अंतराळाची ओढ

मला चंद्र हवा, असा हट्ट श्रीरामाने बालपणी धरला तर बालहनुमानाने थेट सूर्यबिंबाकडेच उडी घेतली. शंकराच्या माथ्यावर चंद्राची कोर विराजमान आहे. शनिचा सामान्य माणसावर दरारा असला तरी खगोलप्रेमींसाठी दुर्बिणीतून त्याची कडी पाहणे हा अत्यंत आनंदाचा सोहळा असतो. लालेलाल मंगळाचे भारतीय जनमानसावर (नको एवढे) गारूड आहे तर शुक्राचा प्रेमी जिवांना आसरा वाटतो. पृथ्वीच्या पलीकडे हे जे काही आहे, जे आपल्या सतत डोळ्यांसमोर असते, ते काय आहे, तिथे जाता येईल का याचे कुतूहल हजारो वर्षांपासून मानवाला आहे. त्यातूनच राइट बंधूंना विमान उडवण्याची स्फूर्ती मिळाली व त्यांनी पहिले हवाई वाहन तयार केले. त्यानंतर माणूस पृथ्वीच्या वातावरणाचा भेद करून अवकाशात वा अंतराळात जाण्याचे स्वप्न पाहू लागला. ते सत्यात उतरल्यावर मानवाला वेध लागले ते थेट चंद्रापर्यंत पोहोचण्याचे. तेही साकार झाले. आता मंगळावर माणूस जाण्यापर्यंत विज्ञान येऊन पोहोचले आहे. या सगळ्या प्रवासात अर्थातच महिलांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

अवकाश मोहिमांच्या सुरुवातीच्या काळात तत्कालीन सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांमध्ये चढाओढ होती. याच रशियाची व्हॅलेंटिना तेरेश्कोवा ही पहिली महिला अवकाशयात्री ठरली, ती 50 वर्षांपूर्वी. त्यानंतर अनेक महिला अवकाशात गेल्या. मात्र भारतीय मुलींना या विश्वाची खरी ओळख झाली कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यामुळे. या दोघींच्या रम्य आणि सुरस कथा, त्यांची छायाचित्रे, त्यांच्या उड्डाणाचे व्हिडिओ, त्या भारतभेटीला आल्यावर झालेल्या त्यांच्या मुलाखती या सगळ्याचा इकडच्या मुलींवर प्रभाव न पडता तर नवलच. त्यामुळे अनेकींनी अगदी अवकाशात जाण्याची नाही तर विमान उडवण्याची स्वप्नं नक्कीच पाहिली आणि ती खरीही करून दाखवली. आज भारतात सरकारी व खासगी विमाने व्यवसाय म्हणून उडवणार्‍या व पायलट हे बिरुद मिरवणार्‍या अनेक तरुण मुली आहेत. त्यातील अनेक जणी लहान गावांमधून आलेल्या आहेत. विमानाने प्रवास करताना पायलट महिला असल्याचे कळल्यावर अनेक प्रवासी त्यांच्यासोबत आवर्जून फोटोही काढून घेतात, इतके त्यांचे कौतुक आहे. या मुली अशी आकाशाला गवसणी घालू शकल्या कारण त्यांच्या आईवडिलांनी, शिक्षकांनी त्यांना पाठिंबा दिला, स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण हातभार लावला. प्रसंगी नावे ठेवणार्‍या नातलगांना, शेजार्‍यांना भीक घातली नाही.

या सर्वांना मधुरिमाचा सलाम आणि पुढच्या उड्डाणासाठी शुभेच्छा.

Comments