लॉकरची भर

‘नोकरी लागलीय तुला आता, मुलं पाहायला हवं काही दिवसांत. आणि मुख्य म्हणजे सोनं घेऊन ठेवायला हवं.’
‘सोनं, कशाला ते, बरी आहेस ना?’
‘अगं, तुलाच देणार ते, आणि सोन्याचे भाव इतके वाढतायत सारखे तर आत्ताच घेऊन ठेवलेलं बरं, असं आपलं आम्हाला वाटलं. एवढं काय झालं चिडायला? त्यात ते आपले नेहमीचे ज्वेलर्स आहेत, त्यांच्याकडे भिशीपण आहे सोन्याची. त्यात पैसे गुंतवले म्हणजे सोपं ना?’
‘आई, जरा घराबाहेर डोकावून पाहा जगात काय चाललंय ते. आपली अर्थव्यवस्था, महागाई, रुपयाचा वाढता दर, शेअर बाजार, वगैरे. काहीच कानावर पडत नाही का गं तुझ्या?’
‘अगं, तेच म्हणतेय मी, महागाई वाढतच चाललीय म्हणून तर सोनं आतापासून घ्यायचं म्हणतेय मी. 30 तोळे तरी सोनं द्यायला हवं ना तुला.’
‘हो, आणि ते सोनं मी ठेवणार लॉकरमध्ये. आता दागिने अंगावर घालायची सोय आहे का आपल्याकडे. लॉकरची भर नुसती...’
‘अगं, मग करायचं काय?’
‘एखादा हलका दागिना गळ्यात, एखादं ब्रेसलेट हातात, छोटीशी कर्णफुलं हे वगळता आजतागायत मी काही घातलेलं नाही, ते एकदम लग्नानंतर काय टीव्ही मालिकांमधल्या बायांसारखी चोवीस तास दागिन्यांनी मढून फिरू?’
‘अगं...’
‘त्यापेक्षा तुझ्याकडचे पैसे बँकेत एफडीमध्ये टाक, शेअरमध्ये गुंतव किंवा गोल्ड बाँड्स घे. सोनं घरात पडून राहण्यापेक्षा तो पैसा बाजारात खेळता तरी राहील. प्रत्यक्ष लग्न ठरेल तेव्हा जो भाव असेल त्याने परवडेल तितकं घेऊ सोनं. किंवा आपण परदेशात फिरून येऊ मस्त त्या पैशांत. काय?’
‘असं म्हणतेस, खरं?’
‘मग, खोटं कशाला बोलू?’
‘बरं बाई, तुझंच म्हणणं खरं. उद्याच जाऊ बँकेत. माझ्याबरोबर येशील ना? की...’
‘येईन माताश्री, नक्की येईन!’

Comments