स ऽ ऽ चिन स ऽ ऽ चिन

चार वर्षांपूर्वीची गोष्ट. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना मुंबईत सीसीआयच्या मैदानावर सुरू होता. वीरेंद्र सेहवागचे द्विशतक झालेले होते आणि तो 300ची मजल मारण्याची शक्यता होती. हा मुहूर्त साधून ती आणि तिची 12 वर्षांची कन्या सामन्याच्या तिस-या दिवशी सकाळी साडेसातला चर्चगेटला पोचल्या आणि भल्यामोठ्या रांगेत उभ्या राहिल्या. दीडएक तासाने आत जाऊन स्थिर होतायत तेवढ्यात जेमतेम दहा धावा करून, तीनशेचा टप्पा न गाठताच सेहवाग बाद झाला. तो बाद झाल्याचं दु:ख काही क्षणच टिकलं असेल. कारण त्यानंतर मैदानात अवतरला सचिन तेंडुलकर. सऽऽचिन सऽऽचिन सऽऽचिन या आरोळ्यांनी स्टेडियम दुमदुमून गेलं. तिला वाटलं, या अशा अपेक्षांच्या, प्रेमाच्या, पॅशनच्या दबावाखाली आणि एवढ्या आवाजात हा कसं काय खेळू शकेल? त्याला प्रत्यक्ष पाहायची तिची पहिलीच वेळ होती म्हणून हा प्रश्न पडला होता.

लेकीला तर काय करू, कुठे पाहू, बसू की उभी राहू असं झालं होतं. सचिन आला नि त्याने त्याच्या नेहमीच्या आत्मविश्वासाने राहुल द्रविडच्या साथीने खेळायला सुरुवात केली. त्याचं अर्धशतक झालं तेव्हा तर आवाजाने परिसीमा गाठली होती. पण हाय... आणखी तीन धावा काढून तो त्रिफळाचीत झाला आणि स्टेडियमवर सन्नाटा पसरला. इतका निरुत्साह आसमंतात भरून गेला की जणू खेळ अवेळी संपला होता. नंतर तो सामना भारताने जिंकलाही, पण त्या दोघींच्या दृष्टीने लक्षात ठेवण्याजोगी होती एकच गोष्ट. समोर खेळणारा सचिन. तो काही तथाकथित हॉट वा सेक्सी नव्हता की त्याच्या शैलीबद्दल त्यांना फार काही कळत नव्हतं. त्याने स्क्वेअर ड्राइव्ह मारलाय की पुल की हुक हे तर दूर राहिलं. तो एक आपल्यासारखा, आपल्यातला वाटावा असा, आदर्शवत तरीही असामान्य माणूस होता. तो कधीच कुठल्या लफड्यात नव्हता, त्याच्यामुळेच बहुतेक आया मुलांना क्रिकेटची बॅट हातात घ्यायला परवानगी देत होत्या. त्याच्याबद्दल कधी वावगं काही छापून आलेलं नव्हतं. आणि कौतुक करणारं छापून आलेली पानं कुणाच्या बापाला मोजता येणार नाहीएत. पुढच्या महिन्यात तो रिटायर होतोय. पण कोणाच्या आठवणींमधून तो कधीच बाद होणार नाही, हे नक्की.

Comments