होऊ दे खर्च नवीन आहे वर्ष

सरत्या वर्षात लक्षात राहणा-या (चांगल्या की वाईट, बरोबर की चूक याच्याकडे नका पाहू) अनेक गोष्टी घडल्या. राजकारण, क्रीडा, कला, आदी अनेक क्षेत्रांत विविध घडामोडी घडल्या. हिंदी व मराठी चित्रपट/नाट्यसृष्टीतले इतके कलावंत काळाच्या पडद्याआड गेले की असं वाटावं, देवाला स्वर्गात खूप कंटाळा आला म्हणून त्याने त्याच्या मनोरंजनासाठी या सर्वांना जवळ बोलावलं जणू. क्रिकेटमधला देव सचिन तेंडुलकर निवृत्त झाला. दिल्लीतल्या राजकारणातल्या घडामोडी अनाकलनीय नव्हेत, पण अनपेक्षित नक्कीच होत्या.
काहीकाही शब्द किंवा वाक्यप्रयोग या काळात इतके गाजले की गावोगावी लागणारे फ्लेक्स असोत वा फेसबुकची पेजेस वा व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज, त्यांच्याशिवाय पुरेच होत नाहीत. उदाहरणार्थ, ‘होऊ दे खर्च, चर्चा तर होणारच!’ ‘होऊ दे खर्च’ हा तर सर्व राजकारण्यांचा मार्गदर्शक जीवनमंत्र असावा बहुधा. होऊ दे खर्च, करा घोटाळे, भरा आपलेच खिसे, चर्चा तर अशी ना तशी होणारच. 
मधुरिमामधूनही काही सदरांना आपण मागच्या अंकात निरोप दिला, काही नवीन स्तंभ या अंकापासून सुरू करतोय. त्यात सहजीवन, अर्थकारण, चालू घडामोडींच्या निमित्ताने ढोंगी वृत्तींवर मारलेली टप्पल असं काही वाचायला मिळेल. वाचकांशी वर्षभर विविध निमित्तानं झालेल्या गप्पांमधून आमच्यापर्यंत तुमची मतं पोहोचतात. त्यानुसार ‘आयुष्याचं पासबुक,’ ‘सेकंड इनिंग,’ ‘जाणीव अधिकारांची,’ ‘स्पंदन’ अशी काही वाचकप्रिय सदरं यंदाही तुमच्या समोर येतीलच. नवीन स्तंभ आवडले का, ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एसएमएस हा मार्ग यंदाही अर्थात उपलब्ध आहेच, त्यावर जास्तीत जास्त प्रतिक्रिया लिहा. ई-मेल, पत्र, दूरध्वनी हे मार्गही अर्थात आहेतच, काहीही वापरा पण आपलं मत आमच्यापर्यंत पोहोचू द्या.
2013च्या पहिल्या मधुरिमाच्या कव्हर स्टोरीमध्ये काही संकल्प मांडले होते आम्ही तुमच्यासमोर. त्यातलं काहीच न करता येण्याजोगं नव्हतं; पण प्रत्यक्षात काय काय करायला जमलं, केलं, करायची इच्छा होती पण जमलं नाही, ते आम्हाला कळवणार ना?
नवीन वर्ष सर्वांना सुखसमाधानाचे, शांततेचे जावो. भरपूर वाचा, लिहा, खूप हसा, व्यायाम करा, भटका, गाणी गा, चित्रं रंगवा, आकाशातले तारे पाहा, जीव ओतून काम करा, कुटुंबासोबत मस्त वेळ घालवा, समाजाचं देणं द्यायचं लक्षात ठेवा, जेणेकरून रात्री अंथरुणावर पडल्यापडल्या शांत झोप लागेल आणि सकाळी उठाल ते ताजेतवाने होऊनच.

Comments