सीमापार

काहीतरी मिळवायचं असेल, घडवायचं असेल तर चाकोरी सोडून, सुरक्षित चौकट ओलांडून पलीकडच्या अनोळखी आव्हानांना सामोरं गेल्याशिवाय पर्याय नसतो. घरी बसून, असतील नसतील ती कौटुंबिक/सामाजिक/आर्थिक सगळी बंधनं सांभाळून आपल्या हातून काहीच होणार नाही, हे पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे. आहे ती परिस्थिती बदलायची असेल तर काहीतरी वेगळंच करावं लागतं. दस-याच्या निमित्ताने ‘मधुरिमा’च्या सीमोल्लंघन विशेषांकाची तयारी करताना याची प्रकर्षाने जाणीव झाली. गावात सातवीनंतरची शाळा नाही म्हणून पाच-सहा किलोमीटर चालून गेलं तरच शालान्त परीक्षेचा पडाव पार करू शकणारी हजारो मुलं भारतात आहेत. त्यासाठी जसा आईवडिलांचा आधार लागतो,आर्थिक पाठबळ लागतं तसंच स्वत:च्या मनाची तयारीही लागतेच. शिक्षण संपलं की नोकरीसाठी परगावी गेलं तर प्रगतीच्या अधिक संधी उभ्या राहतात, याची जाणीव ठेवून वेगळं खाणं, वेगळी भाषा, अनोळखी प्रदेश याचा बाऊ न करता लाखो लोक गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश या मर्यादा ओलांडून जातातच.

विशेषकरून बायांचा विचार केला तर बहुतांश जणी विवाहाच्या निमित्ताने आपलं परिचित विश्व ओलांडून दुस-या विश्वात प्रवेश करतात आणि तिथल्याच होतात. सासरच्या घरच्या परंपरा, रीतीभाती यांच्या बंधनात अडकण्याची आणि पर्यायाने स्वत:च्या प्रगतीची दारं बंद करून घेण्याची शक्यता त्यांच्या बाबतीत पुरुषांपेक्षा निश्चितच जास्त असते. पण या सगळ्याच्या पलीकडचं नवीन विश्व सर्वांनाच खुणावत असतं हे नक्की. काही जणी खूप प्रयत्न करूनही उंबरा ओलांडून नाही जाऊ शकत. पण ब-याच जणी जबाबदा-या सांभाळून स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी इतकं करत असतात की थक्क व्हावं. वंदना खरे यांनी नोंद घेतलेल्या दुर्गम भागातल्या आदिवासी मुली असोत की मंजुश्री कुलकर्णी यांचं अंध व्यक्तींसाठीचं काम, व्हीलचेअरच्या साथीनं जगूनही सतत हसतमुख असणारी व स्फूर्तिदायक लिखाण करणारी सोनाली नवांगुळ असो की जातधर्मभाषापंथाच्या सीमा ओलांडून शांततापूर्ण जगण्याची आकांक्षा असणारी अरुणा बुरटे यांची कोजागिरी, ऑस्ट्रेलियातली राजीव तांबे यांच्या नातीची शाळा चालवणारी जेसिका असो की उज्जैनच्या रिक्षावाल्यांशी पंगा घेणारी कविता... आपल्या लक्षात येईल की यांनी मर्यादा, बंधनं झुगारून दिली आहेत, ओलांडली आहेत पण ताळतंत्र नाही सोडून दिलेलं. जबाबदा-या झटकून नाही दिलेल्या. खेरीज त्यात आहे दुस-या व्यक्तीच्या मर्यादांची जाणीव. त्यात अनैतिक, असामाजिक, असभ्य, असं काहीच नाही. यात स्वार्थाची कणभरही झाक नाही. आहे ती समाजासाठी काही करण्याची, त्याचं देणं देण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची ओढ. मी, माझा संसार, माझी मुलं, माझं घर यापलीकडे जाऊन आपल्या अस्तित्वाला अर्थ जोडण्याची, नवे पैलू पाडण्याची आकांक्षा.

या सीमोल्लंघन विशेषांकासाठी अनेक वाचकांनी आपली मतं, अनुभव, विचार आमच्याकडे पाठवले, त्यांना धन्यवाद. (काही लेख आमच्यापर्यंत पोचेस्तोवर वेळेची मर्यादा ओलांडलेली होती, परंतु त्या लेखांनाही लवकरच प्रसिद्धी देऊ.) या अंकाचा उद्देश होता आपल्याच कोषात दडून बसलेल्यांना त्यातून बाहेर पडून जगाकडे नवीन नजरेनं पाहायला लावण्याचा, आळस झटकून काहीतरी सकारात्मक कृतीपर्यंत नेण्याचा.

मग ते स्वत:च्या प्रकृतीसाठी सकाळी फिरायला जाणं असो की आपल्या लाज-या स्वभावाला मुरड घालून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं. अंक तुम्हा सर्वांना आवडेल, अशी आशा. तो कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा, तुमच्या पत्रांची/ई-मेलची/एसएमएसची मधुरिमा आतुरतेने वाट पाहतेय.

विजयादशमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा.

या सीमोल्लंघनाच्या निमित्ताने मराठीतले या संबंधातले शब्द, वाक्प्रचार, म्हणी आठवल्या. अटकेपार झेंडे, सहनशक्तीची परिसीमा, मर्यादापुरुषोत्तम राम, अंथरूण पाहून पाय पसरणे, भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी, कूपमंडूक, अंग फुगवून बैल होण्याचा प्रयत्न करणारी बेडकी, कुंपणापलीकडचं हिरवंगार दिसणारं शेत, असं बरंच काही. मागच्याच मधुरिमाच्या अंकातली कव्हर स्टोरीदेखील याच विषयाला स्पर्श करणारी होती, पृथ्वीच्या वातावरणाच्या पल्याड पार अंतराळात जाऊन पोचलेल्या बायकांची. तसं म्हटलं तर भल्या पहाटे पांघरूण फेकून देऊन अंथरुणाबाहेर पडण्यापासूनच आपलं सीमोल्लंघन सुरू होतं, आणि दिवसभर आपण ओलांडत राहतो अनेक मर्यादा, सीमा, उंबरठे, दरवाजे. शारीरिक आणि मानसिक.

Comments