गोष्ट एका ‘सेल्फी’ची

दीड महिन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं निधन झालं. त्यानंतर आठवडाभराने जेव्हा त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले तेव्हा जगभरातील राष्‍ट्राध्यक्ष, ज्येष्ठ नेते त्या सोहळ्याला हजर होते. त्याला अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, ब्रिटनचे   पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉनही होते. सोहळा सुरू असताना एका चतुर छायाचित्रकाराने ओबामा, कॅमेरून आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान हेले थॉर्निंग श्मिट या तिघांची काही छायाचित्रे काढली. त्यात काय नवल, असं वाटेल तुम्हाला. पण नवल हे होतं की ही छायाचित्रे होती हे तिघे मोबाइलवर आपले ‘सेल्फी’ (म्हणजे आपल्याच मोबाइलवर आपणच काढलेले छायाचित्र) टिपत असतानाची. अगदी कमी किमतीत स्मार्टफोन मिळू लागल्यानंतर सेल्फी हा शब्द 2013मध्ये प्रचलित झाला आणि कोट्यवधी तरुणांनी तो उपयोगात आणला, सेल्फी टिपून. ओबामांच्या या सेल्फीवर 
खूप टीका झाली, अंत्यविधीसारख्या गंभीर प्रसंगी राष्‍ट्राध्यक्षांनी असे वागणे शोभत नाही, वगैरे वगैरे. त्यावर या तिघांचे म्हणणे असे होते, की आम्हीही सर्वसामान्य माणसं आहोत, आम्हाला आमचा सेल्फी काढावासा वाटला, यात काय चूक? 
प्रकरण एवढ्यावरच संपत नाही. या प्रसंगी ओबामांच्या शेजारीच मिशेलही होत्या. परंतु त्या या सेल्फीमध्ये नाहीत. एवढेच नव्हे तर या वेळी छायाचित्रकाराने टिपलेल्या छायाचित्रात त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते. आता महिनाभरानंतर अमेरिका आणि जगभरातल्या प्रसिद्धिमाध्यमांमध्ये वावड्या  उठल्या आहेत, की बराक व मिशेल विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत. सेल्फी प्रकरणानंतर व्हाइट हाऊसमध्ये परतल्यानंतर मिशेल यांनी ही नाराजी पतीच्या कानावर घातली आहे व त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपल्यावर प्रत्यक्ष घटस्फोट घेण्यात येईल, अशा प्रकारच्या या वावड्या आहेत. 
हे वाचून वाटतं की लग्न टिकवायचं ओबामांसारख्या एका बलाढ्य राष्‍ट्राध्यक्षालासुद्धा कठीण जातंय की काय. (अभिनेता हृतिक रोशनपासून त्याची पत्नी सुझान वेगळी झाल्याची बातमी मागच्या महिन्यात आल्यानंतर एक विनोद सगळीकडे फिरत होता की एक सुपरमॅनसुद्धा विवाह वाचवू शकला नाही.) प्रेमात पडून किंवा घरच्यांनी ठरवून लग्न करणं एक वेळ सोपं वाटावं, पण आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात ते टिकवणं सोपं राहिलेलं नाही. तंत्रज्ञानाने जशी दूरची माणसं जवळ येतात, तशी जवळची माणसं दूर जातात, हेही आपल्याला दिसतंय. शशी थरूर व सुनंदा पुष्कर यांच्यातील मतभेदही ट्विटरमुळे चव्हाट्यावर आले, या मतभेदांचा उगम काही अंशी ट्वीट्समध्ये होता, असे आत्ता तरी वाटते आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, ते आपणच विचार करून ठरवलं पाहिजे. हो ना?

Comments

  1. Dear Editor,
    Thank you very much for sharing your article- reflecting upon tech and human relationship. Liked your perspective in the article and the subtle nuances you have handled about human emotions and the modern age human beings. I especially liked one sentence in your article which did sound to me philosophically profound ...the sentence : जशी दूरची माणसं जवळ येतात, तशी जवळची माणसं दूर जातात, हेही आपल्याला दिसतंय. This indeed was a thought provoking article .
    Best wishes,
    Dr.Priya M Vaidya

    ReplyDelete

Post a Comment