प्रेमच ते, आणखी काय?

वय वर्षं 86. गेल्या काही वर्षांपासूनच्या तब्येतीच्या कुरबुरींना कंटाळलेला एक माणूस. तब्येत जरा जास्त बिघडल्याने रुग्णालयात दाखल. आठवडाभराच्या औषधोपचारानंतर प्रकृतीत पुष्कळशी सुधारणा झालेली. आणि अचानक तो असहकार पुकारतो. खाणंपिणं सोडाच, औषधाची गोळीही तोंडात घ्यायला तयार नाही. भेटायला आलेल्या नातलगांशी बोलणं तर नाहीच, चक्क पाठ फिरवून भिंतीकडे तोंड करून झोपून जायचं. गोळी जबरदस्तीने भरवावी तर तोंडावर इतका घट्ट हात दाबून घ्यायचा की या माणसाच्या अंगात इतकी शक्ती आली कुठून असा प्रश्न पडावा. दिवसभर अनेकांनी प्रयत्न केले त्याने काही खावं म्हणून. लाडक्या नातीने फोनवरून विनवलं, एका बहिणीने सांगून पाहिलं, बायकोने लहान मुलासारखं समजावलं; पण स्वारी ढिम्म. अखेर बायको येतेच रुग्णालयात, स्वत:च्या प्रकृतीच्या तक्रारी मागे ठेवून. आणि तो तिने भरवलेले चारपाच घास खातो. विनातक्रार.

म्हणजे दिवसभराचं असहकार आंदोलन केवळ तिने घर सोडून आपल्याला पाहायला यावं, आपल्याकडे लक्ष द्यावं यासाठीच होतं का? बायकोने आपल्याकडेच लक्ष द्यावं, अशा स्वार्थी विचारातून केलेलं? की त्याला असं वाटलं असेल, तिची तब्येत बरी नाहीये, घरातले बाकीचे लोक आपल्या मागे फिरतायत, तिलाच घर सांभाळावं लागतय, ते सगळं मागे टाकून ही आपल्यासाठी इथवर आली; आता आपण तिच्या हातचं नाही खाल्लं तर ती फार निराश होईल, या भावनेतून त्याने खाल्लं असेल तिच्या हातून? जवळपास साठ वर्षांचा त्यांचा सहवास त्याला आठवलाच असेल ना त्या क्षणी. बास झालं आजारपण, औषधं, सलाइन, तपासण्या, असं त्याला वाटतंय हे इतरांनाही कळत होतं. पण आपलं माणूस कितीही म्हातारं झालं, आजारी असलं तरी आपल्याला हवंच असतं. हे त्या माणसालाही कळत असतं. पण जीवनेच्छा संपली की पुढच्या आयुष्याला तसा काही अर्थच नसतो. आणि तरीही आपल्या या जिवाभावाच्या सखीसाठी तो हे करतो. हे प्रेम नव्हे तर काय आहे?

Comments

  1. जन्मभर तिला ऐकायला लावले, एकदा तरी तिचे ऐकू असेही वाटले असेल
    तरीही ग्रेट!

    ReplyDelete

Post a Comment