जाहिरातींचे हवे-नकोसे बोध

सावळ्या रंगाची, हलक्या रंगाची साडी परिधान केलेली वधू तयार होतेय. तिच्या आसपास तीनचार वर्षांची एक मुलगी आहे. निवडक दागिने घालून वधू वरासोबत सप्तपदी घालतेय. ती छोटी मुलगी हट्ट करतेय, मला पण गोलगोल फे-या मारायच्यात. वधू डोळे मोठे करते; पण वर तिला जवळ बोलवतो, कडेवर घेतो आणि तिघे मिळून उरलेल्या फे-या पूर्ण करतात. विशेषकरून विवाहासाठी दागिने बनवणा-या एका कंपनीची ही जाहिरात. या प्रकारच्या इतर जाहिरातींपेक्षा यात दोन ठळक बाबी वेगळ्या आहेत. वधू सावळी आहे आणि हे तिचे दुसरे लग्न आहे.
गोरेपणा देणा-या असंख्य क्रीमच्या जाहिराती पाहून आपले डोळे दिपलेले असतात. पांढ-याफटक बाया नि पुरुष आपल्या इतके सवयीचे झालेले असतात की अशी अवचित आलेली सावळी मॉडेल आपले लक्ष वेधून घ्यायलाही जाहिरात अनेक वेळा डोळ्यांसमोरून जावी लागते. मग तिचं वेगळेपण लक्षात येतं. आणि जाहिरातीतही काही तरी वेगळं मांडलंय याची आपण नकळत नोंद घेतो. या मुलीचा हा दुसरा विवाह आहे, तिच्या पहिल्या विवाहापासून तिला एक मुलगी आहे (तरीही एक देखणा तरुण तिच्याशी विवाह करतोय), दुसरा असला तरी हा विवाहही पहिल्याइतक्याच उत्साहाने, डिझायनर साडी नि दागिनेबिगिने यांच्यासह होतोय आणि त्या छोटुकलीला या नवरदेवाने, तिच्या भावी पित्याने, स्वीकारले आहे. बाप रे, इतक्या सा-या सकारात्मक गोष्टी या जाहिरातीतून आपल्या समोर येतात. त्यातले बारकावे कदाचित पहिल्याच खेपेत नाही दिसत, पण ‘आय वाँट टू गो राउंड अँड राउंड’ असं म्हणणारी ती परकरी पोर नक्की लक्षात राहते. ही जाहिरात दिग्दर्शित केलीय ‘इंग्लिश विंग्लिश’वाल्या गौरी शिंदेने. (तरीच, असं वाटलं ना?)
या सगळ्या छोट्याछोट्या, अगदी सहज, अशाच असायला हव्यात खरं तर, अशा गोष्टी. त्या लक्षात आल्यावर कळतं की बाकीच्या जाहिराती किती मागास विचारसरणीच्या, महिलांना दुय्यम किंवा त्याहूनही खालचे समजणा-या, मुलांपर्यंत अत्यंत चुकीचे संदेश पोहोचवणा-या, मोठ्यांनाही वाईट सवयी कशा लागतील हे प्राधान्याने पाहणा-या आहेत. लिंग/वर्ण/वंशभेद न मानण्याचे दिवस आले आहेत, याची जाणीव बहुतांश जाहिरातींमधून नसतेच, हे आपल्याही लक्षात आलेच असेल. या संदर्भात सर्वात पटकन आठवणारे दोन मुद्दे. कर्ज काढायचं ते मुलीच्या लग्नासाठी नि मुलाच्या शिक्षणासाठी, असं बजावून सांगणा-या बँका/पतपेढ्या. आणि सिमेंट/दाढीचे ब्लेड या व तत्सम असंबद्ध वस्तूंच्या जाहिरातीत दिसणा-या बिकिनी  किंवा कमीत कमी कपडे घातलेल्या तथाकथित ‘सेक्सी’ मुली.
एक उदाहरण घेऊ एका बँकेच्या नवीन छापील जाहिराती आल्या आहेत त्याचं. त्यात एक शाळकरी मुलगा व मुलगी आहेत. एकात ती मुलगी म्हणते, तो मला सायकल शिकवताना आधार देतो (तशी ही बँक देईल.) दुसरीत ती म्हणते, मला गणित आवडत नाही, पण तो मला छान गणित शिकवतो (तशी ही बँक मला मदत करेल.) म्हणजे जाहिरात तयार करणा-याच्या मनात हे घट्ट बसलेलं आहे की फक्त मुलीलाच मदतीची आवश्यकता असते, मग ते गणित असो वा सायकल चालवणं आणि मुलगाच मुलीला मदत करू शकतो.
वर उल्लेखलेल्या दागिन्यांच्या जाहिरातीतही आक्षेप घेण्याजागे काही मुद्दे आहेतच. लग्न, मग ते पहिलं असो वा दुसरं, दागिने कशाला हवेत त्यात, हा एक. (मुलीच्या लग्नासाठी सोनं जमवायचं म्हणून कर्जबाजारी झाल्याची उदाहरणं भारतात लाखोनी आढळतील, हे माहीतच आहे आपल्याला.) पण ही दागिन्यांची जाहिरात आहे, त्यामुळे हा मुद्दा बाजूला ठेवूया आपण. दुसरा मुद्दा असा की, अजूनही पुरुषाने स्त्रीच्या (कमकुवत?) बाजूचा स्वीकार केला म्हणजे तिचं कल्याण झालं, हा संदेश. परंतु, हे नक्कीच की उगीच भपकेबाज वा संदर्भ सोडून तयार केल्या जाणा-या जाहिरातींपेक्षा ही जाहिरात वेगळी आहे, एक सकारात्मक संदेश पोहोचवणारी आहे. बाकी इतका अंधार आहे की हेही नसे थोडके.
(तुम्हाला एखादी जाहिरात खूप 
आवडली वा खूप खटकली आहे का? कळवाल आम्हाला?)

Comments

Post a Comment