चूक तुझी नाही गं !

‘आज नं, आमचे ते साहेब आहेत ना मार्केटिंगचे, त्यांनी लिफ्टमधून जात असताना मला धक्का दिला, अगदी चुकून लागला असं वाटण्याजोगा. त्या दिवशीसुद्धा मी त्यांच्या ऑफिसात गेले होते तेव्हा ते केबिनमधून माझ्याचकडे टक लावून पाहत होते. ब-याचदा मी आसपास असताना अस्पष्ट असं काही तरी बोलतातपण. काय करू मी?’
‘अगं, त्यात काय एवढं, केलं तर नाही ना त्यांनी काही. पुरुष काय असं बघतातच. आणि धक्का खरंच चुकून लागला असेल गं, तुला उगीच संशय आपला. त्यांचं वय किती, रिटायर होतील आता वर्षभरात.’
‘अगं पण, मला कसं तरी वाटतं ते असले जवळ की. त्यांच्याकडे मीटिंगला जायचं म्हटलं की अंगावर काटाच येतो.’
‘असं कसं वाटून चालेल, दुसरी नोकरी काय इतक्या सहज ठेवलीय का कोणी तुझ्यासाठी, बघ थोडे दिवस अजून काय होतंय ते.’
या प्रकारचा संवाद जवळपास सर्व घरांमधून घडलेला असतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यालयांमधून महिलांचा लैंगिक छळ होत असतो. परंतु बहुतांश महिलांना गप्प बसायचा किंवा सहन करण्याचा सल्ला मिळत असतो. ज्यांना शक्य असेल त्या यातून सुटका म्हणून दुसरी नोकरी शोधतात, तिथे असं काही होणारच नाही याची काहीही खात्री नसताना. गेल्या आठवड्यात जे तहलका प्रकरण बाहेर आलं तसे, बोलण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीचे, प्रकारही अनेकदा घडत असतात. त्याविरुद्ध दाद मागण्याची हिंमत बहुतांश महिला दाखवत नाहीत. आपली समाजव्यवस्था, कुटुंबं ही हिंमत त्यांना देत नाही. उलटपक्षी ते तिलाच दोषी ठरवतात. 
‘तू असले कपडे कशाला घालतेस, इतके मॉडर्न?’ 
‘तुलाच कामात फार पुढेपुढे करायची सवय आहे, कशाला ते?’ 
‘तूच सगळ्यांशी इतकी मोकळेपणाने वागतेस, मित्र असल्यासारखी वावरतेस, मग कोणी त्याचा गैरफायदा घेतला तर चूक कोणाची?’
‘चूक तुझी नाही, तुला त्यात लाजिरवाणं वाटायची गरज नाही, अपराधी तर नाहीच नाही,’ असं मुलींना ठामपणे सांगण्याची वेळ आता नक्कीच आली आहे. अन्यथा आपल्या सहका-यांसोबत हसतखेळत, बरोबरीने काम एंजॉय करण्याची संधीच त्या घेणार नाहीत. पुरुष सहका-यांशी मैत्री होऊ शकते, आपल्या पुरुष वरिष्ठासोबतही चांगले समानतेचे संबंध असू शकतात, हेच पुढची पिढी समजणार नाही कदाचित. ‘कामाशी काम ठेवावं, कशाला हवेत मित्र नि बित्र,’ हे एका मर्यादित अर्थानेच सत्यात येऊ शकतं. जिथे कामाचे तासच दहा किंवा अधिक आहेत, काम अतिशय तणावपूर्ण आहे, काम मिळून एका टीमनेच करायचं आहे, तिथे माणसामाणसात नाती निर्माण होणारच. ती सकस, निकोप असू शकतात, असली पाहिजेत हे या पिढीला कळायला हवंय. 
तहलका म्हणा किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर झालेले लैंगिक छळाचे आरोप म्हणा, ते कानावर आल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्याच पुरुषांकडे संशयाच्या नजरेने पाहणं ही स्त्रियांची स्वाभाविक प्रतिक्रिया असेल कदाचित. पण ती तशी झाली तर उद्याचा समाज कसा असंतुलित, संशयाधारित, घाणेरडा असेल याची कल्पना आपण करू शकतो. तशा काळात आपल्या मुलींनी नोकरी वा व्यवसाय केलेला आपल्याला आवडेल का, याचा विचार आपण केला पाहिजे. संपूर्ण पुरुषविरहित कामाची जागा एखादी असेलही, पण एखादीच. त्यामुळे दोघांना एकत्रच राहायचं आहे, एकत्रच काम करायचं आहे, तेसुद्धा आनंदात करायचं आहे तर ते काम चांगलं होईल, त्याने समाधान मिळेल, हे आपल्याला तत्त्वत: ठाऊक असतं; पण तेच प्रत्यक्षात आणताना कुठे तरी आपण कमी पडतो ना?
जसं आपल्या मुलींना आपण सांगायला हवं की सगळेच पुरुष तसे नसतात, तसंच आपल्या मुलांनाही सांगायला हवं की सोबत शिकणा-या किंवा काम करणा-या मुली/महिला तुझ्यासारख्याच माणूस आहेत, त्यांच्याशी नीट वागलास तर तुझंही भलंच आहे. त्या तुझ्या मनोरंजनासाठी किंवा तुझा वेळ जाण्यासाठी तुझ्या कॉलेजात/ऑफिसात येत नाहीत. त्यांनाही तुझ्यासारखंच करिअर करायचंय, पैसे कमवायचेत, घर चालवायचंय, त्यांचीही स्वप्नं आहेत. एकमेकांशी बरोबरीने वागा, सत्तेचा गैरवापर करू नका, सत्ता गाजवू नका, माजू नका, हे मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे.
अन्यथा वर्षानुवर्षं असा छळ सहन करणारी त्याची स्वत:ची बहीण/आई वा पत्नी/मुलगी असू शकते आणि छळ करणारा त्याचा भाऊ/बाप वा मित्र/मुलगा असू शकतो, हे त्याच्या लक्षात येईल तेव्हा त्याला बरोबरीच्या वागण्याचं महत्त्व कळेल. तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

Comments

  1. आवश्यक आणि टू ध पॉइंट--- सहमत-

    ReplyDelete
  2. आजकालच्या मुलांनाच हे समजावून देण्याची जास्त गरज आहे आणि मला वाटत नवीन पिढी तशी समजूतदार आहे हि..पण आज ५० / ५५ च्या पुढे वय असलेल्या पुरूषांचे विचार बदलण अशक्य कोटीतली गोष्ट वाटते...फारच बुरसटलेल्या विचारांची पिढी आहे आमची...

    ReplyDelete

Post a Comment