संवेदनांची 'पालवी' फुटो

पंढरपूर गावाबाहेरच्या माळरानावर मध्येच झाडांच्या दाटीत हिरव्या रंगाची एक दुमजली इमारत दिसते. त्याच्या जवळच आणखी एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे, काही अंतरावर शाळा आहे आणि नियोजित इमारतीची चौकट. बक-या चरताना दिसतात आणि गोठ्यात गायी असल्याचे कळते ते वासावरून. इमारतीवर खरे तर ‘पालवी’ असे लिहिलेले आहे, पण ते झाडांनी झाकले गेलेले. आत जावे तो दोन-तीन मुलांच्या गराड्यात बसलेल्या असतात मंगला शहा ऊर्फ बाई. साठी ओलांडलेल्या बाई, साधी सुती साडी, पांढरे केस, चष्मा आणि मिश्किल डोळे. बाई हसून स्वागत करतात, आतून त्यांची मुलगी डिम्पल घाडगे येते आणि गप्पांमधून ‘पालवी’चा प्रवास उलगडतो. डिम्पल इयत्ता चौथीत असल्यापासूनच आईला तिच्या कामात सोबत करतेय. त्यामुळे ती बाईंच्या कामाची साक्षीदारच नव्हे तर साथीदारही. तेव्हा बाई पंढरपूर गावातल्या गरीब वस्तीतल्या मुलांना शिकवायला गोळा करायच्या. त्यांना खाऊ, कपडे अशी जमेल तशी मदत करायच्या. मध्येच कधीतरी एखादं टाकून दिलेलं मूल त्यांच्या घरी कुणीतरी आणून दिलं. त्याचा सांभाळ त्या करू लागल्या. त्यातूनच त्यांना एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या समस्यांची जाणीव झाली आणि दहा वर्षांपूर्वी त्यांनी अशा, समाजाच्या दृष्टीने अगदीच त्याज्य मुलांसाठी, पालवी ही संस्था सुरू केली.

अशा मुलांना रेल्वेस्थानकावर, एसटी डेपोत, कचराकुंडीत वा अगदी स्मशानातही टाकून दिले जाते. अशा बालकांना ‘पालवी’त आणून, त्याच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून, त्यांची काळजी घेतली जाते. बाई, डिम्पल आणि सारिका शेळके या तिघींच्या जबरदस्त आणि कार्यक्षम नेतृत्वाखाली आजच्या घडीला तब्बल 70 एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलं ‘पालवी’त आहेत.

या मुलांना सांभाळणे अतिशय कठीण असते.कारण त्यांना कोणताही संसर्ग होऊन चालत नाही. फार कमी प्रतिकारशक्ती असल्याने त्यांना सतत निरोगी ठेवावे लागते आणि त्यासाठी या तिघी आणि त्यांच्या मदतनीस जिवाचे रान करतात. या सर्व मुलांचा स्वयंपाक बाईंच्या देखरेखीखालीच होतो. त्यांना बाहेरचे काहीही खायला दिले जात नाही. आयुर्वेदिक औषधोपचार, निसर्गोपचार यांच्याच साथीने या मुलांना निरोगी वातावरण, त्यांचा सर्वांगीण विकास होईल असे कार्यक्रम यांनी दिवस भरगच्च असतो. यंदाच ‘पालवी’च्या शाळेला सरकारची दहावीसाठी मान्यता मिळाली आहे. त्यांच्यासाठी अत्याधुनिक संगणकांचीही सोय संस्थेत आहे.

‘पालवी’च्या परिसरात फिरताना कुठेही निराशेचा, अनारोग्याचा लवलेशही दिसत नाही. सगळी मुलं टवटवीत, हसरी आणि सशक्त असलेली पाहून वाटतं, खरंच का ही मुलं एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. हा प्रश्न नुकत्याच येऊन गेलेल्या एका जर्मन पाहुण्यांनी विचारल्याचं डिम्पल हसत सांगते. ‘ते म्हणाले, तुम्हाला राग येईल वा वाईट वाटेल, पण या मुलांचे मेडिकल रिपोर्ट्स पाहायचे आहेत मला. माझा विश्वास बसत नाही, ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत यावर. रिपोर्ट्स पाहून ते थक्क झाले. आमच्या दृष्टीने आमच्या कामाला मिळालेले ते मोठे प्रमाणपत्र होते,’ असे सांगताना तिच्या चेह-यावर समाधान स्पष्ट दिसत होते.

संस्थेत आज सत्तर मुलं असली तरी जवळच 500 मुलांची सोय होईल एवढ्या इमारतीच्या बांधकामाची तयारी सुरू आहे. एवढा मोठा आकडा ऐकून चेह-यावर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून बाई सांगू लागतात, ‘भारतात 70 हजारांहून अधिक एचआयव्ही बाधित मुलं आहेत. आमच्याकडे महाराष्ट्राच्या सगळ्या भागांतून मुलं येतात, काही तर जेमतेम एक दिवस वयाची असतात. आता गरज वाढतेच आहे म्हणून नियोजन केलंय. आतापर्यंत आखलेलं कोणतंही काम पैशांअभावी रखडलेलं नाही. त्यामुळे या कामासाठीही मदतीच ओघ येईलच, याची खात्री आहे.’

मुलांसोबतच एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांसाठी संस्थेने अनेक कार्यक्रम हाती घेऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक व टिकाऊ पिशव्या, मेणबत्त्या, हस्तकलांचे इतर प्रकार या महिला तयार करतात व पालवी त्यांना बाजारपेठ मिळवून देते. या महिलांचा आत्मविश्वास यामुळे वाढला आहे आणि इतके दिवस चार भिंतींच्या आड लपणा-या या महिला आता आपणहून समाजाच्या पुढे यायला तयार होत आहेत, ही मोठी जमेची बाजू.

‘पालवी’च्या परिसरात दोन-तीन तास सहज जातात, अनेक वेळा घशात आवंढा येतो तर छोट्या बाळांच्या निरागस चेह-यांवरचं निष्पाप हसू पाहून आपलेही ओठ अलगद विलग होतात. हे त्या मुलांचं हक्काचं घर बनलं आहे, याचा पुरावा जागोजागी दिसतो. निघताना कानात गुंजत राहतात बाईंचे शब्द. ‘या मुलांची खूप काळजी घ्यावी लागते, तरीही एखादं मूल आम्ही गमावतोच. तो क्षण फार कठीण असतो. परंतु निदान ही मुलं जेवढी जगतात, तेवढा काळ तरी त्यांना आनंदात आणि भरभरून जगण्याचा मिळावा, हाच आमचा प्रयत्न असतो.’

Comments