डॉ. आनंदी जोशी


जवळपास 130 वर्षांपूर्वीचे हे छायाचित्र. डावीकडच्या आहेत डॉ. आनंदीबाई जोशी. त्यांच्यासोबतच्या दोघी जणी, अमेरिकेतील पेनसिल्व्हानियामधील वुमेन्स मेडिकल कॉलेजमधल्या त्यांच्या सहाध्यायी. जयप्रीत विर्दी धेसी या कॅनेडियन पीएचडी विद्यार्थिनीला संशोधन करत असताना तो सापडला. तो तिने गेल्या आठवड्यात तिच्या ब्लॉगवर टाकला. http://jaivirdi.com/blog/ ते पाहिलं आणि मनात किती किती विचार आले. वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालेल्या आनंदी गोपाळ जोशीला चौदाव्या वर्षी मूल झालं; पण ते लगेच गेलं. यानंतर गोपाळरावांनी तिला डॉक्टर करायचं ठरवलं आणि तिनेही ते मनावर घेतलं. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी ती अमेरिकेला गेली. शाकाहारी अन्न मिळण्याची वानवा आणि कडाक्याची थंडी यांचा सामना करत तिने पदवी मिळवली. मात्र, या काळात झालेल्या तब्येतीच्या हेळसांडीमुळे भारतात परतल्यानंतर, आपल्या शिक्षणाचा उपयोग करू शकण्यापूर्वीच, वयाच्या 21व्या वर्षीच ती हे जग सोडून गेली. छायाचित्रातल्या आनंदीकडे पाहिलं तर काय दिसतं? ओतप्रोत आत्मविश्वास. अत्यंत पारंपरिक सनातनी वळणाच्या कुटुंबातून सातासमुद्रापार शिक्षणासाठी गेलेल्या आनंदीने नक्की कोणत्या अडचणींचा सामना केला असेल याची कल्पना आपल्याला करताही येणार नाही, इतका अमेरिकी आणि भारतीय समाजही त्या वेळी बुरसटलेला होता.

1873 मध्ये एका अमेरिकी स्त्रीरोगतज्ज्ञाने म्हणून ठेवलं होतं, की ‘शिक्षण आणि मातृत्व हातात हात घालून जाऊच शकत नाही. ज्या बायका शिकायचा प्रयत्न करतात त्यांना मज्जासंस्थेचे आजार होण्याचा धोका असतो कारण बायकांच्या ‘सिस्टिम’ एकाच वेळी दोन गोष्टी योग्य प्रकारे करू शकत नाहीत.’ तोवर अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकारही नव्हता. (पण त्याच वेळी महिलांसाठी वेगळं वैद्यकीय महाविद्यालय होतं!) आनंदीबार्इंनंतर लगेचच गुरुबाई करमरकर त्यांच्या पतीसह याच महाविद्यालयात शिकायला गेल्या आणि 1893मध्ये मुंबईला परत येऊन मिशन रुग्णालयात तब्बल तीस वर्षं डॉक्टर म्हणून सेवा केली. त्यांच्याबद्दलही जयप्रीतने लिहिलं आहे. जयप्रीतच्या संशोधनाचा विषय अमेरिकेतील वैद्यकीय महाविद्यालयांशी निगडित, त्यामुळे त्यांच्या संदर्भ विभागातील साहित्य तपासताना तिला ही छायाचित्रे हाती लागली. तिच्या ब्लॉगमुळे आपल्यालाही ती पाहायला मिळाली आणि त्या काळात एक धावती सफर करता आली. हेही नसे थोडके. काय ?

Comments