ती आणि तिची सासू आवडीने ‘बालिका वधू’ पाहतात रोज. सध्या त्यातला नायक जगदीश गावातल्याच गंगा या परित्यक्ता महिलेच्या प्रेमात पडलाय. पण त्याचा सांची या दुस-याच एका मुलीशी साखरपुडा झालाय. सर्व प्रेक्षकांची सहानुभूती त्याला आहे आणि त्याने गंगाशीच लग्न केलं पाहिजे अशा मताचे ते आहेत. त्याची वाग्दत्त वधू बालिश, लाडावलेली वगैरे आहे, त्यामुळे ती सुंदर असूनही फारशी कोणाला आवडत नाही. तिला एकदम वाटलं, प्रत्यक्ष आयुष्यात मात्र कोणीच स्वत:च्या मुलाला साखरपुडा मोडायला आणि मनाचा कौल मानायला परवानगी देणार नाही. प्रत्येकालाच अशी अनेक उदाहरणं माहीत असतात जिथे प्रेमविवाहाला घरच्यांची संमती नसते, आई किंवा वडिलांनी चक्क आत्महत्येची धमकी देऊन मुलांना त्यापासून परावृत्त केलेलं असतं. आणि बहुतांश वेळा याला कारण असतो पालकांचा इगो. आम्हाला न विचारता, त्या/तिने एवढा महत्त्वाचा निर्णय घेतलाच कसा, हा मुख्य प्रश्न आणि अडसर असतो.
हेच पालक टीव्हीवरच्या मालिका बघताना मात्र त्या प्रेमी युगुलाच्या बाजूचे होऊन जातात, अगदी वाट पाहतात कधी त्यांचा आवडता जगिया घरच्यांना सांगेल की ‘माझं गंगावर प्रेम आहे, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही आणि सांचीशी लग्न करायला मी निव्वळ तुमच्या आनंदासाठी होकार दिला होता.’ तिला कळेचना की ही सह-अनुभूती टीव्हीवरच्या पात्रांशी असते तर आपल्या पोटच्या गोळ्याशी का नसावी? आपल्या मुलाचा वा मुलीचा आनंद अधिक महत्त्वाचा नाही वाटत का लोकांना? काही केल्या तिला या दुटप्पी वागण्यामागचं कारण काही उलगडलं नाही. तुम्हाला माहीत आहे का ते? सांगाल आम्हाला?
Comments
Post a Comment