घराघरांतला ठेवा


दिनकर जोषी हे गुजराती साहित्यविश्वातलं मोठं नाव. त्यांनी एका गुजराती मासिकात ज्येष्ठ नागरिकांसाठी लिहिलेल्या सदरातील लेखांचा मराठी अनुवाद मधुरिमामधून जानेवारी 2013पासून आम्ही आपल्यासमोर आणत होतो. आजच्या अंकात सेकंड इनिंग या सदरातील समारोपाचा भाग आम्ही प्रसिद्ध करत आहोत. सोलापूरमध्ये वास्तव्य असणार्‍या, परंतु गुजरातेत जन्मलेल्या व शिकलेल्या, इंग्रजीच्या निवृत्त प्राध्यापक डॉ. प्रतिभा काटीकर यांनी हे लेख मराठीत आणले आहेत. वयाच्या सत्तरीत त्यांनी हे काम केले. सुवाच्य नि एकसारख्या अक्षरात, बिनरेघांच्या कागदांवर, कुठल्याही खाडाखोडीविना लिहिलेले हे लेख वाचताना प्रसन्न वाटायचं. त्या त्यांच्या मृदू आवाजात जणू ते वाचून दाखवतायत. हे काम संपल्यानंतर त्या मुख्यत: अनुवादाच्या कामात स्वत:ला गुंतवून घेत आहेत, हल्लीच त्यांनी एक नवीन पुस्तक हातात घेतलं आहे. या सदरातून दिला जाणारा अत्यंत सकारात्मक संदेश डॉ. काटीकरांनी वैयक्तिकजीवनातही तंतोतंत पाळलेला आहे. अशा प्रकारचं वृद्धत्व कोणालाही हेवा वाटायला लावणारंच नव्हे का?

परंतु हेवा वाटण्याजोगं असलं तरी ते आपल्या आवाक्याबाहेरचं नव्हे, आपणही तसं सहज राहू/वागू शकतो, हेच सेकंड इनिंगमधून आपल्यासमोर आलं. मुलं, सुना/जावई, नातवंडं, वयोमानानुसार होणारे आजार, परावलंबित्व, आर्थिक समस्या, एकटेपण, मृत्युपत्र, अशा वृद्धत्वाच्या अनेक पैलूंना या सदरातून स्पर्श केला गेला. आपण आपल्यात बदल केला पाहिजे, कितीही कठीण वाटलं तरी, परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे कितीही असह्य असली तरी, आपलं जगून झालंय आता, साठीनंतरची वर्षं बोनस म्हणून आनंदात काढायची असं यातून सुचवलं होतं.

आपल्या प्रत्येकाच्या घरात, शेजारीपाजारी, नात्यात ज्येष्ठ नागरिक असतातच, त्यांच्याशी आपण हे सगळं ताडून पाहतो. आणि तेव्हा वाटतं, या पिढीकडे असलेला अनुभवांचा ठेवा, भाषेचा संग्रह, मॅच्युरिटी आपल्याही फायद्याची आहे. त्यांच्याशी आपणही नीट वागलं, चार शब्द पे्रमाने बोललो तर या ठेव्यापर्यंत आपण पोचू शकतो. म्हातारी सारखी किटकिट करते, असं म्हणण्यापेक्षा आपलंही वागणं थोडं बदलू शकतो. तिचं आयुष्य सुसह्य करू शकतो. तिच्या जागी स्वत:ला पाहू शकतो. या खारकेसारख्या सुरकुतलेल्या, कापसासारख्या मऊ ठेव्याला जपायला हवं ना आपण सर्वांनीच?

Comments