प्रवासाचा ठोकताळा

महिला दिन म्हणजे महिलांचा बैलपोळा असं कविता महाजनांनी गेल्या आठवड्यात फेसबुकवर म्हणून टाकलं. थोडंसं तसं झालंच आहे म्हणा; पण त्यानिमित्ताने महिला आहेत आजूबाजूला, त्यांचे काही हक्क आहेत, अधिकार आहेत, त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, याची जाणीव तर होते. खेरीज जगभरातल्या महिला कोणती नवी शिखरं गाठताहेत, कोणत्या परिस्थितीतून जाताहेत, कशाकशाचा सामना करत कोणत्या संकटांवर मात करताहेत हे कळतं. आणि अर्थातच त्या आयुष्य कसं भरभरून जगताहेत हेसुद्धा.

आजचा मधुरिमाचा अंक आहे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनुभवाला येणा-या वैशिष्ट्यांचा विचार करणारा. पाळण्यातल्या मुलीचं मनोगत हा अर्थातच कल्पनाविलास आहे; परंतु तो वास्तवाच्या खूप जवळ जाणारा आहे, हे तुम्हाला पटलंच असेल. टीनएजर मुलींना खरे तर गंभीरपणे कशाचाच विचार करायचा नसतो, मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसोबत धमाल, गप्पा, सिनेमे आणि जमेल तेवढा अभ्यास हे त्यांचे आयुष्य असते; पण त्यांनाही काही विषय बोचत असतात, हे दिग्वी-गार्गी या मुंबईत अकरावीत शिकणा-या मुलींच्या छोट्या लेखातून लक्षात येते. त्यापुढचा वयोगट पंचविशीपर्यंतचा. शिक्षण, नोकरी आणि लग्न या तीन महत्त्वाच्या विषयांनी घेरलेला. अजूनही महाराष्टÑातल्या बहुतांश मुलींच्या अवतीभवती हे तिन्ही किंवा यातले किमान दोन विषय पिंगा घालत असतातच. या मुलींना काय वाटतं, त्यांना कशाचा जाच होतोय आणि त्यांना काय करायला आवडेल हे केतकी राऊत, दीपाली सपकाळ आणि यामिनी कुलकर्णी या तिघींच्या लेखांमधून खूप स्पष्टपणे आपल्या समोर येतं. त्यात विद्रोह नाही, पण कडवटपणा आहे आणि स्वप्न पाहायची नि पूर्ण करण्याची जिद्ददेखील. त्यांना घरातून आणि समाजाकडून थोडा पाठिंबा हवाय आणि हवाय थोडा विश्वास. तेवढाही त्यांना मिळत नसेल तर ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

नोकरी लागली, लग्न झालं की काही वर्षांतच आई होणं हा बहुतांश सामान्य मुलींचा जीवनक्रम. मुंबईत राहून, आयटीसारख्या तीव्र स्पर्धेच्या क्षेत्रात करिअर करणा-या व बाळंतपणाची रजा संपवून नोकरीवर पुन्हा रुजू होणा-या मीनल उरणकरची गोष्ट तुमच्यापैकी कित्येकींना आपलीशी वाटेल.

शुभांगी जोशी व डॉ. विनया भागवत यांनी आयुष्याच्या मध्यंतरावर थोडं मागे वळून पाहताना चिंतन केलंय. मुलं शिकतायत, लवकरच पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जातील, घरात स्थिरस्थावर आहे, हाताशी घराबाहेर पडून काही नवीन करायला वेळ आहे या टप्प्यावर पोहोचलेल्या सगळ्या मैत्रिणींना त्यांच्या भावना नि विचार पटतील. एवढंच नव्हे, तर विचार करायला, कृती करायला उद्युक्त करतील, असा विश्वास वाटतो.

शिल्पा बेंडाळे आजी झाल्या आहेत आणि जळगावातल्या महाविद्यालयात व्यवस्थापन विभागप्रमुख म्हणून त्यांचं ‘करिअर’ही जोमात आहे. लग्नानंतर, मुलं झाल्यानंतर त्या शिकल्या, हे लक्षात घेण्याजोगं.
विद्या आठले, सुहासिनी कुलकर्णी आणि हिरा कुलकर्णी या तिघी ज्येष्ठ नागरिक. विद्याताई आणि हिराताई नोकरी करून नुकत्याच निवृत्त झालेल्या, तर सुहासिनीताई सत्तरीच्या पुढच्या. या तिघींच्या मनोगतांमधून त्या पिढीच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा पडताळा येतो. त्यांच्या पिढीला नोकरी, मुलं, कुटुंब, सणवार, पाहुणेरावळे या सगळ्याचा उत्तम बॅलन्स कसा काय साधता आला, असा प्रश्न पडावा इतकं समृद्ध जीवन त्या जगल्या आहेत. कव्हर स्टोरीत म्हटल्याप्रमाणे, मनाला वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा स्वावलंबन हा त्यांच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा होता. त्यांच्या पिढीने केलेल्या अपार कष्टांमुळे, तेही चेह-यावर समाधानाचं हसू   ठेवून केलेल्या, आमच्या पिढीचं आयुष्य सुकर झालंय, यात दुमत नसावं.
हे सगळं वाचताना आपण कुठे आहोत, आतापर्यंत काय केलंय, सध्या काय चाललंय
आणि पुढे काय करायचंय याचा थोडा ठोकताळा मांडणार ना?
महिला दिन आहे म्हणून रोजच्यापेक्षा अधिक आनंदात राहायचं, सेलिब्रेट करायचं (नाही तरी पुरुष चिडवतातच ना आपल्याला, आमचा एकही दिवस नसतो म्हणून...) एवढं तर आपण नक्कीच करू शकतो. हो नं?

Comments