एका कलंदराच्या आठवणी


दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अशोक जैन यांच्या आठवणींना उजळा देण्यासाठी त्यांचे अनेक सुहृद जमले होते. जैनांचा प्रसन्न हसणारा फोटो आणि त्यासमोरची चाफ्याची फुलं तिथल्या एकूण वातावरणाला साजेशीच होती. तिथे अंगावर येईल असा दु:खाचा आवेग नव्हता आणि त्यांचे सहकारी/मित्र त्यांचे किस्से सांगू लागताच तर हशाच उसळला अनेक वेळा. सुहिता थत्ते यांनी औपचारिक निवेदन नाही केलं, पण त्यांच्या आणि जैनांच्या आठवणी सांगत सांगत एकेकाला बोलण्यासाठी समोर आणलं.

सर्वात आधी आले अरुण साधू. साधू मुंबईत, टाइम्स ऑफ इंडियाचे वार्ताहर आणि जैन दिल्लीत. जैन मुंबईत आले की दोघे मंत्रालयात फेरी मारत. ‘मी रोज मंत्रालयात जाणारा आणि तरीही मला सुरक्षारक्षक अडवत आणि अशोक कुठल्या कुठे पोचलेला असे. सगळेच जण त्याला नावानिशी ओळखायचे. मी एकदा दिल्लीला गेलो, त्याच्यासोबत संसद भवनात गेलो. कॉरिडॉरमधून जाताना समोरून राजीव गांधी आले आणि त्यांना हाय अशोक म्हणत त्याला हात केला. आमच्या मागे काही वार्ताहरांचा घोळका होता. त्या रात्री दिल्लीतल्या किती पत्रकारांच्या पोटात दुखले असेल, हे सांगता येत नाही.’ जैन मूळचे खूप श्रीमंत परंतु काही काळाने मध्यमवर्गात जमा झालेले. त्यांनी पुण्यात शिकता शिकता दुधाची, पेपरची लाइन टाकलेली होती, असे साधूंनी सांगितले.

यानंतर आलेले प्रभाकर पानसरे यांनी ते स्वत:, त्यांचे वडील, मामा व त्यांची उरणला असलेली प्रचंड संपत्ती याविषयीच भाषण केले. जैनांनी त्यांना लिहिते केले, एवढेच यातून घेण्यासारखे होते.

रामदास फुटाणे यांनीही जैनांची दिल्लीतली ओळख कशी नि किती होती, ते सांगितले. ‘तो इतरांसाठी खूप धडपडायचा. सर्व पक्षांमधले खासदार, मंत्री त्याला ओळखायचे. तो चांगला वाचक होता. अनेक कविता त्याला पाठ असत. त्यामुळे तो मैफल सहज ताब्यात घेई. तसाच तो निर्भीड पत्रकारही होता, हे महत्त्वाचे.’

माधव गोखले या जैनांच्या मित्राने त्यांच्या दिल्लीतल्या आठवणी सांगितल्या कारण त्यांची ओळख तिथलीच. मौनी खासदारांविषयी जैनांनी खूप लिहिले, त्याची त्यांनी आठवण करून दिली.

यानंतर बोलल्या श्रीकांत लागू ऊर्फ दाजी या जैनांच्या सर्वात जवळच्या मित्राची मुलगी स्वाती. ‘दर सोमवारी (त्या दिवशी दादरचे दुकान बंद असते) अशोककाकाकडे जाणे हा बाबांचा नियम होता. शेवटपर्यंत त्यांनी तो पाळला. बाबांना रुग्णालयात दाखल केले त्याच्या आदल्या सोमवारीही त्यांना काकाकडे जायचेच होते परंतु आम्ही लिफ्ट बंद असल्याचे खोटे कारण सांगून त्यांना जाऊ दिले नाही कारण त्यांची तब्येत खूप खराब होती. मात्र बाबा त्यातून बरे झाले नाहीत. आता साडेनऊ महिन्यांनी त्यांचा विरह संपलाय. मीही अनेकदा त्यांच्यासोबत काकाकडे जायचे. त्यांच्या गप्पा ऐकणे हा आनंदाचा भाग होता. ’ लागू बंधूंच्या जाहिरातीतील ‘सौंदर्य तुमचे, अलंकार आमचे’ हे शब्द जैनांचे, असे तिने सांगितले.

कुमार केतकरांनी 1972/73पासून त्यांची जैन, दिनकर गांगल, अरुण साधू यांच्याशी ओळख झाली तेव्हापासून सांगायला सुरुवात केली. केतकर इकॉनॉमिक टाइम्समध्ये, साधू टाइम्स ऑफ इंडियात आणि गांगल व जैन महाराष्ट्र टाइम्समध्ये. जैन व गांगल तेव्हा राहात नेहरू नगरमध्ये. तिकडे ग्रंथालीच्या निमित्ताने वा गप्पांसाठी हे सगळे जमत. ‘नेहरूनगर म्हणजे गरिबांचं साहित्य सहवास होतं. उत्तम टॅलेंट तिथे राहात होतं. तिथेच मला या साहित्य सर्कसचा परिचय झाला आणि इतका काळ आम्ही तिथे काढला की मीसुद्धा तिथेच राहतोय असं मला वाटायचं.’ जैनांसोबत केलेले प्रवास मजेशीर असत, जैन बोलत आणि बाकीचे हसत, त्यात असंख्य कोटय़ा असत. त्यांच्यात उत्स्फूर्तता होती. ‘त्याची विनोदबुद्धी पुलंएवढीच होती. आणि त्याला वर्गमर्यादा नव्हती, कोणाशीही तो संवाद साधू शके. आमच्या ग्रूपमधला तो हिरा होता. खर्वसाला इंग्रजीत काय म्हणतात, खर्वस म्हणजे काय हे एका परदेशी पाहुण्याला कसं समजवायचं, असा प्रश्न पडलेल्या एका व्यक्तीला त्याने काय सांगितलं होतं ते पाहा - Ask that man to take a cow, and make her pregnant. After that some cheek will come. After all in their country also they have cows. He will understand.’

आपण एरवी वर्तमानपत्रात नावं वाचतो, ती माणसं अशोकला ओळखायची. वर्तमानपत्रात काम करणारा परंतु वर्तमानपत्रातल्या शब्दांत न मावणारा अशोक.

प्रदीप चंपानेरकर हे जैनांचे प्रकाशक मित्र. ‘नटवरसिंग यांचं वॉकिंग विथ द लायन्स हे पुस्तक अनुवादित करून त्याने दोनतीन आठवडय़ांपूर्वी माझ्या हातात ठेवलं. आमची ओळख तशी नवी, वीसएक वर्षांपूर्वीची. काहीतरी अजब रसायन निर्माण झालं आमच्या मैत्रीचं. खरं तर चाळिशीनंतर नवीन मित्र जोडणं कठीण असतं तरीही आमची घट्ट मैत्री झाली. तो अतिशय पारदर्शक व प्रामाणिक होता आणि म्हणूनच कदाचित लालबहादूर शास्त्रींवरचं पुस्तक अनुवादित करताना त्यात तो खूप गुंतला होता. आळंदी साहित्य संमेलन सुरू असताना मांडवाच्या एका कोपऱयात बसून तो मला लिहिलेलं वाचून दाखवत होता. एकदा तर मला त्याने पहाटे पाच वाजता घरी बोलावलं, लिहिलेलं वाचायला. माझी पत्नी सुजाता आजारी पडली तेव्हा त्याने खूप मदत केली, मुंबईतल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवून दिली. त्याचं जाणं हा माझा व्यावसायिक लॉस तर आहेच पण व्यक्तिगतही आहे.’

दिनकर गांगल हे जैनांचे म.टा.तले सहकारी आणि ग्रंथालीतलेही. त्यांच्याकडे जैनांच्या असंख्य आठवणी, किस्से असावेत. त्यातलं काय सांगावं नि काय राखावं असा प्रश्न त्यांना पडला असावा. जैन गेल्यानंतर त्या दोघांमधलं नातं माहीत असणाऱया अनेकांनी गांगलांना फोन/ईमेल केले. फोन केल्यावर अरुण टिकेकर सुरुवातीलाच म्हणाले की, किती पुलंसारखा होता ना तो. केतकर आणि टिकेकर या दोघांनाही असं वाटावं!

ग्रंथालीच्या स्थापनेच्या सुमाराच्या अनेक बैठका टाइम्सच्या ऑफिसच्या जवळच्या न्यू एम्पायर रेस्तराँमध्ये व्हायच्या, (आता तिथे मॅकडी आहे). ‘या बैठकींच्या वेळी पैसे कोण देतंय याचा हिशोब आम्ही कधीच नाही केला पण अशोकमधला मारवाडी तेव्हा जागा असायचा. त्याला पैसे द्यायचे असायचे, देणं टाळायचं नसायचं,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. साधूंचं ऑफिस तिसऱया मजल्यावर आणि गांगल व जैन दुसऱया. साडेपाचला खाली भेटू असं म्हणून साधू बरोबर साडेपाचला टाइम्सच्या खाली उभे राहात. आणि हे दोघे मात्र सव्वासहाच्या आधी खाली उतरत नसत. ‘त्यावेळी आम्ही पनामा ओढायचो, साधूचं अर्धं पाकीट तरी त्या वेळात ओढून व्हायचं. अशीच तक्रार टिकेकरांनीही केली होती. ते व जैन काही काळ दिल्लीत एकत्र होते तेव्हाही जैनांची वाट पाहण्यात टिकेकरांच्या अनेक सिगरेटी ओढून व्हायच्या.’

‘अशोक किस्से सांगायचा, अनेकदा सांगायचा. पण कुमार, मी, साधू ही तशी क्रिटिकल माणसं. तरी आम्ही ते अनेकवार ऐकायचो कारण त्यांना कलात्मक रूप लाभायचं. दरवेळी त्यात नवीन काहीतरी सांगायचा तो.’

‘रायपूरला त्या वेळी रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते सुभाष गोखले नावाचे. मध्य प्रदेशातल्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला त्यांना केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना बोलवायचं होतं. मग ते थेट जैनांकडे गेले दिल्लीत, ओळखपाळख नसताना. आणि जैनांनी त्यांना स्वत:च्या गाडीतून फिरवून तीन मंत्र्यांच्या तारखा मिळवून दिल्या.’ गोखले काही कामाने गांगलांकडे आले असता त्यांनी हा विषय काढला. गांगलांची व जैनांची मैत्री त्यांना ठाऊक नव्हती. मग गांगलांनी त्या दोघांच्या फोनवरून गोष्टी करून दिल्या आणि याचं गोखल्यांना अप्रूप वाटलं.

सर्वात शेवटी बोलल्या विजया चौहान. ‘माझी एकही मैत्रीण बोलली नाही, हे अशोकला आवडलं नसतं. त्याची मैत्रीण म्हणून मी बोलतेय. त्यांचं चित्रपश्चिमा हे सदर वाचून मला पाश्चिमात्त्य सिनेमांची गोडी लागली. मी दिल्लीत एका फेस्टिवलमध्ये राशोमान पाहिला आणि ते पाहून मला जे वाटलं ते भल्यामोठय़ा पत्रात त्याला लिहून पाठवलं. त्यावर त्याचं एकाच ओळीचं पत्र आलं, माझी नोकरी घालवायचा विचार आहे का. तो कमालीचा संवेदनशील होता. नावाप्रमाणेच शोक करायला न लावणारा.’

शेवटी गांगलांनी जैनांची पत्नी सुनीती व मुली क्षिप्रा आणि बिल्वा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली - जवळपास १४ वर्षं जैनांची सेवा केल्याबद्दल, त्यांना सांभाळल्याबद्दल, त्यांच्यातला लेखक जिवंत ठेवल्याबद्दल. कोणाचंच याविषयी दुमत नव्हतं.

विकास परांजपेने जाता जाता सांगितलेली चंपानेरकरांची आठवण. चंपानेरकर पुण्याहून कधीही मुंबईला आले की प्रथम अंधेरीला जैनांच्या घरी जात. फ्रेश होत, शर्ट बदलत व पुढच्या कामाला लागत. आत्ता जैन हॉस्पिटलमध्ये असताना चंपानेरकर त्यांना भेटायला गेले, तर नाकात नळय़ा असतानाही जैनांनी त्यांना विचारलं, ‘शर्ट आणलायस ना बदलायला?’

या कार्यक्रमाला अचला जोशी, अशोक नायगांवकर, विकास परांजपे, संजय भागवत, अशोक हांडे, श्रीधर फडके, डॉ. रविन थत्ते, समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे व नीता ताटके (दिल्लीत त्यांचे कार्यक्रम होत तेव्हा जैनांकडे यांचे नेहमी जाणे होई, असे नीता नुकतीच म्हणाली होती), पुष्पा व अनंत भावे, पत्रकार विद्याधर दाते, महेश म्हात्रे, दिलीप चावरे आदि उपस्थित होते. (काही नावं माझ्याकडून राहिलेली असू शकतात.) महाराष्ट्र टाइम्समधील त्यांचा एकही सहकारी आला नाही, याचा मला व्यक्तिश: खेद वाटला.

Comments

  1. नमस्कार! या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. त्या विषयीची खंत तुमच्या या सविस्तर टिपणाने पळून गेली.
    पुस्तकातून भेटणारा लेखक असा त्याच्या सहवासातील व्यक्तींच्या स्मरणातून भेटला की अधिक कळतो असे वाटते.
    तूमच्या टिपणाने हाच प्रत्यय दिला.
    आभार .
    प्रमोद बापट.

    ReplyDelete

Post a Comment