कठीण आहे, अशक्य नाही

मधुरिमाने कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या विषयाशी निगडीत अंक काढण्याचे ठरवले, वाचकांना त्यासाठी आपले अनुभव पाठवण्याचे आवाहन केले, त्यानंतर काही दिवसांनी तरुण तेजपाल प्रकरण उजेडात आले. या विषयावर टीव्ही, वर्तमानपत्रे यांमध्ये प्रचंड चर्चा झाली, आपणही आपसात यावर बोललोच. तरीही केवळ एका वाचकाने या विषयीचा अनुभव पाठवला, जो या अंकात इतरत्र प्रसिद्ध केला आहे. याचा एक अर्थ असा निघू शकतो की, राज्यात सर्व आलबेल आहे, महिलांना काम करायला अत्यंत आदर्श परिस्थिती आहे. परंतु, ते तसे नाही, हे आपण जाणतोच. एकच अनुभव आमच्यापर्यंत पोहोचण्याचा अर्थ असा आहे की, नाव न देण्याची सोय असूनही बायका याबद्दल बोलायला, अनुभव शेअर करायला तयार नाहीत. समाजाचा इतका प्रचंड दबाव अजूनही त्यांच्यावर आहे की नको तो विषय आणि नको त्याविषयी बोलणं असं त्यांना वाटतं. अनुभवातून आपली ओळख लोकांना कळेल, ठरलेलं लग्न मोडेल, आत्ताच्या कार्यालयात त्यावरून त्रास होईल अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती त्यांना वाटते. कारण अशा प्रकारचा छळ झालेल्या ब-याच जणींनी आपल्या घरीसुद्धा ही गोष्ट सांगितलेली नसते, घरी उगाच प्रॉब्लेम नको म्हणून. त्यांनी तो छळ होता होईतो सहनच केलेला असतो; पण या अंकातल्या काही घटनांवरून असे जाणवते की एकीने आवाज उठवला तर निदान तिच्यानंतर असा छळ इतर कुणाच्या वाट्याला येत नाही.

याविषयीच्या कायद्याचा गैरवापर होतो, पुरुष सहका-याचा बदला घेण्यासाठी त्याच्याविरुद्ध अशी तक्रार केली जाते, अशीही अनेक उदाहरणे आहेत. मात्र, त्यामुळे खरोखरीचा असा छळ अनुभवणा-या स्त्रीवर अन्याय होतो, हे आपण एक स्त्री म्हणून लक्षात घेतले पाहिजे. तसेच मोकळेपणा आणि छचोरपणा यातली सीमारेषा धूसर आहे, त्यातले संतुलन राखणे कठीण आहे, पण अशक्य नव्हे; हे ध्यानात ठेवून वागले म्हणजे समोरच्याच्या चुकीच्या वर्तनाला वेळीच आवरते घेणे शक्य होते. (हे स्त्री-पुरुष दोघांनाही जसंच्या तसं लागू होतं.)अंक कसा वाटला, त्यातून तुम्हाला घेण्यासारखे काय वाटले, हे सांगणार ना आम्हाला?

Comments