वाचने किं दरिद्रता?

वय वर्षं एक. बाबा किंवा आजोबांच्या आवडत्या खुर्चीवर बसून डोळ्यांवर खेळण्यातला चष्मा लावून पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचायची खूप हौस. असा फोटो  साधारण सर्वच बच्चेकंपनीचा असतो.
दोन-तीन वर्षांचं झाल्यावर, शाळेत जाणारे ताईदादा किंवा शेजारपाजारची मुलं, पाहून त्यांच्यासारखा ‘अभ्याश’सुद्धा बहुतेक मुलं करत असतात. 

याच वयात मुलं वाचायला शिकू शकतात. विशेषत: देवनागरी लिपीतून अक्षरओळख करून दिली तर रोजच्या वर्तमानपत्रातले मथळे, जोडाक्षरविरहित पुस्तकं,  दुकानांवरच्या पाट्या, जाहिराती त्यांना वाचता येतात. (देवनागरी अशासाठी म्हटलं कारण अ ला काना आ आणि ई म्हणजे आई एवढं म्हटलं की पुरतं.  रोमन लिपीतून इंग्रजी शिकवायचं तर एम ओ टी एच ई आर म्हणजे मदर म्हणजे आई हे अंमळ कठीणच जातं मुलांना एवढ्या लहान वयात.) एकदा अशी  अक्षरं जोडून वाचायचं वेड लागलं की मुलं सुटतात. म्हणजे दिसेल ते त्यांना वाचायचं असतं. 
या वाचायची भूक असलेल्या वयातच ती शाळेत जाऊ लागतात. तिथे थोडीशी गडबड होते बर्‍याचदा. वाचन म्हणजे अभ्यास, मार्क, रिझल्ट, नंबर, स्पर्धा,  अ‍ॅडमिशन असं काही तरी होऊन जातं, या सगळ्या गुंत्यात पुस्तकं, म्हणजे अभ्यासक्रमाबाहेरची पुस्तकं, मागे पडतात. पाचसहाव्या वर्षी छान वाचणारी मुलं  अचानक त्यांच्या गोष्टीच्या पुस्तकांपासून दूर जातात. आईबाबाला तोपर्यंत वाटत असतं की वा वा, मुला/मुलीला वाचायची आवड आहे हं. आणि कसलं काय,  गोष्टीची पुस्तकं राहिली दूर, अभ्यासाचीही पुस्तकं हातात घेतली जात नाहीत. टीव्ही आणि मित्रमंडळी यांतून वाचायला वेळच मिळेनासा होतो मुलांना.
अशी दोन-तीन वर्षं गेली की आठवी-नववीत असताना बरीच मुलं पुन्हा पुस्तकांकडे वळतात. हॅरी पॉटर मालिकेतील पुस्तकं याच वयात हातात येतात,  चित्रपटामुळे हॅरी-हर्मायनी-रॉन-मालफॉय ही चौकडी ओळखीची झालेली असते. पडद्यावर हॉगवार्ट्स स्कूल ऑफ मॅजिक पाहून उत्सुकता चाळवलेली असते.  त्यामुळे हातात पुस्तक आलं की कळतं की पडद्यावर दिसतं त्याच्यापेक्षा भारी भारी गोष्टी पुस्तकात घडतात. मग इतर अशा प्रकारच्या पुस्तकांकडे मुलं  वळतात. घरी खूप पुस्तकं आहेत अशा मुला/मुलीशी मैत्री वाढते. पुस्तकांची देवाणघेवाण होते आणि वाचनाचा सिलसिला सुरू होतो. या वयात लागलेलं  पुस्तकांचं/वाचनाचं वेड सहसा कमी होत नाही. 
या प्रवासात वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं हातात येतात, हळुहळू आवड निश्चित होऊ लागते. कथा, कादंबरी, कविता, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र,  वैज्ञानिक, क्रीडाविषयक, सामाजिक, राजकीय, विश्लेषण, विनोदी असे अनेक प्रकार नजरेसमोर असतात, त्यातून आपल्याला काय आवडतंय हे लक्षात येऊ  लागतं. माझे आवडते लेखक हा प्रकार याच वयात निर्माण होतो. मग त्या लेखकाची सर्व पुस्तकं मिळवून वाचायची असाही निश्चय केला जातो. किंवा एकाच  विषयावरची अनेक पुस्तकं वाचली जातात.
नोकरी, संसार, जबाबदार्‍या या सार्‍यावर मात करून वाचन सुरू राहतं. वेळ मिळेल तसं. जागा मिळेल तिथे. जे मिळेल ते, पांढर्‍यावरचं काळं वाचलं जातं.  आणि लक्षात येतं की वाचण्याजोगं केवढं तरी आहे नि वेळ अगदीच कमी. मग वाचन चोखंदळ होऊ लागतं. जे आवश्यक, आवडेल, जे वाचून मनाला आनंद  मिळेल, तेच वाचलं जातं. लहान असताना जसं अभ्यासक्रमाबाहेरचं, म्हणजे अवांतर, वाचन कमी होतं तसं मोठं झाल्यावर बर्‍याचदा व्यवसायाशी निगडित  तेवढंच वाचलं जातं. अशा वेळी, म्हणजे वेळ कमी असताना, काय वाचावं हे कुणी जाणकाराने सांगितलं तर खूप बरं वाटतं. सांगायची गोष्ट एवढीच की वाचा.  पुस्तक कसं मिळवावं याला नियम नसतो. बेग, स्टील ऑर बॉरो. काहीही करा, पण वाचा. पुस्तक दिनाच्या निमित्ताने आणखी वेगळं काय सांगणार ना?

Comments

  1. वाचन, वाचनीय याबद्दल बरंच सांगण्यासारखं आहे. माझ्या एका विद्यार्थिनीने वाचनाचा छंद आहे असे सांगितलं नि कोणती पुस्तके वाचतेस म्हटलं तर त्या बीएस्सी मॅथ्स होऊन आलेल्या मुलीने चक्क मॅथ-टेक्स्टबुकांची नांवे सांगितली. मी तिला किमान GEB वाच म्हणून मजजवळची उत्तम प्रत दिली. किती वाचली कोण जाणे. दुसर्‍या एका पर्यावरणशास्त्रविषयाच्या मुलीने वाचनाची आवड आहे म्हटलं, तिला शब्दकोश हा प्रकार ऐकूनही माहित नव्हता. वाचकाला शब्दकोश माहित हवाच का असा प्रश्न असू शकतो. अभ्यासात डिक्शनरी वापरण्याची सवय लावतात ना जबाबदार आई-बाबा, त्याचा एक उपयोग वाचलेले बरोब्बर अर्थासह कळावे यासाठी करण्याचा मला तरी आजही मोह असतो. थिसेरससुद्धा हाताशी हवा, छटेसह शब्द उमटले पाहिजेत मनात मग ते ओठांतून आपोआप उमलतात, वाचिक अभिनयासाठी खास शिक्षण न घेताही प्रगती करता येते, वाचनाची मजा लुटता-लुटवता येते. आई-बाबांच्या, आजीच्या चीजा मला हाताळायला मिळाल्या की कोण आनंद, त्यामुळेच बहुतेक मी लवकर डिक्शनरी हाताळायला शिकले आणि डॉन क्विग्झोटसारखे भले थोरले पुस्तक वाचण्याचा अट्टाहास केला. खूप पुस्तके बाबांच्या वाचनात दिसली की ती मला हवीतच असे अजूनही होते. आता कदाचित त्यांनाही माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकांसाठी तसे होते.

    ReplyDelete

Post a Comment