गेल्या आठवड्यात बालदिन झाला. मोठं झाल्यावर बालदिन कसा साजरा करायचा, हे आजच्या व्हॉट्सअॅप/ट्विटर/फेसबुकच्या पिढीला पडलेलं कोडं कुणी शहाण्या माणसाने सोडवलं. फटाफट सगळीकडे मेसेज गेले की आजच्या बालदिनी आपला बालपणीचा फोटो प्रोफाइल पिक म्हणून टाकायचा. झालं, जुने अल्बम काढून त्यातला बरा दिसणारा फोटो शोधून तो स्कॅन करून अनेकांनी टाकला. पण हे फोटो पाहायला किती मजा आली सांगू. बहुतेक मुलींच्या हातात बाहुली होती. काहींनी परकरपोलकं घातलेलं. काही जणांनी संक्रांतीचे हलव्याचे दागिने घातलेले फोटो टाकलेले. काही जणांचे बादलीच्या आत बसून अंघोळ करतानाचे. या सर्वांचीच आपलं बालपण पुन्हा अनुभवण्याची ही धडपड होती. त्या निमित्ताने या सर्वांनी घरातली कपाटं धुंडाळून जुने अल्बम शोधले असतील. मग ते फोटो पाहताना आईबाबांकडून प्रत्येक फोटोमागची स्टोरी कळली असेल.
कोणी, कधी, कुठे, कसा काढला याची प्रत्येक फोटोची ष्टोरी असते नाही, त्या निमित्ताने त्या व्यक्तींची, सहलींची आठवण निघाली असेल. आपण किती बावळट होतो ना किंवा छान दिसत होते की मी किंवा हा माझा फोटो आहे, असे उद्गार मनातल्या मनात प्रत्येकानेच काढले असतील. साधारण पंधरावीस वर्षांच्या मुलामुलींचे लहानपणचे फोटोही रंगीत होते. त्याहून मोठ्यांचे मात्र कृष्णधवल. जुन्या कॅमे-याने काढलेले, किंचित चुरगळलेले, घडी पडलेले, अस्पष्ट झालेले. यातून लक्षात येत होती हे सांगण्याची धडपड की माझंपण बालपण तुमच्यासारखंच, आपल्या सर्वांसारखंच, सर्वसाधारण होतं. त्या आठवणी अजून आवडणा-या, मन प्रसन्न करणा-या, खळखळून हसायला लावणा-या क्वचित उदास वाटायला लावणा-याही आहेत. पण ते फक्त माझं, एक्स्क्लुजिव्ह का काय म्हणतात ते, आहे.
याच दिवशी फिरणारा एक मेसेज हे सगळं कमीत कमी शब्दांत सांगणारा होता. ‘मोठं झाल्यावर तू कोण होणार, असं लहानपणी विचारायचे तेव्हा कळायचं नाही काय उत्तर द्यायचं. आता मोठं झाल्यावर कळतंय, मला परत लहान व्हायचंय!’
Comments
Post a Comment