म्हातारी कुणाला म्हणतेस गं?

संध्याकाळची ऐन गर्दीची वेळ. दादर रेल्वे स्थानकावरची किचाट गर्दी. कल्याणला जाणारी लोकल आली आणि त्यात एकाच वेळी अनेक बायका चढण्याचा प्रयत्न करत असताना थोडी पडापडी झाली. त्यावर मात करून आत शिरून बसल्यावर, समोर बसलेल्या मुलीने तिच्या बाजूला बसलेल्या बाईला म्हटलं, ‘तुमचं इतकं वय झालंय, कसं चढायचं गाडीत कळत नाही अजून तुम्हाला. पडले ना मी त्यामुळे.’ झालं, इतकं वय म्हटल्यावर शेजारच्या बाईचा पारा चढला. ‘म्हातारी? मी म्हातारी? मग तू काय मोठी तरुण लागून गेलीस गं. तुझा जन्म कालच झालाय म्हणायला हवं मग.’ दोघींची बडबड काही वेळ सुरूच राहिली आणि आजूबाजूच्या बायकांची चांगलीच करमणूक झाली.

कारण शेजारची बाई म्हातारी नसली तरी त्या मुलीपेक्षा किमान वीस वर्षांनी तरी मोठी होतीच.

तरीही तिला म्हातारी म्हटल्याचा इतका राग आला होता. ती होती टापटीप. ख्रिस्ती होती, छानसा आधुनिक ड्रेस घातलेला, केसांचा बॉब. वय लपवण्याचे प्रयत्न बरेचसे सफल झालेच होते तिचे. म्हणून या मुलीच्या बोलण्याने तिला एकदम उघडं पडल्यासारखं वाटलं होतं बहुधा.

आपलं प्रत्यक्ष वय इतरांपासून लपवण्याचे केविलवाणे प्रयत्न बहुतेक जण करताना दिसत असतात. एखादाही केस पांढरा झाला की केस रंगवणं, ब्यूटी पार्लरला सतत फे-या मारून ट्रीटमेंट करून घेणं, आपल्या मुलीला शोभतील असे कपडे घालणं, केस छोटे कापणं, उंच टाचांच्या चपला/बूट वापरणं असे मार्ग अनेकजणी चोखाळतात. पुरुषही यात मागे नसतात, पण बायका जरा जास्तच करतात. केसाच्या रंगांच्या जाहिरातींमध्येदेखील हाच मुद्दा बरोबर पकडलेला असतो. आंटी/अंकल असं म्हटलं की यांचा पापड मोडतो, ते निराश वगैरे होऊन जातात आणि या तरुण दिसण्याच्या मार्गाला लागतात. (अपवाद एकच, रेल्वे वा बसच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती मिळाव्यात म्हणून पांढरे केस चालवून घेणारे लोक.)

का आपलं वय माणसाला स्वीकारता येत नाही? ग्रेसफुली म्हातारं होत जाणं ही इतकी कठीण गोष्ट आहे का? वयाला शोभेल असं वागा, असं आपण मुलांच्या कानीकपाळी ओरडत असतो, मग आपलंच वाढतं वय आपल्याला डाचत/बोचत का राहतं? की आयुष्य हातातून निसटून जातंय, ते पकडून ठेवण्याची ही धडपड असते? आजकाल खरंतर विविध कारणांनी केस पांढरं होणं, त्वचा खराब होणं, सुरकुत्या पडणं ही लक्षणं विशी वा तिशीतच दिसू लागली आहेत. एवढंच काय, हृदयविकार, मधुमेह वा रक्तदाब हे अगदी हल्लीपर्यंत पन्नाशीनंतर गाठणारे रोग तिशी वा चाळिशीत गाठू लागले आहेत. त्यामुळे पहिला पांढरा केस ही अनेकांना या सगळ्याची, म्हातारपणाची, परावलंबित्वाची आणि पर्यायाने मृत्यूची चाहूल वाटू लागते की काय, म्हणून ही वय लपवण्याची धडपड सुरू असते?

त्यापेक्षा वाढत्या वयाबरोबर आपल्यात मॅच्युरिटी कशी येईल, इतके दिवस स्वत:साठी जगलो, आता हळूहळू दुस-यासाठी काही करता कसं येईल, याचा विचार केला तर तारुण्य अधिक काळ टिकेल, नाही का?

Comments