चिमणी

चिमणीला मग पोपट बोले,
‘का गं तुझे डोळे ओले?’
‘काय सांगू बाबा तुला
माझा घरटा कोणी नेला...’
अशोक नायगावकरांच्या या ओळी आठवल्या जागतिक चिमणी दिनानिमित्त. पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत, चिवचिवाटाने वीट आणणा-या चिमण्या अचानक गायब झाल्या. मग पर्यावरणवाद्यांनी हे सर्वसामान्यांच्या लक्षात आणून दिलं की, वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांना घरटी बांधायला जागा मिळत नाहीये. त्यावर एक छोटासा उपाय म्हणून अनेक संस्थांनी त्यांच्यासाठी लाकडी घरटी तयार केली. ब-याच लोकांनी ती घरटी आपल्या घराबाहेर टांगली व चिमण्यांची चिवचिव पुन्हा वाढायला लागली. चिमण्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 20 मार्च हा चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.
घरट्यावरून ग्रेसांचा एक धडा आठवला शाळेत शिकलेला. चिमण्यांच्या त्रासाने कावलेला लेखक एक दिवस घरात बांधलेलं घरटं अंगणात आणून जाळून टाकतो. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की, चिमण्या त्याच्या घराकडे फिरकत नाहीयेत; पण त्यामुळे गेली कटकट एकदाची असं वाटण्याऐवजी त्याला जास्त त्रास होतोय. आपण फार मोठा अपराध केलाय चिमण्यांचा, असं वाटायला लागतं.
‘एक होती चिमणी नि एक होता कावळा’ची गोष्ट, ‘उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले’ ही कविता, ‘चिमणी चिमणी पाणी घाल, कावळ्या कावळ्या वारा घाल,’ अशी पाटी पुसताना घातलेली साद, ‘एक चिमणी आली, दाणा टिपून गेली’ची गोष्ट, चिमणीच्या दाताने तोडलेला पेरू, या लहानपणीच्या आठवणी यानिमित्ताने जाग्या होतात. थोडं वय वाढल्यावर, म्हाता-या आईवडिलांनी घातलेली ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या,’ ही साद कसंनुसं करून जाते.
आणि त्याच वेळी घरात आरशासमोर बसून एखादी चिमणी स्वत:लाच न्याहाळत असते. काय चाललंय तिच्या मनात, असं वाटतं नि आठवतात भा. रा. तांबे यांच्या कौशल इनामदारने स्वरबद्ध केलेल्या, या ओळी
चिवचिव चिमणी छतात छतात
आरसा बोले चिमणीला, चिमणीला...
चिमणी पाहे सवतीला, सवतीला...
भरभर आली रागात, रागात
हे गाणं म्हणण्याची संधी पुढच्या पिढ्यांना मिळत राहिली पाहिजे ना? मग चिमण्यांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार ना?

Comments