गोष्ट भित्र्या सशाची

यावर्षाची सुरुवात दिल्लीतल्या एका अमानुष बलात्काराच्या पार्श्वभूमीवर झाली होती. त्या प्रकरणाचा निकाल, अपराध्यांना शिक्षा अजून जाहीर व्हायची आहे, त्यातच मुंबईत आणि पुण्यात असाच एक प्रकार झाला. दिल्ली दूर आहे, ते शहरच तसं आहे, मुंबई-पुणं कित्ती सेफ आहे वगैरे गोष्टी करणा-यांना परिस्थितीची जाणीव या भीषण प्रकाराने झाली. तिने सकाळी बातमी वाचली आणि ती हादरूनच गेली. वार्ताहर म्हणून एका वर्तमानपत्रात काम करताना तीदेखील अनेकदा अशाच कुठल्या कुठल्या ठिकाणी गेली होती, शहरातली अनेक ठिकाणं/वस्त्या पिंजून काढली होती. दरवेळी कोणी सोबत होतंच असं नाही. पण कधीच तिला असं असुरक्षित वाटलं नव्हतं. नंतर नंतर लोकलने, बसने, टॅक्सीने वेळी-अवेळी प्रवास करतानाही तिला कधीच गोष्टीतल्या भित्र्या सशासारखं वाटलं नव्हतं. आता मात्र सतत आजूबाजूला पाहत राहायचं, लक्ष ठेवून बसायचं, कुठल्याही क्षणी आपल्यावर हल्ला होईल, या भीतीने एखाद्या युद्धक्षेत्रात असल्यासारखं ती वावरत होती. तिचा अत्यंत आवडीचा मोबाइलसुद्धा बदलून स्मार्टफोन घ्यावा, ज्यावर आपत्तीचा इशारा देणारं एक अ‍ॅप असतं, असा विचार तिच्या मनात मूळ धरू लागला होता. आता ती पत्रकारिता सोडून इतर काहीशा कमी जोखमीच्या क्षेत्रात काम करत होती, म्हणून तिचं तिलाच जरा हायसं वाटलं होतं. पण तिच्या पुतणीला पत्रकार व्हायचं होतं, जवळ राहणा-या शेजारणीच्या मुलीला आयटीत काम करायचं होतं, तिच्या मदतनीस बाईची मुलगी फक्त बायकांसाठी असलेल्या टॅक्सी फ्लीटमध्ये चालक म्हणून काम करत होती.
पुतणीला या क्षेत्राबद्दल प्रचंड पॅशन होती, तिला सुरक्षेचा बागुलबुवा दाखवून दुसरं काही करिअर करायला सांगायचं? आयटीतल्या नोकरीत मध्यरात्री घरी यावं लागतं, पुण्यात एका मुलीवर गाडीच्या चालकाने बलात्कार करून तिला मारून टाकलं होतं, असं सांगून मुलींना घरी बसवायचं? तिचं डोकं भंजाळून गेलं होतं. बहुतांश पुरुष मोहाच्या एका क्षणी विविध कारणांमुळे स्वत:ला सांभाळणारे असले तरी एखादा असतोच मोहाला बळी पडणारा, आणि काहीतरी अमानुष करू धजणारा, या विचाराने बावरून गेली होती. कशी होणार तिची अस्वस्थता दूर? 

Comments