लहानपणापासून प्रचंड नसलं तरी बऱयापैकी वाचन आपसूक झालं होतं. आपसूक म्हणण्याचं कारण आईवडील दोघंही नोकरी करणारे असल्याने पुस्तकं वाच असा धोशा लावणारं कोणी नव्हतं. पण घरात पुस्तकं बरीच होती. इंग्रजी आणि मराठी दोन्ही. खेरीज ‘माणूस’ आणि ‘सोबत’ यायचे. माणूसमध्ये जेफ्री आर्चरच्या फर्स्ट अमंग द ईक्वल्सचं शर्यत या नावाने येणारा अनुवाद अजून लक्षात आहे. मी 15 वर्षांची होईपर्यंत टीव्ही घरात आला नव्हता, हेही याला कारणीभूत असेल कदाचित. शाळकरी वयात वाचलेलं स्वामी, पाडस, रेणू, सावित्री, श्रीकांत, पु.लं.चं काही साहित्य, थोडेफार व.पु., एकविंशती, असं बरंच आज लक्षात आहे. (त्यात काही तद्दन फालतू इंग्रजी कादंबऱयाही होत्या, ज्यातलं पुष्कळसं डोक्यावरून गेलं होतं त्या वयात.) शरलॉक होम्सशी ओळखही याच सुमारास झाली. जेवण बहुतेक वेळा डाव्या हातात पुस्तक धरूनच व्हायचं. आम्ही मावस/मामेभावंडं वाचणारी असल्याने पुस्तकांवर गप्पा व्हायच्या, देवाणघेवाणही व्हायची.
या पार्श्वभूमीवर, गार्गी बसायला लागल्यापासून नियमितपणे पुस्तकं घरी आणू लागले. नवरा आणि मी कुठेही गेलो नि वेगळं काही दिसलं, इंग्रजी, मराठी किंवा हिंदी, तिच्यासाठी आणायचो आणि अजूनही आणतो. अगदी लहान असताना आवडीने ती चित्रांची पुस्तकं हाताळायची चित्रं ओळखायची, ती साडेतीनचार वर्षांची असताना मी तिला मराठी मूळाक्षरं ओळखायला शिकवली. मग मोठय़ा अक्षरांची पुस्तकं आणली. ती तिच्या शेजारी बसून तिला आम्ही घरातले सगळे, आजीआजोबाही वाचून दाखवायचो. सहा-सात वर्षांची होईपर्यंत तिच्या पुस्तकांनी एक कपाट भरून गेलं. पण ही बया काही स्वत: पुस्तकाजवळ जाऊन वाचायचा प्रयत्न करेना. माझ्याचएवढय़ा, माझ्या मुलीएवढी मुलं असणाऱया, मित्रमैत्रिणींशी बोलताना हा विषय निघायचा. कुणाचीच मुलं पुस्तकांशी फारशी जवळीक साधत नव्हती. आम्ही सगळे वाचनवेडे असूनही. माझ्यासाठी हा फार मोठा नामुष्कीचा आणि निराशेचा टप्पा होता.
आणि अचानक तिच्या हाती ‘चिंटू’ आला. मुकेशने तिच्या एका वाढदिवशी तिला चिंटूचा 30 पुस्तकांचा संच दिला. तिला साधारण साडेसात वर्षांची झाली तेव्हा वाचण्याचा आत्मविश्वासही आला होता आणि ‘विनोद’ कळण्याएवढी अक्कलही. तिने या 30 पुस्तकांचा आठवडय़ाभरात फडशा पाडला. अगदी सकाळी साडेसहाला शाळेत निघण्यापूर्वी नाश्ता करतानाही डोळ्यांसमोर चिंटूचा एक भाग असायचा. माझ्या मनात आशेचा किरण उगवला. अगदीच वाया नाही जाणार कार्टी. याच काळात ज्योत्स्ना प्रकाशनची राधाचं घर, आमची शाळा ही अत्यंत फेवरिट पुस्तकं होती तिची.
मग बारातेराव्या वर्षापासनं ती प्रचंड वाचू लागलीय. आणि वाचनाकडे वळवणारा होता हॅरी पॉटर. रॉन, हरमायनी, मालफॉय, डम्बलडोर, स्न्Zप, वोल्डमॉर्ट, हॉगवार्ट्स यांचं जादुई जग पडद्यावर पाहून ती भारावून गेली होतीच. मग हळूच मी तिच्यासमोर जे.के. रोलिंगचं हॅरी पॉटर अँड द सॉर्सरर्स स्टोन सरकवलं. आणि ती घुसलीच त्यात. पुढची सगळी पुस्तकं तिने वाचून पारायणं केलीत, तिच्या ग्रूपमध्ये चक्क हॅरी पॉटरवाले नि व्हॅम्पायर सीरीजवाले असे दोन तट आहेत, त्यांच्यात आपलीच सीरीज चांगली यावरून जोरदार वाद होत असतात.
आता राजकारणातलंही थोडंथोडं वाचायला लावते मी. वर्तमानपत्रातला एखादा लेख, पान मोडून बरोब्बर तेवढाच काढून, समोर सरकावला की वाचते. तेवढं तर तेवढं.
बाकी मुराकामी, अगाथा ख्रिस्ती, द गर्ल विथ द ड्रगन टॅटू मालिकेतील पुढची दोन पुस्तकं, असं काहीबाही मोठंमोठं पण वाचते ती आजकाल. आता काही ती पुस्तकांपासनं दूर जाणार नाही, अशी खात्री आहे माझी.
या अनुभवावरनं मला एवढंच वाटतं, की वाचनाची गोडी एखाद्या व्यक्तीला लावली जाऊ शकते, पण एका मर्यादेपर्यंतच. माझा धाकटा भाऊ साधारण पंचविसाव्या वर्षानंतर वाचायला लागला, म्हणजे अभ्यासबाह्य वाचन. त्यामुळे, या विश्वात रमायचं की नाही, हे त्या त्या व्यक्तीच्या स्वभावावर, बुद्धय़ांकावर, भावनांकावर अवलंबून असतं. अंतर्नादमध्ये काही वर्षांपूर्वी एका लेखात गीता भागवत यांनी त्याला पुस्तकप्रेमांक म्हटलं होतं.
तर, आपला सर्वांचा पुस्तकप्रेमांक उत्तरोत्तर वाढत राहो, हीच सदिच्छा.
पुस्तकप्रेमांक मस्तच
ReplyDelete