दिल की बात

तिचा एक किट ग्रुप आहे, माहितीचेय तुम्हाला. किट म्हणजे ‘कीप इन टच’. कॉलेजमधल्या आठ जणींचा, 25 वर्षांहून अधिक काळ मैत्री असलेल्या मुलींचा ग्रुप. या मैत्रिणी आठवड्याला ठरलेल्या दिवशी एकमेकींना ई-मेल लिहून आपली खबरबात कळवतात. त्यातल्या चौघी जणी तर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही संपर्कात असतात. दळणवळणाची माध्यमं प्रगत झाली, त्याचा त्या पूर्ण फायदा उठवतात. यंदा त्यांनी ठरवलं की वाढदिवस साजरा करायचा एकत्र. तिच्या वाढदिवसापासूनच गेल्या महिन्यात या प्रथेला सुरुवात झाली. पाच जणी जमल्या होत्या नि त्यांनी अर्थातच एकमेकींसोबत खूप छान वेळ घालवला. या महिन्यात होता या वर्षातला त्यांच्या ग्रुपमधला शेवटचा वाढदिवस. अमिताचा. अमिता घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी प्रचंड गुंतलेली. ग्रुपसाठी जेमतेमच वेळ काढू शकणारी. आणि अर्थातच त्याचे वाईट वाटणारी. ती कुठल्या कार्यक्रमाला आली नाही की बाकीच्यांना अतिशय वाईट वाटायचं, रागही यायचा. अमिताच याला जबाबदार आहे, असं त्यांना ठामपणे वाटायचं. दोन तास काढता येत नाहीत आमच्यासाठी, आमच्यासाठीपेक्षाही स्वत:साठी, असा प्रश्न त्यांना पडायचा. आपण आता तिच्यासाठी महत्त्वाच्या उरलो नाहीये की काय, असंही त्यांना वाटायचं. त्यांना माहीत होतं की तिच्या बाकी कोणी फारशा मैत्रिणीही नव्हत्या. मग ती का त्यांना भेटायला नाही यायची? तिला मैत्रिणींशी ‘दिल की बात’ करावीशी नाही वाटत का? बरे, प्रत्यक्ष भेटायला वेळ नाही म्हणून फोनवरून गप्पा मारेल, तर तेही नाही.

दर वेळी त्या भेटत तेव्हा तिच्याबद्दल बोलणं होईच. मग तिच्यासारख्या इतर कोणा बायांचा, मैत्रिणींचा संदर्भ येई. त्या सगळ्याही आपापलं काम, व्यवसाय, घर, मुलं, कुटुंबं वगैरे सांभाळूनच एकमेकींच्या संपर्कात असत, भेटत, उराउरी भेटत नि मनसोक्त गप्पा मारत. या गप्पांमधून त्यांना पुढे जायची एनर्जी मिळे. म्हणूनच त्यांना तिच्या या वर्तनाचे गूढ काही उलगडेना. तुम्ही सांगू शकाल ती का दूर राहत असेल या मैत्रिणींपासून? की तिला मैत्रीची गरजच नव्हती? की आई, सून, बायको, बॉस असणं पुरेसं होतं तिच्यासाठी?

Comments