या वर्षात तीन नाटकं पाहिली. (फक्त तीनच किंवा तब्बल तीन म्हणा...) तिन्ही एका विशिष्ट विषयाशी निगडित होती. सर्वात आधी पाहिलं ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी.’ स्त्रीच्या लैंगिकतेविषयी गंभीरपणे, अश्लीलतेकडे अजिबात न झुकता आणि ब-याच संशोधनाअंती लिहिलेलं. नंतर पाहिलं ‘ठष्ट - ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलीची गोष्ट.’ आपल्या समाजात मुलीचं लग्न हा किती महत्त्वाचा, ताणतणाव निर्माण करणारा विषय आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. लग्न न ठरणं किंवा ठरलेलं लग्न मोडणं, या परिस्थितीत मुलींना किती भयानक टोमण्यांना तोंड द्यावं लागतं, त्या कसं रोजच्या जीवनाला सामोरं जाताजाता हार पत्करून क्वचित मृत्यूलाही शरण जातात, याची गोष्ट सांगणारं हे नाटक. आणि ‘व्हाइट लिली नाइट रायडर’ हे वय वाढलेल्या, परंतु अविवाहित स्त्री-पुरुषांची गोष्ट समोर आणणारं नाटक. स्त्रीची लैंगिकता हा जसा या तीन नाटकांना एकत्र बांधणारा घटक, तसाच विनोद हाही. तिन्ही नाटकं गंभीर विषयांना हात घालणारी, त्यांवर भाष्य करणारी, हा विषय समाजातल्या मोठ्या घटकाशी निगडित आहे हे प्रेक्षकांच्या मनात ठसवणारी आणि तरीही ती पाहताना खळखळून हसायला लावणारी.
हसायला लावणारी कारण त्यात आसपासच्या सामाजिक परिस्थितीचं उत्तम भान आहे, आजूबाजूला काय चाललंय, आजच्या पिढीची संवादाची भाषा काय आहे, या मुलामुलींना नक्की काय वाटतंय, काय करायचंय, याची जाण आहे. त्यामुळेच हे नाटक पाहताना हे माझ्या मनातलं समोर दिसतंय असं वाटत राहतं. प्रत्येक प्रेक्षकालाच यातले अनुभव आपले असल्यासारखे वाटतात. म्हणूनच नाटकातल्या पात्रांचं सुखदु:ख आपलंसं वाटतं आणि खळखळून हसू येतं तसंच डोळ्यांतून पाणीही.
या नाटकांची आठवण अचानक येण्याचं कारण एका मैत्रिणीने सांगितलेली तिच्या मदतनीस बाईची गोष्ट. मैत्रिणीच्या आईला दिवसभर सोबत म्हणून एक बाई तिने ठेवली. जेमतेम चाळिशीची. नवरा रिक्षा चालवायचा, तो अचानक अपघातात गेला. मग ही अशी कामं करू लागली. ती हिच्या घरी आल्यापास्नं रोज म्हणायची, ‘सासू माझं दुसरं लग्न लावून देणार आहे.’ ‘मला पाहायला येणार आहेत,’ अशा गप्पा सांगायची. मैत्रीण म्हणाली, ‘आता या वयात तुला चांगला नवरा मिळेल का.’ ती म्हणाली, ‘जसा असेल तसा चालेल. माझा दिवस कसाही जातोय, रात्र खायला उठते.’
हेच तर या नाटकांमधनं बरोब्बर पकडलंय ना. आपल्याकडे सून जर तरुण वयात गेली किंवा खरं तर नंतरही, मुलाचं दुसरं लग्न लगेच लावायचा विचार कुटुंबातनं सुरू होतो. पुरुषाच्या शारीरिक गरजेच्या पूर्ततेची जाणीव ठेवून हा विचार होत असतो; परंतु त्याला अनेकदा बिचा-या मुलांना आई हवी ना आणि घर सांभाळायला बाई हवी ना, असं कारण त्यासाठी दिलं जातं. या जाणिवेतून मुलीचा, तिच्या लग्नाचा विचार किती घरांमधनं केला जातो हो? तथाकथित लग्नाचं वय उलटून गेलेली मुलगी असेल वा तरुण वयात नवरा मरण पावलाय अशी, त्यांना समाजातला एक वर्ग कायम गृहीत धरतो. तिच्या एकटेपणाचा फायदा घ्यायला सदान्कदा तो तयार असतो.
आपण हा सगळा नवीन विचार करायला कधी सुरुवात करणार आहोत?
sharing :)
ReplyDelete