तुझं माझं आपलं

नोकरी किंवा व्यवसाय किंवा कोणतंही पगारी काम न करणार्‍या बायांना नेहमीच कमावणार्‍या बायांचा हेवा वाटत असतो. कशासाठीही, अगदी दहा रुपयांच्या भेळेपासून हजार रुपयांच्या साडीपर्यंत, नवर्‍यासमोर हात पसरायला लागतात, याचा त्यांना फार कमीपणा वाटत असतो. या आर्थिक परावलंबनातूनच बायांना बरंच काही सहन करावं लागतं. बोलणी ऐकावी लागतात, मन मारावं लागतं, कधी जेवण्याखाण्यावरूनही टोमणे मिळतात. यातून काय मार्ग काढायचा असा प्रश्न त्यांना असतो कारण बर्‍याचदा शिक्षण नसतं आणि खेड्यांमध्ये तर नोकरी करण्याची संधीही नसते. कित्येकदा तथाकथित खानदानाची आब वगैरे बाबी काम करण्याच्या आड येतात. कौशल्य मात्र असतंच प्रत्येकीकडे कोणतं तरी. आणि असते अपार मेहनत करण्याची तयारी.

कुणाच्या लोणच्यांना खूप चव असते, तर कुणाच्या चकल्यांना. कुणाची नटण्याची हौस इतरांना सजवायला उपयोगी येते. कुणाला व्यवसायाची गणितं जमतात, कुणाकडे उत्तम संवादकला असते. शिवणकाम अनेकींना येत असतं. पण या कौशल्याचा उपयोग करून पैसे कसे मिळवायचे ते कळत नसतं. या बायांना स्वयंसहायता गट वा बचत गट हा मोठा आधार वाटतो. दहाबारा जणींनी एकत्र यायचं, सर्वानुमते एक काम ठरवून ते करायचं. ही सेवा असेल किंवा एखादं उत्पादन. त्यातून मिळणारा फायदा सर्वांनी वाटून घ्यायचा. यासाठी अतिशय कमी व्याजानं मिळणार्‍या कर्जाचा लाभ घ्यायचा. या कर्जातून उद्योगाला लागणारी सामग्री घ्यायची, त्यातून कर्ज फेडायचंच, पण फायदाही करून घ्यायचा, असं साधारण बचत गटाचं चित्र. वीस-बावीस वर्षांपूर्वी आपल्या देशात बचत गटांची चळवळ सुरू झाली ती बांगलादेशातील ग्रामीण बँकेच्या मॉडेलवर आधारित. नोबेल विजेते मोहंमद युनूस यांची मायक्रोफायनान्स या संकल्पनेवर आधारित ही बँक बचत गटांची आदर्श आहे.

या विषयावर थोडे संदर्भ शोधताना वाचनात आलं की, 1947मध्ये अमरावती येथे दरमहा 25 पैशांची बचत करता येईल, असा एक गट होता. पुण्यातही सत्तरच्या दशकात अशा प्रकारचे काम होत होते. मात्र, एक चळवळ म्हणून बचत गटांनी मुळे खेडोपाडी पसरली ती 1991-92 नंतर. आता देशभरातील हजारो बचत गटांच्या माध्यमातून लाखो महिला या चळवळीचा भाग बनली आहेत. त्यात पाच ते दहा टक्के पुरुषही आहेत. या गटांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यात सर्व समुदायांतील महिला सहभागी आहेत, कोणताच गट जातीवर आधारित नाही. जवळजवळ 75 टक्के कर्ज हे उत्पादक कामासाठी घेतले जाते. बचत गटाच्या सदस्य झालेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. त्यांना घरात व समाजात अधिक मान मिळतो. (याचे एक छोटेसे उदाहरण वाचले. एका महिलेला तिचा नवरा त्याच्या दुचाकीवर बसवून कधीही कुठे नेत नसे, ती बिचारी सगळीकडे पायीच फिरे. त्याचा विरोध पत्करून ती एका बचत गटाची सदस्य झाली, खूप काम केलं.

एकदा तो गावातून जात असताना त्याला महिलांची सभा सुरू असलेली दिसली. तिथे प्रत्यक्ष जिल्हाधिकार्‍याच्या शेजारी त्याची बायको बसली होती. ते पाहून त्याला साक्षात्कार झाला की इस में कुछ दम है!) त्यांना सुरक्षित वाटते. त्यांची संवादक्षमता वाढते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते हे अर्थात सर्वात महत्त्वाचे.

गटांतर्गत महिला अतिशय वेगवेगळी कामे करतात. पापड, लोणची, मसाले तर आहेतच. पण पावभाजी गाडी, पत्रावळी बनवणे, शेळीपालन, साड्यांची दुकाने, झेरॉक्स, ब्यूटिपार्लर, चहाची टपरी, वाहतूक, वीटभट्टी, मध्यान्ह भोजन, धान्य दळायची गिरणी, डीटीपी सेंटर, पादत्राणे बनवणे, दुग्ध उत्पादने, इत्यादी. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरवण्यात दहा वर्षांपूर्वी सुरुवात केली. मुंबईत दर जानेवारीत भरणार्‍या या प्रदर्शनाला चोखंदळ ग्राहकांची प्रचंड गर्दी असते.

मधुरिमाचा हा अंक म्हणजे या चळवळीची घेतलेली दखल.

Comments