अविश्वासाबद्दल माफी असावी

गेल्या आठवड्यात, पाडव्याच्या रात्री, ती बाहेरगावी निघाली होती. एकटीच. रात्रभराचा ट्रेनचा प्रवास होता. सेकंड एसीचं तिकीट होतं त्यामुळे जाऊन निवांत झोपायचं या विचाराने ती ट्रेनमध्ये चढली.काही वेळातच तिला लक्षात आलं की, सणामुळे डब्यात अगदीच कमी प्रवासी आहेत. आणि एकही बाई नाहीये. तो विचार मागे झटकून तिने बर्थवर चादर अंथरली आणि ती आडवी झाली. एवढ्यात टीसीही येऊन गेला. पण निवांत वाटायच्या ऐवजी तिला कसंतरी, काहीसं असुरक्षित वाटायला लागलं. पुढचं स्टेशन आलं अर्ध्या तासात, तेव्हा पुन्हा टीसी आला. तिने त्याला विचारलं की, थर्ड एसीत एखादी बाई आहे का? तो ‘हा’े म्हणाल्यावर तिने सरळ बॅग उचलली आणि थर्ड एसीत त्या बाईच्या जवळचा बर्थ पकडला. थोडा वेळ ती आणि तिचा मुलगा यांच्याशी गप्पा मारल्यावर ती मस्त झोपून गेली. मधून मधून जाग आली तिला, पण सकाळी ती छान ताजीतवानी होऊनच जागी झाली.

नंतर दिवसभर तिला हे आठवून अस्वस्थ वाटतच राहिलं. सेकंड एसीतल्या त्या इतर प्रवाशांनी खरं तर तिला काहीच त्रास दिला नव्हता किंवा एकाशीही एकही शब्द बोलायचीही वेळ आली नव्हती. परंतु तिला सुरक्षित वाटलं नव्हतं एवढं खरं. एका मित्राला तिने जेव्हा हे सांगितलं तर तो सरळ म्हणाला होता, ‘पुढच्या स्टेशनला खाली उतर नि तडक घरी जा. हवेत कशाला हे उद्योग तुला?’ ते काही तिला पटलं नव्हतं आणि ते शक्यही नव्हतं म्हणा.

तिला अस्वस्थ वाटत होतं. कारण तिने डबा बदलून तिच्या पुरुष सहप्रवाशांवर अविश्वास दाखवला होता. कारण ती डब्यात एकटी आहे हे लक्षात आल्यापासून तिच्या डोक्यात काय काय, नको नको ते विचार आले होते. तेही प्रत्यक्षात काहीही झालेलं नसताना. पण ती दुसर्‍या डब्यात गेली ती निव्वळ काही होऊ नये म्हणून, संभाव्य अनुचित टाळावं म्हणून. काही घडून गेल्यावर आपल्या हातात फार काही शिल्लक नाही ना राहत. म्हणून.

चुकलं का तिचं हे?

Comments