दरवर्षी तेच तेच...

सासवडला आलेय, सकाळपासून भोवताली फक्त माणसंच माणसं. प्रचंड गर्दी, टाळ्यांच्या गजरात मुलाखती, बाल आनंद मेळावा, विडंबन आदी कार्यक्रम सुरू आहेत. पुस्तक प्रदर्शनात पाय ठेवायला जागा नाहीये. कुणी हरवलं तर शोधणं महामुश्कील. तशीच खूप गर्दी खाऊच्या स्टॉलवर आहे. या गर्दीत, आनंदाची गोष्ट आहे अर्थात, बायांची संख्या लक्षात येण्याजोगी आहे. कॉलेजमधल्या मुलीसुद्धा मोठ्या कुतूहलाने, उत्साहाने आल्या आहेत.
हे सगळं नेहमीचंच, दरवर्षीसारखंच. त्यामुळे आपल्या सर्वांच्या जवळचा विषय स्वच्छतागृह- हासुद्धा नेहमीसारखाच. अत्यंत अपुरा, अस्वच्छ, पाण्याविना. हां, पण एक श्रेय दिलं पाहिजे आयोजकांना; त्यांनी आडोसा मात्र केला होता. किती मोठी ही सोय. तीसुद्धा अनेक ठिकाणी. हो ना?
का बरं असं?   बायका कामासाठी, शिक्षणासाठी घराबाहेर पडल्या त्याला किमान 50 वर्षं तरी झाली असतील. घरून निघालं की ऑफिसला पोहोचेपर्यंत स्वच्छतागृहात जाण्याची सोय नाही. अजूनही नाही. महापालिका, राज्य सरकार, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा सगळ्यांच्या अखत्यारीत येणारा हा विषय. पण कोणीच त्यावर पुरेसा उपाय केलेला नाही.
मुंबई-पुण्यासारख्या शहरातदेखील ही अवस्था. मोठी शहरं, गावं या ठिकाणी काय परिस्थिती आहे, एरवीसुद्धा आपण रोजच अनुभवत असतो. मधुरिमाने काही महिन्यांपूर्वी यावर कव्हर स्टोरी केली होती, ती आपल्या लक्षात असेलच. त्यानंतरही परिस्थिती तीच आहे, बिघडलीच असेल अजून; सुधारली नक्कीच नाही.
याविषयी आपण काय करू शकतो? काही करू शकतो का? कोणी करायचं, हादेखील प्रश्न आहे; पण कोणी तरी काही तरी केलंच पाहिजे, असं आता प्रकर्षाने वाटू लागलंय.
या पार्श्वभूमीवर दोन वर्षांचा जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा अनुभव खूप वेगळा आहे, जपून ठेवावासा आहे. फेस्टिव्हलला येणा-या महिलांची संख्याही काही हजारांत असते. खेरीज त्यातल्या ब-याचशा तथाकथित उच्चभ्रू वर्गातल्या. फेस्टिव्हलमध्येही प्रवेश मोफत असतो. तो पाच दिवस चालतो. तिथे जास्तीत जास्त वीस स्वच्छतागृहे असतील; परंतु ती खरीखुरी स्वच्छतागृहे. पुरेसं पाणी आणि ती स्वच्छ, कोरडी ठेवण्यासाठी पूर्ण वेळ असलेली व्यवस्था.
एवढंसुद्धा आपल्याला जमू नये?

Comments