरिक घड्याळ आहे, झोपेचं आणि उठण्याचं ते प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं आहे, जन्मजात. जेनेटिक म्हणा ना. म्हणजे साधारणपणे रात्री तुम्हाला ज्या वेळी आपणहून झोप येईल ती तुमच्या शरीराच्या घड्याळाने सांगितलेली झोपायची योग्य वेळ असते, परंतु असं आपल्या शरीराचं ऐकून काही करायची सवड, उसंत, इच्छा, तयारी, असते का हो आपली? शरीर सांगत असतं दमलीयेस खूप, भांडी घासायची ठेव तशीच आणि गरम पाण्यात पाय बुडवून बस दहा मिनिटं. किंवा भूक लागलीये ना, मग पटकन फ्रिजमधनं सफरचंद काढ आणि खा. किंवा झोप आलीये मग बंद कर तो लॅपटॉप आणि पड अंथरुणावर. पण आपण ऐकतो का त्याचं? तुम्ही कोणत्या वर्गातले, पहिल्या की दुसर्‍या? आणि ऐकता का शरीराचं तुम्ही?




Comments