अतिताणाचा बळी?

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान सुरू असताना गुरुवारी ठाण्यात एका निवडणूक कर्मचार्‍याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन व्हावे, ही दुर्दैवी घटना तर खरीच, पण टाळता येण्याजोगीही नक्कीच. कोट्यवधी मतदारांसाठी लाखो कर्मचारी झटत असतात. यात कायमस्वरूपी निवडणूक कर्मचार्‍यांसोबतच तात्पुरते कर्मचारीही असतात, जे आपले एरवीचे शाळेतील वा सरकारी कार्यालयातील काम काही दिवसांपुरते बाजूला ठेवून निवडणुकीचे काम करत असतात. यात मतदार याद्या तयार करण्यापासून मतमोजणीपर्यंतच्या कामांचा समावेश असतो. देशासाठीचे एक कर्तव्य म्हणून हे काम कोणीच टाळू शकत नाही. अगदी घरी एखादी अत्यंत गंभीर परिस्थिती असेल, तरच त्यातून सूट मिळू शकते. अशा परिस्थितीत या कर्मचार्‍यांना काही मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही; परंतु त्यांना कसे काम करावे लागते? मुख्य म्हणजे घरापासून प्रचंड अंतरावरचे मतदान केंद्र जिथे पहाटे पाचला पोहोचणे महामुश्कील असते, स्वच्छतागृहांचा अभाव असतो, जेवण व पिण्याच्या पाण्याची सोयही स्वत:लाच करावी लागते. खेरीज अनेक संवेदनशील केंद्रांवर राजकीय गुंडगिरीचे सावटही असतेच. ग्रामीण भागांमध्ये तर बैलगाडीपासून होडीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांचा वापर करून केंद्रांवर पोहोचणे शक्य होत असते. त्यात सध्या सुरू असलेल्या मतदानाच्या फेर्‍यांमध्ये सरसकट आढळून आलेल्या मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याच्या तक्रारींचा तणावही त्यांच्यावर येतोच. ठणठणीत प्रकृती असलेल्यांनाही जिथे या सगळ्याने त्रास होतो, तिथे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार असलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीवर किती ताण येत असेल, याची आपण कल्पना नक्की करू शकतो. या परिस्थितीमुळेच ठाण्यातल्या घटनेसारखे प्रकार घडतात. कामाच्या ताणामुळे मृत्यू कोणत्याही परिस्थितीत टाळलाच गेला पाहिजे, हे महत्त्वाचे.

Comments

Post a Comment