लोकलचा ताण

काल संध्याकाळी सातच्या सुमाराला नेहमीप्रमाणे ७.१७ची ठाणे फास्ट पकडायची म्हणून दादरला पोचले तर गाड्यांचा गोंधळ असल्याचे समजले. एका भाचीने whatsapp वर messageही टाकला तेवढ्यात. platform १/२ वर जाणे म्हणजे घुसमटून जाण्याची हमखास खात्री. त्यामुळे नेहमीच्या ४ numberच्या फलाटावर उतरले तो प्रचंड गर्दी. त्यात बायकांच्या डब्याजवळचा फलाटाचा मोठा भाग आठवड्यापासून खणून ठेवलेला. ७.१७ CSTहून पकडणार्या मैत्रिणीला फोन केला तर ती म्हणाली, अर्धा तास झाला, एकही ट्रेन CSTहून निघालेली नाही आणि अर्थातच स्टेशनवर खूप गर्दी होती तिथेही. घोषणाही नव्हत्या होत, त्यामुळे काय झालाय ते कळत नव्हतं. मग मी पटकन दादर पूर्वेला बाहेर पडले, prepaid taxi केली आणि घराच्या दिशेने निघाले. तोवर ७.२० झाले होते. त्या वेळी नेहमी असणारा traffic होता पण तासाभरात मी मुलुंडला पोचले. कधी नव्हे तेवढी आरामात. सोबत जवळच राहणारी मैत्रिणीची मुलगी होती.
मी sion पर्यंत पोचत होते तेव्हा ट्रेनच्या मैत्रिणीचा फोन आला, ट्रेन सुटलीये, दादरला पोचेल १० मिनिटात. आणि रिकामी आहे. तरीही मला ३७० रुपये घालून taxi केल्याचं वाईट नाही वाटलं. कारण फलाटावरच्या त्या चिंचोळ्या जागेत, अत्यंत stressed गर्दीच्या मध्येच ३० मिनिटे काय ५ मिनिटेसुद्धा घालवणे म्हणजे आपल्या हृदयावर मोठा ताण देणे असते असे माझे मत झाले आहे. सुदैवाने मला घरी पोचण्याची desparate घाई नव्हती कारण मुलगी मोठी आहे आणि सासूचा भक्कम पाठिंबा आहे. पण अशी परिस्थिती नसतानाही, म्हणजे घरी किंवा पाळणाघरात छोटे मूल असेल तर, गाडीतून लोंबकळत जाणे कितपत योग्य आहे? म्हणजे लगेच taxi करावी असे नाही परंतु आपण बायका गाडी उशिरा असल्याचा प्रचंड त्रास करून घेतो, घरी लवकर पोचावे म्हणून किती उपद्व्याप उचापती करतो, ते सगळे worth आहे का असे मला हल्ली वाटू लागले आहे. चालती लोकल व बस पकडणे तर नेहमीचेच. आपण त्या पायी जीव किती धोक्यात घालतो याचा विचारच आपण करत नाही.
अर्थात आपण हे का करतो? तर घरी नवरा आणि मुले वाट पाहतायत, स्वयंपाक करायचाय, आपण केल्याशिवाय साधा वरणभातही कोणाच्या पोटात पडणार नाही, हे माहित असते. सासू दिवसभर पोराला सांभाळते हेच खूप उपकार आहेत, जर उशीर झाला की कपाळावर आठ्या पडतील, कदाचित टोचून बोलणे वगैरे. हे सगळे डोळ्यांसमोर दिसत असते.
म्हणजे आपली support system नेमक्या अशा वेळी कुचकामी ठरते. त्यामुळे घरच्या मंडळीना अशा परिस्थितीची कल्पना देणे, मुलांसकट सर्वांची अशा एखाद्या emergency साठी मनाची तयारी करून ठेवणे हेच आपल्या हातात उरते. लहान मुलानाही विविध कारणांमुळे ट्रेन बंद पडतात, त्यात अडकले की काय अवस्था होते, याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे एखाद्या दिवशी अशी वेळ आल्यास काय करावे, कसे वागावे, आजी आजोबाना त्रास देऊ नये, अभ्यास आपला आपण करावा, अमुकच खायला हवे असा हट्ट करू नये, असे सांगून ठेवता येते. मुख्य म्हणजे सारखा सारखा फोन करू नये, त्याने आईबाबाच्या मेंदूवरच्या ताणात भर पडते, हेही नक्की सांगावे.
मुंबईसारख्या शहरात राहून, नोकरी करून, सतत लोकल वेळेत आहे की नाही, muster गाठता येईल की नाही, याचा केवढा ताण इथल्या लोकांवर येत असेल त्याची आपण कल्पना नक्की करू शकतो. हा ताण बाया व बाप्ये दोघांनाही सारखाच, यात शंका नाही.
यावर आपण प्रत्येकाने काहीतरी उपाय तातडीने शोधला पाहिजे अन्यथा आपल्या मानसिक व शारीरिक तब्येतीचे काही खरे नाही हे आपल्याला आतापर्यंत चांगलेच कळले आहे. हो ना? 

Comments